११ डिसेंबर १९२९ रोजी मुंबईत सुभाषचंद्र पंढरीनाथ ‘फर्जी’ गुप्तेंचा जन्म झाला. भारतीय क्षितिजावरीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी सुभाषजी एक होते. सर गॅरी सोबर्स यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बघितलेल्या लेगस्पिनर्समध्ये सुभाष गुप्तेंचा क्रमांक पहिला लागतो.
चेंडूला फिरक देण्याची क्षमता आणि उंची (फ्लाईट) बदलविण्यातील हातोटी ही गुप्तेंच्या गोलंदाजीची बलस्थाने होती. १९५८-५९ मध्ये भारतीय दौर्यावर आलेल्या वेस्ट इंडियन खेळाडूंच्या म्हणण्यानुसार सुभाष गुप्ते अगदी काचेवरही चेंडू वळवू शकत असे. फलंदाजाने आक्रमक रूख़ अंगिकारल्यास मात्र गुप्ते काहीसे धास्तावतात असेही निरीक्षण या संघातील खेळाडूंनी नोंदविलेले आहे.
१९५१-५२ च्या हंगामात गुप्तेंचे कसोटीपदार्पण झाले आणि पुढच्याच हंगामापासून विनू मंकड यांची जागा गुप्तेंनी भरून काढली. नंतर झालेल्या वेस्ट इंडीज दौर्यात २७, न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत ३४ बळी गुप्तेंनी मिळविले. कानपूरमध्ये १९५८-५९ च्या हंगामात एकाच डावात नऊ गडी त्यांनी बाद केले होते. लान्स गिब्ज हा एकटाच फलंदाज त्यांच्याकडून बाद झाला नव्हता, नरेन ताम्हाणेंकडून (यष्टीरक्षक) गुप्तेंच्या गोलंदाजीवर गिब्जचा एक झेल सुटलेला होता !
बॉम्बेसाठी खेळताना बहावलपूरविरुद्ध एकाच डावात दाही गडी त्यांनी बाद केले होते आणि लँकेशायर लीगमध्येही अशी कामगिरी त्यांनी केली होती.
१९६१-६२ च्या हंगामात अत्यंत दुर्दैवी तरीक्याने गुप्तेंची क्रिकेट कारकीर्द संपली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीच्या इम्पिरीअल हॉटेलात भारतीय संघ थांबलेला असताना ए जी कृपालसिंग (अमृतसर गोविंदसिंग हे कुलनाम, कृपालसिंग हे त्यांचे नाव) हे सुभाषजींचे खोलीभाऊ होते. कृपालसिंगांनी खोलीतून रिसेप्शनिस्टला दूरध्वनी केला आणि शिफ्ट संपल्यानंतर तिला खोलीत बोलावले. तिने भारतीय व्यवस्थापकाकडे तक्रार केली. व्यवस्थापक होते पूर्वी लष्करात नोकरी केलेले. झाले- दोन्ही खेळाडूंना शिक्षा देण्याचे मंडळाने ठरविले. कृपालसिंगांना हॉटेलचा फोन वापरण्यापासून का रोखले नाही म्हणून गुप्तेंवर बडगा आला. “तो एवढा मोठा
माणूस. मी कसा सांगणार?” असे
गुप्तेंचे म्हणणे होते. “तिच्यावर कृपालसिंगांनी काही **** केला नव्हता, एका ड्रिंकसाठीच विचारले होते” असेही गुप्तेंनी सांगितले.
या दोघाही खेळाडूंचा पुन्हा निवडीसाठी विचार झाला नाही. तोवर सुभाषजींनी ३६ कसोट्यांमधून १४९ बळी मिळविलेले होते. दोन वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये (वेस्ट इंडीजमधीलच) एक छोकरी पसंत करून तिच्याशी त्यांनी लग्न केले होते. त्रिनिदादलाच जाऊन मग गुप्तेजी स्थायिक झाले. मे २००२ मध्ये तिकडेच त्यांचे निधन झाले.
मिहिर बोस यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट’ या आपल्या पुस्तकात गुप्तेंबद्दल म्हटले आहे, “एका मुलीसोबत ड्रिंक घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसोबत एका खोलीत असल्यामुळे ज्याची कारकीर्द संपुष्टात आली असा भारताचा पहिला ग्रेट स्पिनर.”
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply