क्रिकेटमधील यष्टीरक्षणाचे काम पाठीला त्रासदायक तर असतेच पण ग्लोव्ह्जमुळे मनगटाच्या पुढील भाग ‘हवाबंद’ होत असल्याने हातांसाठीही त्रासाचे असते. आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मोठ्या रबरी मोज्यांच्या आतून घालण्याजोगे पातळ मोजे उपलब्ध झाले आहेत पण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या ‘पावात’ एका यष्टीरक्षकाने यावर नामी युक्ती शोधून काढली होती.
७ सप्टेंबर १८६४ रोजी अर्नेस्ट हॅलिवेलचा जन्म झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून हा ८ कसोट्या खेळला आणि ११ बळी त्याने यष्ट्यांमागून मिळविले. फलंदाजीमध्ये विशेष काही त्याच्याकडून झाले नाही. हातांच्या संरक्षणासाठी मांसाचा (गोमांस किंवा माशाचा तुकडा) एक तुकडा ग्लोव्ह्जच्या आत ठेवण्याची त्याची लकब होती. यथावकाश ती बर्याच यष्टीरक्षकांकडून पाळली जाऊ लागली.
७ सप्टेंबर १८९४ रोजी एका कांगारू कर्णधाराचा जन्म झाला. व्हिक रिचर्डसन त्याच्या खास ठेवणीच्या मिशांसाठी प्रसिद्ध होता. १९३२-३३ च्या हंगामातील शरीरवेधी गोलंदाजीमुळे गाजलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील संघात व्हिकचा समावेश होता. आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात त्याने एका डावात ५ झेल घेतले. या विक्रमाची बरोबरी झालेली आहे पण तो अद्याप मोडला गेलेला नाही. याच सामन्यातील त्याचे सहा झेल हाही विश्वविक्रम होता. हा मात्र मोडला ग्रेग चॅपेल नावाच्या त्याच्या नातवाने १९७४-७५च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply