नवीन लेखन...

हृदयनाथ मंगेशकर यांच्या बद्दल लता दिदींच्या भावना

हृदयनाथ मंगेशकर यांच्या बद्दल मा.लता दिदींच्या भावना.

हृदयनाथ आमच्या पेक्षा लहान असला तरी कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे. त्याचा संगीताचा अभ्यास प्रचंड आहे. अर्थात त्यासाठी त्याने अपार कष्ट घेतले आहेत. त्यातूनच त्याने संगीत क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान व वेगळी शैली निर्माण केली आहे. आमिर खॉं साहेबांचा गंडा त्याने लहानपणीच बांधला. आमचे बाबा गेले ते तेव्हा तो अवघा चार वर्षांचा होता. सतत आजारी असायचा. त्यातच त्याच्या पायाला गंभीर आजार झाल्याने आम्ही सगळेच तेव्हा खूप काळजीत होतो. पुण्याच्या सर्व निष्णात डॉक्टरांना दाखविले. त्याचा पाय कापावा लागेल, तो चालूच शकणार नाही, असे सांगून डॉक्टरांनी आम्हाला घाबरवून सोडले होते. दरम्यान पुण्याहून आम्ही कोल्हापूरला राहायला गेलो होतो. दुखऱ्या पायाचा त्याला प्रचंड त्रास व्हायचा, धड चालता यायचे नाही, आशाच त्याला उचलून घेऊन जायची. अशात जडीबुटी व झाडपाल्याचा उपयोग करून औषधोपचार करणाऱ्या एका खेडवळ दिसणाऱ्या माणसाशी आमची भेट झाली. आम्ही बाळला त्याला दाखविले. त्याने कसलासा  पाला औषध म्हणून दिला आणि पाण्यात गरम करून तो त्याच्या पायावरील जखमेवर बांधायला सांगितला. त्या उपायाने त्याचा पाय बरा झाला, पण पायात थोडासा दोष राहिला.

हृदयनाथने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी मी गायले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांना चालीत बांधून ते अभंग त्याने लोकांपुढे आणले. त्यातील ‘मोगरा फुलला’ या अभंगाची त्याने केलेली चाल, त्या अभंगाचा समजावून दिलेला अर्थ यामुळे मी त्याला माझा ‘गुरू’ मानायला लागले. ‘मोगरा फुलला’ गात असताना तो माझ्यापाशी आला व तो अभंग मला समजावून सांगितला. हा अभंग लिहिताना ज्ञानेश्वर त्यांच्यावर झालेला अन्याय, समाजाने त्यांना दिलेली वागणूक, केलेला छळ हे सगळे विसरून गेले होते. त्यांचे मन, सारा देह आणि विचार हे पूर्णपणे निर्विकार झाले होते असा विचार मी या अभंगाचा केला आहे. जी अवस्था ज्ञानेश्वरांची होती तसा निर्विकार भाव या अभंगातून व्यक्त व्हावा, दीदी ते तुझ्या गळ्यातून यावे, असे बाळने मला समजावून सांगितले. आज इतक्या वर्षांनंतरही या अभंगाची आणि ज्ञानेश्वरांच्या अन्य अभंगांची गोडी कमी झालेली नाही. यातील ‘घनू वाजे रुणझुणा’ सह सर्व अभंग आजही लोकप्रिय आहेत. यात ज्ञानेश्वरांच्या शब्दांचा सर्वात मोठा वाटा आहेच, पण अभंगांच्या चालीचे व संगीताचेही महत्त्वाचे योगदान आहे. बाळने केवळ अभंगांना चाल लावली नाही तर त्याने या सगळ्या अभंगांचा वेगळ्या पद्धतीने विचार केला, त्याचा अर्थ लावला. पुढे आम्ही ‘श्रीमद्भगवद्गीता’ केली. यातील श्लोकांना त्याने भूप, यमन आदी वेगवेगळ्या रागात बांधले. संत मीरा, कबीर, सुरदास यांचेही अभंग आम्ही केले. तसेच हृदयनाथने गालिबही तितक्याच ताकदीने केला. त्याचा गालिब पाकिस्तानातही लोकप्रिय आहे. हे सर्व करताना त्याने प्रचंड वाचन, अभ्यास केला आणि त्या सगळ्यासाठी मी त्याला माझा ‘गुरू’ मानते.
‘भावसरगम’ करण्यापूर्वी हृदयनाथ मराठी/हिंदी गाण्यांचा एक कार्यक्रम करायचा. त्यावेळी या कार्यक्रमात उषा, मीना ही गायल्या आहेत. हृदयनाथबरोबर तेव्हा प्यारेलाल, त्याचा भाऊ गोरख, आनंद, लक्ष्मीकांत आणि इतर मंडळी या कार्यक्रमात असायची. एकदा एका कार्यक्रमाला मी गेले होते. कार्यक्रम सुरू असताना  हृदयनाथने मला व्यासपीठावर बोलाविले आणि एक गाणे गायला सांगितले त्याच्या विनंतीला मान देऊन मी त्या वेळी एक गाणे म्हटलेही. त्यांच्या एका कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार नौशाद आले होते. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गाण्याची धून हृदयनाथने अगदी बरोबर वाजविली की नौशादजींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली. पुढे हृदयनाथने हाच गाण्यांचा कार्यक्रम ‘भावसरगम’ या नावाने सुरू केला. आज या कार्यक्रमाचेही सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

हृदयनाथची गाणी म्हणायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष गाताना ती किती कठीण असतात ते कळते. त्याचा जास्त ओढा कठीणतेकडेच आहे. त्याच्याकडे मी अनेक गाणी गायली आहेत. प्रत्येक गाणे गाताना मला खूप भीती वाटायची, आपली फजिती तर होणार नाही ना, असे वाटायचे. ‘मी डोलकर डोलकर’, ‘माझ्या सारंगा’ ही गाणी तशी सोपी आहेत पण ‘ मालवून टाक दीप’, ‘घन तमी शुक्र बघ राज करी’ ही व अन्य गाणी गायला कठीण आहेत. त्याला रागाचे, तालाचे आणि सुराचे ज्ञान खूप चांगले आहे. प्रत्येक गाणे संगीतबद्ध करताना त्याने या सगळ्याचा पुरेपूर वापर केला आहे. त्यामुळे विविध शैलीतील गाणी त्याने दिली असून ती सर्व गाणी इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या गळ्यात आणि ओठावर आहेत. कोणत्या चांगल्या कवितेचे उत्तम गाणे होऊ शकते याची नेमकी जाण त्याला आहे. त्यामुळे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, ग्रेस, सुरेश भट यांच्या चांगल्या कविता ही उत्तम गाणी म्हणून रसिकांपुढे आली. संगीत या कलेबरोबरच त्याच्याकडे उत्तम लेखनकलाही आहे. तो छान लिहितो.

मी, आशा, मीना, उषा आम्हा सगळ्या बहिणींचा तो लाडका भाऊ आहे. आम्हा सर्व बहिणींसाठी तो सर्वस्व आहे.

लता मंगेशकर
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

हृदयनाथ मंगेशकर यांची अजून काही गाणी.
ये आखें देख कर.
ही वाट दूर जाते.
उष्काल होता होता.
मी डोलकर डोलकर दर्याचा राजा
चांदण्यात फिरताना.
आनंदवन भुवनी.
ने मजसी ने.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..