गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे.
जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनार्यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
।। ॐ गं गणपतयेनम : ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply