नवीन लेखन...

हसू!

संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. युनियनमधल्या घराच्या पडवीत खुर्ची टाकून मनुताईआत्या व मी बसलो होतो. थंडीच्या दिवसांची चाहूल झाडांच्या बदलत्या रंगांतनं दिसत होती. मावळतीची कोवळी किरणं झाडांच्या पिवळ्या पडत जाणार्‍या शेंड्यांवर रेंगाळत होती. न्यूयॉर्ककडून ट्रेन आली आणि प्रिंन्स्टनच्या दिशेने निघून गेली. पार्किंग लॉटमधील मोठमोठ्या गाड्या भराभरा घराच्या दिशेने गिर्रेदार वळणं घेत निघून जाऊ लागल्या. काही माणसं चालत चालत घराकडे जाऊ लागली. आम्ही उत्सुकतेने ही लगबग पहात होतो. ओळख ना पाळख, पण आत्याच्या परिचित चेहर्‍याकडे पाहून एक काळारोम आफ्रिकन-अमेरिकन वंशाचा माणूस थांबला. कुरळ्या बारीक केसातला त्याचा थोराड चेहरा फुलला. पांढरे शुभ्र दात चमकवत तो हसला, “गुड इव्हिनिंग!” म्हणाला आणि निघूनही गेला. मी आत्याकडे पाहिलं, तिनंही हात हलवून त्याला प्रतिसाद दिला. आत्याला मी विचारलं – “तू याला ओळखतेस?” ती “नाही” म्हणाली. “मग? ” मी तिला विचारलं. तिनं हसत विषय सोडून दिला.

शेजारचा जॉन आत्याला, मला “हॅलो” म्हणत अभिवादन करून गेला (अमेरिकेत निम्म्या पुरुषांची नावे जॉन असतील!). मी त्याला पहिल्यांदाच पहात होतो. पण त्याचं स्मित जणू मी त्याला अनेक वर्षे ओळखत असण्याचं होतं. पाठीमागून एक भारतीय पुरुष थ्री पीस सूट, हातात लॅपटॉप सावरत आला. इकडेतिकडे न पहाता चेहर्‍यावरचीसुद्धा इस्त्रीची घडी विसकटू न देता देता पुढे निघून गेला. कदाचित तो हसणं विसरला असावा किंवा त्याला त्याच्या प्रतिष्ठितपणाची घडी सांभाळायची असावी. आत्या म्हणाली, “अरे गेली पंधरा वर्षे मी नेहमी पहात आलेय, देशाबाहेर पडला की भारतीय माणूस भारतीयाला विसरतो. साधं हसणंही त्याला महाग होतं. त्याला वाटतं कोण कटकट विकत घेणार? अर्थात अपवाद असतात, पण थोडे. अरे, निदान हसा तरी. जगण्याच्या संघर्षात हसणंच जगणं सोपं करतं. ” मुंबईत कुर्ल्याहून बांद्र्याकडे जाताना झोपडपट्टी लागते-धारावी. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी. तिथं ट्रॅफिकमध्ये अडकून गाड्या रेंगाळतात. गर्दी जमते. जो जमेल तसा गाडी पुढे दामटतो. आणि ट्रॅफिक जॅम होतो. आम्ही असेच ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून पडलो होतो. बाजूच्या झोपड्यांमधील मुलं-म्हातारी माणसं सारी गंमत पहात बसलेली. आमचे चेहरे त्रासिक! तितक्यात एका झोपडीच्या दारात एक छोटीशी मुलगी उभी राहिली, डोळ्यात झोप होती. मुंबईचा असह्य उकाडा हवेत होता, तिच्या चेहर्‍यावरून, केसांच्या जटांमधून घाम सांडत होता. पण गाड्यांची ती गडबड पाहून तिला गंमत वाटत होती. आमच्या एसी गाडीतल्या त्रासिक चेहर्‍यांकडे पाहून ती हसली. तिचं ते हसू खूप छान वाटलं. ओळख ना पाळख, पण ते हसणं तणाव घालवणारं!

केनिलवर्थहून यूनियनला चाललेला गजबजलेला रस्ता. गाडीला गाडी लागून चाललेली, पण योग्य अंतर जपलेलं. डाव्या उजव्या बाजूच्या लेन भरभरून वाहत होत्या. सिग्नल जवळ आला. हिरवा-पिवळा-लाल. गाड्या जागच्या जागी उभ्या झाल्या. सिग्नल सुरू झाला. गाड्या वेगानं धावू लागल्या आणि अचानक लाल निळा प्रकाश उडवत सायरन वाजवत मागून अँब्यूलन्सचा आवाज आला. गाड्या हळू झाल्या. मोठ्या भावानं-प्रशांतनं त्याची गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला हळुवारपणे थांबवली. योग्य अंतर राखून डावीकडची लेन मोकळी झाली. सायरन वाजवत अँब्यूलन्स सुसाटत पुढे आली. अँब्यूलन्सच्या पुढच्या खिडकीत बसलेली यूनिफॉर्ममधली बाई प्रशांतकडे कृतज्ञतेने हळुवार पहात हसली. एखादा क्षणच असेल, पण त्या हसण्यात कोणाच्या तरी जगण्याची जीव वाचवण्याची असोशी होती.

हसणं. किती साधी, सोपी कृती! पण कित्येकदा आपण ती विसरून जातो. कधी कधी तर आपल्याला आपण हसलो तर आपली प्रतिष्ठा हरवते की काय असे वाटते. मोठमोठी घरं. देखणे दरवाजे आणि दारावर दात विचकणार्‍या कुत्र्याचं चित्र दाखवणारी पाटी – “कुत्र्यांपासून सावध!” माणसं घरात येणार कशी? कुत्र्याची भीती घेऊन? आणि ती तरी आत आलीच, तर घरातून लफ्फेदार यूनिफॉर्ममधला नोकर किंवा कामवाली बाई, आणि विचारणार – “कोण हवंय?” त्यात चेहरा त्रासलेला. अशा मोठ्या घरांचा आणि दरवाजांचा काय उपयोग? देखण्या घरात हसरी माणसं नसली तर घर उदास राहतं. छोटं घर, पण उघडा दरवाजा आणि हसत हसत स्वागत करणारा आनंदी, प्रसन्न चेहरा- “या, बसा!” अख्खं घर छोटसं असलं तरी दारावरच्या पडद्यांसकट स्वागत करणारं, प्रसन्न आनंदानं डवरणारं वाटतं. प्राजक्तांच्या कळ्यांगत सुवासलेलं! मनामनांना जोडणारं!

आपल्याला हवंय असं हसू. हवंय विश्वात्मक जगाच्या ज्ञानेश्वरी गप्पा मारता मारता ज्ञानेश्वरांच्याच मोगर्‍याचा आठव देणारं! मिळेल?

— नितीन आरेकर

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..