१९१० : क्रिकेटमधून निवृत्त होतेवेळी सर्वाधिक कसोटी सरासरी राखणारा दक्षिण आफ्रिकी ठरलेल्या आर्थर डडली नोर्स यांचा जन्म. आजमितीसही केवळ जॅक्स कॅलिस व ग्रॅएम पोलॉक या दोघा प्रोटियांची सरासरीच त्यांच्याहून सरस असल्याचे आढळते.
डडलीचे पिताश्रीदेखील एक नावाजलेले फलंदाज होते. डेव नोर्स नामक या असामीने कांगारुंच्या भूमीच्या दौर्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक काढले होते. या द्विशतकानंतर काही दिवसांतच त्यांना पुत्रप्राप्ती झाली. विल्यम वॉर्ड (डडली नगराचे दुसरे अर्ल) ह्या ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन गव्हर्नर-जनरलला ही बातमी कळाल्यावर त्यांनी या बालकाला आपले नाव दिले जावे अशी इच्छा प्रदर्शित केली आणि डडली हे नाव त्या बालकाला मिळाले.
१६ वर्षांच्या सुदीर्घ कारकिर्दीत डडली एकूण ३५ कसोट्या खेळले आणि त्यांपैकी १५ सामन्यांमध्ये त्यांनी प्रोटिआंचे नेतृत्व केले. या ३५ सामन्यांमधून त्यांनी ५३ ची सरासरी राखली आणि विशेष म्हणजे यांपैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये त्यांचा संघ विजयी झाला. १९५१ च्या ट्रेंटब्रिज कसोटीतील खेळीसाठी ते खास प्रसिद्ध आहेत. वयाच्या चाळिसाव्या वर्षी, अंगठा मोडलेला असताना दहा तास फलंदाजी करीत या सामन्यात त्यांनी २०८ धावा काढल्या. त्यांच्या ह्या खेळीच्या जोरावरच प्रोटियांनी तब्बल १६ वर्षांमधील आपला पहिला कसोटीजय साकार केला.
कसोटी पदार्पणासाठी एखाद्या खेळाडूला ९ दिवस वाट पहावी लागली हे खरेतर कुणाला चटकन पटण्यासारखे नाही पण न्यूझीलंडच्या रॉजर टूजच्या नशिबी असे प्रतिक्षेचे नऊ दिवस आलेले आहेत. भारत दौर्यावरील संघातच नव्हे तर खेळणार्या ११ जणांमध्ये निवड होऊनही टूजला अशी वाट पहावी लागली.
तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसर्या कसोटीत टूजचे अधिकृत पदार्पण झाले. मद्रासमधील या सामन्यात पावसाने थैमान घातले आणि क्षेत्ररक्षणासाठी देखील टूजला मैदानात उतरावेच लागले नाही. कटकमधील तिसर्याध सामन्यात केवळ १७८ षटकांचाच खेळ झाला. न्यूझीलंडचा पहिला डावच मुळी पाचव्या दिवशी सुरू झाला. मार्क ग्रेटबॅचसोबत सलामीला
आलेल्या टूजला खेळण्याची हौस भागवून घेण्याची संधी अखेर मिळाली आणि त्याने तिचा पुरेपुर फायदा उठविला. ३६ धावांसाठी त्याने तब्बल १७० चेंडूंचा सामना केला – अवघा एक चौकार त्याने मारला. कसोटीपटू म्हणून खेळपट्टीवर उभे राहण्याची हौस त्याने सुमारे साडेतीन तास टिकविली. अखेर चष्मेबहाद्दर नरेंद्र हिरवानीने त्याला बाद केले.
कसोटीवीर ठरलेला हिरवानी सुमारे पाच वर्षांच्या खंडानंतर कसोटी खेळत होता. ३१ षटके गोलंदाजी करताना त्याने ५९ धावा देत ६ गडी बाद केले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply