१९२४ : भारताचे एक माजी कसोटीपटू रुस्तमजी शेरियार ‘रुसी’ मोदी यांचा जन्म. मुंबईतील पंचरंगी सामन्यांमधून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ करणार्या मोदींनी रणजी स्पर्धा आपल्या सातत्यामुळे गाजविली आहे. १९४३-४४ आणि १९४४-४५ या हंगामात रणजी स्पर्धांमधील सात सामन्यांमधील त्यांची फलंदाज म्हणून कामगिरी अशी होती : महाराष्ट्राविरुद्ध १६८, पश्चिम विभागाविरुद्ध १२८, सिंधविरुद्ध १६०, पश्चिम
विभागाविरुद्ध २१०, बडोद्याविरुद्ध नाबाद २४५ आणि ३१, उत्तर विभागाविरुद्ध ११३ आणि होळकरांविरुद्ध ९८ आणि १५१. सलग पाच डावांमध्ये शतके आणि सलग सात सामन्यांमध्येही शतके. या शृंखलेतील अखेरच्या पाच सामन्यांमधील त्यांचा धावांचा योग १००८ एवढा येतो. पाच सामन्यांमधून हजाराच्यावर धावांचा रुसींचा हा विक्रम चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकला. वयाची उणीपुरी २० वर्षेही झालेली नसताना त्यांनी हा पराक्रम केला हे विशेषच !
लॉर्ड्सवरच्या कसोटीत पदार्पणात त्यांनी नाबाद ५७ धावा काढल्या होत्या. यादरम्यान अखेरच्या गड्यासाठी त्यांनी ६३ धावा जोडल्या होत्या. १९४७-४८ च्या हंगामातील ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी त्यांची निवड झाली होती पण प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी माघार घेतली. तब्बल सहा फूट उंच असणार्या रुसींची प्रकृती तशी तोळामासाच होती.
विंडीजविरुद्धच्या मालिकेत घरच्या मैदानांवर त्यांनी पाच कसोट्यांमधून एक शतक आणि पाच अर्धशतकांसह ५६० धावा काढल्या. त्यांनी या मालिकेत काढलेल्या एका डावातील ११२ धावा हे ब्रेबॉर्न मैदानावरील पहिले कसोटी शतक होते. नंतर मात्र व्यावसायिक कार्यबाहुल्यामुळे ते फारसे क्रिकेट खेळू शकले नाहीत. ते टेबलटेनिसही उत्तम खेळत. दहा कसोट्यांमधून शेहेचाळीसच्या पारंपरिक सरासरीने त्यांनी ७३६ धावा काढल्या. क्रिकेट फॉरेव्हरसहित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
१९४२ : वेस्ट इंडीजचे सलामीवीर रॉय फ्रेड्रिक्स यांचा जन्म. नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रॉय यांनी ५९ कसोट्यांमधून ४३३४ धावा काढल्या. पारंपरिक सरासरी ४२.४९. त्यांच्या काळात एदिसा फारसे लोकप्रिय नव्हते. एक डझन एदिसांमधून त्यांनी ३११
धावा जमविल्या.
समकालीन सलामीचे फलंदाज चेंडू अडवून काढण्यात आणि शक्य तितके चेंडू सोडून देण्यात धन्यता मानत असताना आणि मधल्या फळीतील फलंदाज डावाच्या संयमी बांधणीला महत्त्व देत असताना रॉय यांनी आक्रमक फलंदाजी करीत आपला वेगळेपणा सिद्ध केला. १९७० च्या दशकात गॉर्डन ग्रिनीजच्या साथीला फ्रेड्रिक्स आल्याने सलामीच्या जोडीचा गंभीर प्रश्न विंडीज संघाला सोडविता आला. सलामीची ‘जोडी’ सापडणे ही कर्मकठीण गोष्ट असते. ‘सलामीचा फलंदाज जन्मालाच यावा लागतो’ असे अनेक निवडकर्त्यांचे मत आहे.
डिसेम्बर १९७५ मधील पर्थ कसोटीत रॉय यांनी अवघ्या १४५ चेंडूंमध्ये १६९ धावा सलामीला येऊन तडकावल्या होत्या. समोरच्या संघात डेनिस लिली, जेफ थॉम्सन, गॅरी गिल्मूर असे गोलंदाज असूनदेखील. त्यानंतर झालेल्या इंग्लंड दौर्यात त्यांनी ५१७ धावा जमविल्या, केवळ पाच कसोट्यांमधून.
फोर्ब्स बर्नहॅमच्या कारकिर्दीत फ्रेड्रिक्स गुयानाचे क्रीडामंत्री होते. सप्टेंबर २००० मध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply