संगीतकार सी. रामचंद्र अर्थात ‘अण्णा’ यांच्याबद्दलचे सुप्रसिद्ध पण विखुरलेले किस्से एकत्र गुंफले की एक विलक्षण असं मिश्रण तयार होतं. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या झाडांवरची फुलं एका गुच्छात बांधली की त्याचं बहुरंगीपण जसं आकर्षक होतं तसंच !
“पतंगा” या चित्रपटाची गाणी तयार होत असताना ‘राजेंद्रकृष्ण’ यांनी एक ओळ लिहीली, ‘ओ दिलवालॊ दिलका लगाना अच्छा है’ ! खरं म्हणजे किती छान आणि सरळ अर्थ होता या ओळीचा! पण शेजारी बसलेल्या अण्णांना गंमत करायची लहर आली . ही ओळ एेकून, हातातल्या ग्लासकडे पहात, अण्णा खट्याळपणे म्हणाले, “पर कभी कभी! मग काय विचारता? गाण्याचा सगळा नूरच एकदम पालटून गेला … “किसीकी खातिर जान जलाना अच्छा है – पर कभी कभी!” “दिलमें किसीका प्यार बसाना अच्छा है – पर कभी कभी” …… अण्णांच्या चेष्टेखोर स्वभावामुळे एका धमाल गाण्याचा जन्म झाला.
“चित्रपटाची सगळीच्या सगळी गाणी (आणि पार्श्वसंगीत) दहा दिवसात तयार झाली पाहिजेत” या “आजाद”च्या निर्मात्याच्या ‘आदेशा’चं पालन करण्यासाठी सी. रामचंद्र व राजेंद्रकृष्ण मद्रासला रवाना झाले खरे पण या दोघांनी पहिले नऊ दिवस ‘आवडत्या छंदा’त बुडवले ! निर्माते टेन्शनमधे ! मग शेवटच्या दिवशी (म्हणजे रात्री) जोडी ‘बसली’! नऊ सुंदर गाणी जन्मली ! निर्माते टेन्शनमधून ‘आजाद’ आणि श्रोते गाण्यांच्या माधुर्यात कायमचे “कैद!”
बरं अश्या ‘बिनधास्त- ‘हॅपी-गो-लकी’- वृत्तीच्या माणसाला ‘perfection’ शी काय देणं घेणं असं आपल्याला वाटतं . पण इथं अण्णा आपल्याला चकवतात.
मोहोब्बत ही न जो समझे या तरल गाण्याचं रेकॉर्डिंग, तलतच्या तलम आवाजात पूर्ण झालं होतं. शूटिंग मात्र नंतर होतं. सी रामचंद्र सहज सेटवर गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा सेट गाण्याच्या चालीशी पूर्णपणे विसंगत आहे. शांतारामबापूंनी तर सेटवर बराच पैसा खर्च केला होता. सेट बदलायचा तर त्यांचा पैसा वाया जाणार होता. पण सी रामचंद्रनी गाण्याची चाल व सेट यातली विरुपता “बापूंना” पटवली आणि पूर्ण सेट बदलायला लावला.
कधी कधी ‘खट्याळ युक्त्या’ योजून ते स्वतःला हवं ते साध्य करत. “साजन” या चित्रपटातली गाणी नायक ‘अशोककुमार’ने म्हणू नयेत असं त्यांना मनापासून वाटत होतं. पण अशोककुमार पडला सुपरस्टार! त्याला ही गोष्ट सांगायची कोणाची हिंमत नव्हती. शेवटी अण्णांनी शक्कल लढवली. ‘अशोककुमार’च्या वेगवेगळ्या शूटिंगच्या तारखा मिळवल्या आणि गाण्याची रेकॉर्डिंगज् बरोबर त्याच तारखांना ठरवू लागले . रेकॉर्डिंगला दरवेळी ‘नाही’ म्हणणं अशोककुमारला अवघड वाटू लागलं तेव्हा तो वैतागून म्हणाला, ‘दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्या’. अण्णांना हेच हवं होतं. त्यांनी ‘आज्ञाधारकपणे’ रफीच्या आवाजात गाणी रेकॉर्ड केली.
पण हा कलंदर माणूस ‘आतून’ खूप हळवा होता. नौशादजी गंभीर आजारी होते तेव्हा सी रामचंद्र त्यांना म्हणाले, ‘तुम्ही लवकर बरे ह्वावं म्हणून मी रोज आमच्या देवाला प्रार्थना करतो’. तेव्हा नौशाद म्हणाले की त्यापेक्षा मी लवकर ‘जावं’ अशी प्रार्थना करा म्हणजे माझी वेदनांतून सुटका होईल आणि त्याचबरोबर तुमची ‘competition’ सुद्धा कमी होईल. अण्णा म्हणाले, अहो पण तुम्ही आहात म्हणून तर आमच्या हातून काही चांगली निर्मिती होते – तुमच्या समोर टिकाव लागावा म्हणून ! तुम्ही गेलात तर आम्ही आळशी होऊ!’ हे ऐकून नौशाद गहिवरले !
लताबरोबर वितुष्ट आल्यावर सी रामचंद्र यांच्या अनेक मित्रांनी त्यांना सुचवलं की त्यांनी लताशी ‘समझोता’ करावा. ‘जी गोष्ट एस् डी बर्मन आणि शंकर यांनी केली ती अण्णांनी का करु नये?’ पण अशा वेळी त्यांचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा जागृत व्हायचा आणि ते उसळून म्हणायचे, ‘समझोता तर तिने केला पाहिजे . मी तह करायला तिनं मला घडवलेलं नाही – मी तिला घडवलयं!’ कदाचित, लता किती उंचीवर पोहोचली आहे हे त्यांना कळूनही वळलं नसावं.
या ब्रेकअप नंतर काही वर्षांनी घडलेला प्रसंग :
अनिल बर्वे एका संध्याकाळी अण्णांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. अण्णा एकटेच बसले होते. समोर टेबलावर त्यांची आवडती ‘बॅगपाईपर’ होती. पण ते नेहमीच्या मूडमधे नव्हते. उदास वाटत होते. बर्वेनी विचारलं, ‘अण्णा, काय झालं ?’ तेव्हा म्हणाले, ‘अरे गळ्याच्या उपचारांसाठी लता लंडनला गेलीय. खूप काळजी वाटतेय रे ! या जगात गाणारे गळे खूप आहेत पण शहनाईचा स्वर फक्त लताच्या गळ्यात आहे !’ अण्णांमधल्या सच्च्या कलावंताचं दर्शन घडवणारे हे उद्गार आहेत !
लता-सी रामचंद्र वितुष्टाचा ‘फायदा’ मिळावा या हेतूने एका मासिकाचे उपसंपादक अण्णांकडे आले व म्हणाले, ‘लतापेक्षा आशा श्रेष्ठ आहे’ यावर मी एक फीचर करत आहे, तुम्ही बोला त्यात’!
तेव्हा, ‘तुम्हाला संगीतातलं काडीइतकं सुद्धा समजत नाही’ असं म्हणून अण्णांनी त्यांची बोळवण केली.
अण्णा ‘साई-सावली’ मध्ये रहायला आल्यावर प्रभाकर मोने गमतीने म्हणाले, “अहो तुमचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर ! जिना अरुंद , लिफ्ट नाही! वर माणूस मेला तर ‘बॉडी’ खाली आणणं पण अवघड”.
अण्णा नेहमीच्या ‘श्टाईल’मधे म्हणाले, “पर भैय्या हम तो बाहर के बाहरही मरके जानेवाले है” .. आणि त्यांनी आपला शब्द पाळला. डिसेंबर 1981 च्या शेवटच्या आठवड्यात, के.ई.एम्. मध्ये अॅडमिट झालेल्या अण्णांनी 5 जानेवारी 1982 या दिवशी हॉस्पिटलमधेच प्राण सोडला. त्यांचं शव अंत्यदर्शनासाठी साई-सावलीत खालीच ठेवलं आणि हजारो चाहत्यांचा सोबतीनं सरळ ‘चंदनवाडी’कडे रवाना झालं.
— धनंजय कुरणे
कोल्हापूर
9325290079
Leave a Reply