होळी रे होळी ! पुरणाची पोळी ! ही आरोळी हल्ली तितकीशी ऐकायला मिळत नाही म्हणून आपल्या संस्कृतीतील होळीचे महत्व कमी झालेले आहे असे मानण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रात खास करून कोकणात होळी या उत्सवाला असाधारण महत्व आहे. होळी हा सण त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. होळी हा एकमेव सण आहे जो कोकणातील लोकांच्या उत्साहाचा प्रतीक आहे. कोकणातील लोक पोटापाण्यासाठी मुंबई सारख्या शहराकडे वळली आणि पांढरपेशा जीवन जगू लागले. होळी हा एकमेव सण आहे ज्याने पांढरपेशा लोकांना कोकणाशी जोडून ठेवलेले आहे अगदी मनापासून ! आणि कदाचित पुढची काही वर्षे जोडून ठेऊ शकेल ! असो इतक्यात होळीवरच प्रश्नचिन्ह उभं करण योग्य नाही ! शेकडो वर्षापासून चालत आलेली वारकरी परंपरा खंडीत झाली का ? नाही ना ? कोकणात तशीच कदाचित होळीची परंपरा खंडित होणार नाही. आपल्या राज्यात एक सुशिक्षित विचारी पिढी जन्माला आलेय ती पिढी आपल्या उत्सवातील चांगल्या गोष्टी हेरून ते उत्सव आणि आपली संस्कृती समर्थपणे पुढे नेत आहेत आणि नेत राहतील. होळी हा उत्सव महाराष्ट्रातील काही भागात आणि देशात दोन दिवसाचा अथवा एक दिवसाचाच असतो पण कोकणात होळी दहा दिवस साजरी केली जाते. दहाव्या दिवशी मोठा होम पेटवला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धुळवट अर्थात रंगपंचमी साजरी केली जाते. देशभरात साजरी होणारी रंगपंचमी आणि कोकणातील रंगपंचमी यात अंतर आहे. होळीनंतर कोकणात प्रत्येक घरात देवाची पालखी येते जिची पूजा करण्यासाठी लोक अगदी परदेशात असणारे ही काही लोक कोकणात येतात त्यांच्या कोकणातील घरात ! आपल्या घराच्या दारात येणाऱ्या पालकीची पूजा करण्यासाठी ! देशातील प्रत्येक प्रांतात होळी थोडी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जात असेल पण मुंबईत साजरी होणारी होळी महाराष्ट्रात परंपरागत साजऱ्या होणाऱ्या होळीपेक्षा वेगळी असते कारण मुंबईत सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र सण साजरे करतात त्यामुळे मुंबईत सणांना म्हणजे सण साजरे करण्याला एक वेगळं स्वरूप काहीस विद्रुप स्वरूपही प्राप्त झालेले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही ! त्यामुळे होळी या उत्सवाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तो कोकणातच !
कोकण आणि होळी यांचे कोकणातील मराठी माणसाच्या मनात काय स्थान आहे हे स्पष्ट करणारी एक घटना आठवते ! एका परप्रांतीय माणसाच्या कारखान्यात कोकणातील एक मराठी तरुण नोकरी करत होता , तो तरुण नचुकता होळीला गावी जात असे ! होळीसाठी त्याने मालकाकडे रजा मागितली तर मालक नाही म्हणाला त्यावर तो मालकाला म्हणाला ,रजा नाही दिली तरी मी जाणारच ! त्यावर मालक म्हणाला, नोकरी सोड आणि मग जा ! त्यावर तो तरुण क्षणाचाही विचार न करता म्हणाला , ठीक आहे ! मी नोकरी सोडतो ! त्या मालकाला अजून प्रश्न पडतो साला इस होळी में ऐसा क्या हैं ? त्या मालकाने जर कोकणातील होळी अनुभवली असती तर कदाचित त्याला हा प्रश्न पडला नसता. या अशा अशा घटना घडण्याला कोकणातील लोकांच्या श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा कारणीभूत आहेत. होळी या उत्सवाच्या बाबतीत कोकणातील लोक श्रद्धा- अंधश्रद्धा या पलीकडे गेलेले आहेत . होळीला उपस्थित राहणे ही काहींची परंपरा झालेली आहे. कोकणातील माणूस जगात कोठेही राहात असो कोकणातील होळीच्या होमात एकदा नारळ टाकणे ही त्याचे स्वप्न असते. जेंव्हा कोकणात मनोरंजनाची फारशी साधने नव्हती अर्थात वीजही नव्हती तेव्हा मनोरंजनाचा उत्साहाचा एक स्त्रोत म्हणून कोकणातील लोकांनी होळीकडे पाहिले असावे ! हा आनंद जास्तीत जास्त उपभोगता यावा म्हणून होळी दहा दिवस त्यानंतर देवाची पालखी दरात येण आणि त्या कारणाने मुंबई व बाहेर गेलेले कोकणातील चाकरमनी कोकणात रजेवर यायचे ! आपल्या बायका पोरानंसोबत चार दिवस आनंदाचे उत्साहाने उत्सवाचे घालवायचे ! आता हे चित्र बदललं तरी परंपरा तशीच राहिली कारण आजच्या धावपळीच्या जगण्यात ही लोकांना उत्साह उत्सवातच शोधावा लागतोय दुर्दैवाने !
आजकाळ मुंबईतही वर्गणी काढून होळ्या पेटवल्या जातात त्यांना नारळ अर्पण केली जातात अगदी उत्साहाने पण त्यात खऱ्या श्रद्धेचा भाग किती असतो हे त्या होळीलाच ठाऊक ! दुसऱ्या दिवशी रंगपंचमी जिला परप्रांतीय होळी म्हणतात त्या दिवशी मुंबईत सारे जाती भेद लिंग भेद विसरून रंगांची उधळण केली जाते. कोकणात मात्र आजही या दिवशी कोरडा गुलाल लावला जातो. हल्ली वृक्षतोड थांबविण्यासाठी अथवा झाडे वाचविण्यासाठी नौसर्गिक इंधनाची बचत करण्यासाठी होळीवर बंदी घालण्याची ओरड केली जाते पण हे फारच अतर्कीय वागणे आहे. कोकणात आजही जंगलाची कमी नाही अगदी घराच्या आजूबाजूला जंगले वाढलेली दिसतात त्यात होळीसाठी सुकी लाकडे वापरली जातात आणि फक्त लाकडेच वापरली जातात असेही नाही गवत पाला – पाचोलाही वापरला जातो आपले पूर्वज फार हुशार होते त्यांच्या साऱ्या गोष्टी आपण अंधश्रद्धेच्या चौकटीत बसवून मोकळे होतो आणि तेथेच आपण चुकतो. गावो गावी होळी दहन झाल्यामुळे हवेत थोडी उब येते वातावरण शुद्ध आणि प्रफुल्लित होते आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उत्साह वाढतो लोकांच्या मनात काही नवीन करण्याची उमेद जागी होते.
मुंबईसारख्या शहरात हल्ली होळीचा उत्साह कमी झालेला दिसतो कारण तो उत्सव साजरा करण्याचे स्वरूप आता बदलले आहे नव्हे ते विकृत झालेले आहे. पूर्वी लोक होळीला एकमेकांवर फक्त रंगीत पाणी टाकायचे ! सुके रंग तोंडाला फासायचे आणि होळीच्या शुभेच्छा द्यायचे पण हल्ली पाण्याने भरलेले फुगे पिशव्या मारल्या जातात. चेहऱ्याला ओईल पेंट लावला जातो, होळीच्या नावावर स्त्रियांची छेड काढली जाते, त्यांच्याशी अश्लील वर्तन केले जाते, काही स्त्रियाही अंगप्रदर्शन करतात या निमित्तान हा भाग वेगळा ! काही लोक इतरांवर अशुद्ध पाणी टाकणे अंडी मारणे असले प्रकारही करतात, मनोरंजनाच्या नावावर धांगड धिंगा चालतो थंडाई मनसोक्त पितात आणि मग दिवसभर मनसोक्त झिंगतात काही दारूनेही झिंगतात हे वेगळे सांगणे नाही ! मुंबईतील होळीत फक्त उत्साह दिसतो श्रद्धा कोठेच दिसत नाही जी कोकणात दिसते !
होळीचा महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी जो होळीला नैवद्य म्हणून दाखविला जातो ही पुरणपोळी दूर परदेशातही प्रसिद्ध आहे म्हणे ! महाराष्ट्रात ज्या स्त्रीला पुरणपोळी उत्तम तयार करता येते त्या स्त्रीला सुगरण समजले जाते, पुरणपोळी बनविणे हे इतके किचकट काम असते. कोकणात होळीला दहा दिवस अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ज्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असतो, गावातील अनेक हौशी कलाकार आपली कला लोकांसमोर सादर करतात ज्या कलाकारांमधून काही व्यावसायिक कलाकारही जन्माला येतात बहुदा ! हल्ली कोकणातही मनोरंजनाची बरीच माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हे आता हळूहळू कमी होत चालले आहे पण होळीचा उत्साह आजही कायम आहे . होळी हा उत्सव निदान कोकणात तरी बंद होणे अशक्य आहे कारण या उत्सवाशी लोकांची श्रद्धा जोडली गेलेली आहे . आजही कोकणात होळीला नारळ टाकून नवस बोलले जातात , पूर्ण झाल्यास ते फेडले जातात नाही पूर्ण झाले तर पुन्हा माफी मागून केले जातात, पण होळीवर कोणाचा राग नसतो , संतुष्ट कोकणातील माणूस देवभोळेपणात देशात नंबर एकवर असेल कदाचित ! कोकणातील होळीचा श्रद्धा – अंधश्रद्धा हा भाग सोडला तर कोकणातील होळी खरंच उत्साहवर्धक आणि लोकांना तिच्याकडे आकर्षित करण्यासारखी आणि गुंतवून ठेवण्यासारखीच असते हे सत्य नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येकाने एकदातरी कोकणातील होळी अनुभवायला हवी ! मग त्यांना कळेल होळी म्हणजे नुसता धांगड धिंगा नसतो फक्त रंगांची उधळण नसते तर उत्साहाचा झरा आहे ज्या झाऱ्यातील पाणी लोक होळीला पितात आणि पुढे वर्षभर उत्साही राहतात…
लेखक – निलेश दत्ताराम बामणे
202, ओमकार टॉवर, जलधारा ( एस आर ए ), बी -विंग, गणेश मंदिर समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ६५.
मो. ८१६९२८२०५८
नमस्का
– उत्तम लेख. कोकणात न रहाणार्यांना किंना न गेलेल्या लोकांना यातून खूप माहिती मिळेल.
– आपण होळी दहा दिवस चालते म्हणतां, तें बरोबरच असेल. पण मी स्वत: गुढी पाडव्यालाही होळीनिमित्तचें नृत्य वगैरे चालूं असलेले कोकणात ( देवरुखला ) पाहिलेलें आहे. म्हणजे १५ दिवसांचा सण झाला .
– सुभाष स. नाईक