ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये म्हणतात. या दोघांच्याही जीवनाचे भागधेय पवित्र जलाची शिंपण करून तमाम अशुद्धी घालवणे हे असल्याने बहुधा त्यांच्या जीवनाकडेच पहावे, मग मूळ किंवा कूळ कोणतेही असो असा एक स्पष्ट कारणभाव या उक्तीत दिसतो. दोहोंचाही अंतिम अवस्थेकडे अखंड प्रवास सुरू असतो.
मानवी आयुष्यालाही नेहमी प्रवासाची उपमा दिली जाते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा प्रवास लक्षात ठेवून दातृत्व दाखविण्याऐवजी; क्षणिक नुकसान किंवा जीवितहानीच्या वेळी या दुनियेत सारेच घडीभराचे प्रवासी आहेत, असे ज्ञान पाजळून पुन्हा सर्वजण डोळ्यांवर कातडे ओढून बसतात, हा भाग अलहिदा. प्रस्तुत नग्मा या प्रवासातील एका मुक्कामाच्या वेळी मुसाफिराच्या मनाची झालेली ओढाताण आणि सुखदुःखे प्रत्ययकारकरीत्या चित्रित करणारा आहे.
त्याची (परमेश्वर) किंवा तिची (असेल हो कुणीतरी खास) ख्याती ऐकून लांबवरची सफरकरीत अखेर एकजण त्याच्या शहरात, तिच्या दारात येऊन पोहचला आणि भेटण्याची संधी शोधू लागला. (पतित पावन होता म्हणूनी आलो मी द्वारा…शब्दकीरांची जातकुळी एकच असते काय?) आता आळवणी सुरू आहे. फक्त एखाद्या भटक्या वाटसरूप्रमाणे आम्ही तुझ्या शहरात आलोय. फक्त एकदाच, एकदाच मला तुझ्याशी बोलाचालीची (मुलाक़ात) संधी दे. माझं ध्येय (मंज़िल) काय, माझा अतापता कुठला (तू आज जर भेटलीच तर) तुझा निरोप घेऊन उद्या सकाळी मला जायचं आहे कुठं – मला काहीही ठाऊक नाही. भटकत असलो म्हणून काय झालं? त्याचाही विचार, पूर्वतयारी करावीच लागते ना! ती करण्यासाठी एका रात्रीचा तरी अवसर दे.
माझ्या नेत्रांमध्ये मी काजवे (जुगनू) लपवून ठेवलेले आहेत. (कशासाठी?) माझ्या पापण्या (पलकें) मी अश्रूंनी सजवून ठेवल्या आहेत. तू एक संधी देणार असशील तर, फक्त एकच संधी, माझे डोळे बरसण्यासाठी आतुर झाले आहेत. (बंद डोळ्यांतील काजव्यांचा उपयोग काय? अश्रू कोसळताक्षणी या काजव्यांचा प्रकाश जाणवेल !) ‘पुसणार कुणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे’चा अर्थ हाच! (शब्दकीरांच्या जातकुळीचा आणखी एक पुरावा.)
आज रात्री माझ्या प्रीतीच्या वेदना ऐक. (‘जळे माझी काया, लागला ओणवा, धाव रे केशवा मायबाप्पा’ हा मराठी मातीतला अभंग !) थरथरत्या ओठांची तक्रार ऐक. आज माझ्यागुपिताच्या (ख़यालात) प्रकटीकरणाची (इजहार) संधी दे !
नशीब मात्र वैर्याकचं आहे. तो हिच्या गावात आहे हे तिच्या गावीही नाही. तिला तर असा कुणी मुसाफिर असल्याचंही ठाऊक नाही बहुतेक. मग सुरू होते याची तडफड – विसरायचंच होतं तर हा वायदा कशासाठी केला जातो? (आपण फार चांगल्या किंवा मी तुमाच उद्धारकर्ता हा बडेजाव कशासाठी?) बेईमानी करायचीच होती तर हा प्रेमाचा आणि भावुकतेचा डोलारा उभा केलासच का? (खरे तर मला उत्तरंही ठाऊक आहेत, बारा गावची फळं चाखलेला मी, तुला ओळखतोच. पण….) देणारच असशील तर फक्त दोन-चार प्रश्न विचारण्याची संधी दे. (तुझ्यासारख्यांचा बुरखा फाडायला काही शब्दच पुरेसे आहेत!)
छोट्या-छोट्या नित्य वापरातील सुलभ शब्दांनी ही रचना लावण्यवती झाली आहे आणि ‘चराचरापलीकडे वास करतो’ असे म्हटल्या जाणार्याण परमेश्वराच्या संदर्भाकडे गूढगंभीर सूचन असल्याने तिची कळी अधिकच खुलली आहे.
मानवी आयुष्यालाही नेहमी प्रवासाची उपमा दिली जाते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी हा प्रवास लक्षात ठेवून दातृत्व दाखविण्याऐवजी; क्षणिक नुकसान किंवा जीवितहानीच्या वेळी या दुनियेत सारेच घडीभराचे प्रवासी आहेत, असे ज्ञान पाजळून पुन्हा सर्वजण डोळ्यांवर कातडे ओढून बसतात, हा भाग अलहिदा. प्रस्तुत नग्मा या प्रवासातील एका मुक्कामाच्या वेळी मुसाफिराच्या मनाची झालेली ओढाताण आणि सुखदुःखे प्रत्ययकारकरीत्या चित्रित करणारा आहे
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).
Leave a Reply