१० डिसेंबर २००५ रोजी सचिन तेंडुलकरचे पस्तिसावे कसोटी शतक आले. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर श्रीलंकेविरुद्ध. अकरा महिन्यांपूर्वी त्याने सुनील गावसकरच्या ३४ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली होती. त्यानंतरचे त्याचे शतक येण्यास अंमळ उशीरच झाला हे खरे पण या काळात तो केवळ पाचच कसोट्या खेळला हेही लक्षणीय.
सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील काही लक्षणीय गोष्टींवर एक नजर…
सर्वाधिक कसोट्या खेळण्याचा विक्रम (आजवर १७४ कसोट्या). दुसर्या क्रमांकावर असणार्या स्टीव वॉने ऑस्ट्रेलियातर्फे १६८ कसोटी सामने खेळलेले आहेत.
कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक धावा. कसोटी सामन्यांमध्ये १२,००० चा पल्ला गाठणारा पहिला खेळाडू. अर्थातच त्यानंतरची प्रत्येक धाव विक्रमी.
सर्वांत कमी डावांमध्ये १०,००० धावांचा पल्ला गाठण्याचा मान. ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर या दोघांनीही आपापल्या एकशे पंचाण्णवाव्या डावांमध्ये दहा हजारावी धाव घेतली आहे. १०,००० धावांचा पल्ला गाठणारा दुसरा भारतीय खेळाडू.
११,००० धावांचा पल्ला गाठणारा पहिला भारतीय आणि तिसरा जागतिक खेळाडू (अॅलन बॉर्डर आणि ब्रायन लारा यांच्यानंतर).
मायदेशाबाहेर झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा मान.
सर्वाधिक कसोटी शतके (४९). वयाची विशी उलटण्याआधी पाच शतके काढणारा एकमेव खेळाडू.
कर्णधार म्हणून भारतातर्फे खेळताना एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा मान : २१७ धावा (वि. न्यूझीलंड, अहमदाबाद, प्रारंभ २९ ऑक्टोबर १९९९).
भारतातर्फे कारकिर्दीत सर्वाधिक सरासरी (५५.५६).
एकाच डावात आघाडीच्या चार फलंदाजांनी वैयक्तिक शतके झळकावण्याचा प्रसंग इतिहासात फक्त एकदाच घडलेला आहे. बांग्लादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत दिनेश कार्तिक (१२९), वसिम जाफर (१३८), राहुल द्रविड (१२९) आणि सचिन तेंडुलकर.
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत तो ‘तसा’ खूपच मागे आहे. दोन जानेवारी २००४ मध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या कसोटीत त्याने केलेल्या ३०१ धावा
(नाबाद २४१ आणि नाबाद ६०) ही त्याची एका कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. ४५६ धावांसह या यादीत इंग्लंडचा ग्रॅहम गूच प्रथम स्थानी असून सचिनची कामगिरी ४४ व्या स्थानी येते. सचिनच्या आधी या यादीत सुनील गावसकर, वांगीपुरपू लक्ष्मण, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग (दोनदा) आणि राहुल द्रविड हे भारतीय येतात.
एका कसोटी मालिकेत ६०० धावा करणाऱ्या जागतिक खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नाही. सुनील गावसकर (दोनदा), दिलीप सरदेसाई आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केलेला आहे.
एका कॅलेन्डर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत तो दहावा येतो. याच यादीत आठव्या व नवव्या स्थानावर अनुक्रमे वीरेंदर सेहवाग आणि सुनील गावसकर आहेत.
कसोटी कारकिर्दीत सरासरीच्या बाबतीतही तो तसा मागे आहेः चौदावे स्थान (५५.५६). किमान ९,००० धावा हा निकष घेतला तरी रिकी पॉन्टिंग त्याच्यापेक्षा सरासरीत सरस ठरतो (५५. ६७).
कसोटीच्या दोन्ही डावांत शतके नोंदविण्याची कामगिरी अद्याप सचिनकडून झालेली नाही. सुनील गावसकर (तब्बल तीन वेळा), विजय हजारे आणि राहुल द्रविड या भारतीयांनी ही कामगिरी केलेली आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध दहा कसोटी शतके काढणारा सचिन हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. जॅक हॉब्जने ऑस्ट्रेलियाविरूद्ध बारा शतके केलेली आहेत. एका देशाविरूद्ध सर्वाधिक शतके काढण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावांवर आहे (इंग्लंडविरूद्ध १९ शतके). या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सुनील गावसकर आहे (वेस्ट इंडीजविरूद्ध १३ शतके).
सलग कसोटी डावांमध्ये शतके : भारतातर्फे राहुल द्रविड (४), सुनील गावसकर, विजय हजारे आणि विनोद कांबळी (प्रत्येकी ३). सलग दोन डावांमध्ये शतके काढण्याची कामगिरी सचिनने दोनदा केलेली आहे. आपल्या शेवटच्या दोन डावांमध्ये शतके काढलेली असल्याने हा विक्रम करण्याची त्याला संधी आहे.
सलग चार कसोटी सामन्यांमध्ये शतके करणाऱ्यांमध्ये (सुनील गावसकर आणि राहुल द्रविडप्रमाणे) तो आहे. गौतम गंभीरने मात्र सलग पाच सामन्यांमध्ये शतके रचण्याचा पराक्रम केलेला आहे.
भारतातर्फे सर्वात लहान वयात कसोटी शतक ठोकण्याचा विक्रम.
कसोटी सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकर ९९ धावांवर आजपर्यंत कधीही बाद झालेला नाही किंवा ९९ वर तो नाबादही राहिलेला नाही. सचिनच नव्हे, कोणताही भारतीय आजवर ९९ धावांवर नाबाद राहिलेला नाही.
सलग किमान पाच डावांमध्ये अर्धशतके करणाऱ्या भारतीयांमध्ये सचिनचा समावेश नाही. ही कामगिरी गुंडाप्पा विश्वनाथ, राहुल द्रविड, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेली आहे.
कसोटी सामन्यांमध्ये ओळीने सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा विक्रम (व्हिव्हिअन रिचर्ड्ससोबत) गौतम गंभीरच्या नावांवर आहे (११ सामने). सचिनने सलग आठ सामन्यांमध्ये अर्धशतके नोंदविलेली आहेत.
कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक चौकार ठोकण्याचा जागतिक विक्रम सचिनच्या नावावर आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply