९ डिसेंबर १९६० रोजी ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान फ्रँक-वॉरेल चषकातील पहिली कसोटी सुरू झाली. १४ डिसेंबरला हा सामना बरोबरीत सुटला. कसोटिहासातील बरोबरीत अडकलेला हा पहिलाच सामना. हा सामना अशा प्रसिद्धीबरोबरच उत्कृष्ट क्रिकेटसाठीही प्रसिद्ध आहे.
सामन्याच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २३३
धावा हव्या होत्या. वेस हॉलच्या तोफगोळ्यांचा सामना करता-करता ऑस्ट्रेलियाई फलंदाजांनी आपले अभियान सुरूच ठेवले होते पण ५७ धावांवर त्यांचा निम्मा संघ गारद झाला. सहावा गडी ९२ वर बाद झाला. मग मात्र अॅलन डेविडसन आणि रिची बेनॉ यांनी सातव्या जोडीसाठी १३४ धावांची भागीदारी करीत या कसोटीत रंगत आणली. खेळ संपण्यास तासाभराच अवकाश असताना कांगारूंना जिंकण्यासाठी २७ धावांची आवश्यकता होती. याच वेळी वेस्ट इंडीजने नवा चेंडू घेतला.
इथवर या सामन्यात वेस्ट इंडीजचे क्षेत्ररक्षण यथातथाच राहिले होते पण या तासात मात्र विंडीज क्षेत्ररक्षक चेतून उठले. ऑस्ट्रेलियाच्या बाद झालेल्या अखेरच्या चार फलंदाजांपैकी तीन फलंदाज धावबाद झालेले होते. बेनॉला एक एकेरी धाव हवी असताना सॉलोमनची फेक थेट यष्ट्यांना धडकली आणि डेविडसन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या वॉली ग्राऊटने एक धाव घेतली आणि अशा तर्हेने शेवटच्या अष्टकात त्रैराशिक ऑस्ट्रेलियाला विजयासाठी सहा धावा आणि ३ गडी शिल्लक असे आले.
अखेरच्या षटकासाठी चेंडु वेस्ली हॉलकडे. पहिला चेंडू लागला ग्राऊटच्या मांडीला आणि एक लेग-बाय निघाली. रिची बेनॉ दुसर्या चेंडूवर यष्टीरक्षक अॅलेक्झांडरकडे झेल देऊन बाद झाला. इअन मेकिफने तिसरा चेंडू हॉलकडे फटकावला, धाव मिळाली नाही. चौथा चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला आणि मेकिफ-ग्राऊट धावले. यष्टीरक्षकाची फेक हॉलला नीट घेता न आल्याने मेकिफ धावबाद होता होता राहिला. ग्राऊटने पाचवा चेंडू हवेत उंच कोलला, हॉलने झेलण्याचा प्रयत्न केला पण तो फसला, दरम्यान ऑस्ट्रेलियाला एक धाव मिळाली. मेकिफने मग सहावा चेंडू उंचावरून मारला. कोन्राड हन्टने सीमारेषेजवळ चेंडु अडवून नीटपणे जोरात गोलंदाजाकडे टाकला. या खेपेला हॉलने फेक नीट घेतली आणि ग्राऊट धावबाद झाला.
आता अखेरचे दोन चेंडू शिल्लक, धावा समसमान आणि शेवटची जोडी मैदानात. सातवा चेंडू अकरावा फलंदाज लिंडसे क्लाईनने स्क्वेअर लेगला मारला, मेकिफ आधीच धावला होता पण यष्ट्यांची रुंदी एवढेच लक्ष्य समोर असूनही जो सॉलोमनने अचूक वेध घेतला, मेकिफ धावबाद झाला. ऑस्ट्रेलिया सर्वबाद २३२.
संक्षिप्त धावफलक : विंडीज पहिला डाव सर्वबाद ४५३ (गॅरी सोबर्स १३२, फ्रँक वॉरेल आणि जो सॉलोमन प्रत्येकी ६५, अॅलन डेविडसन ५-१३५) ऑस्ट्रेलिया पहिल डाव सर्वबाद ५०५ (नॉर्म ओ’नेल १८१, बॉब सिम्प्सन ९२, वेस्ली हॉल ४-१४०) विंडीज दुसरा डाव सर्वबाद २८४ फ्रँक वॉरेल ६५, रोहन कन्हाई ५४, अॅल्न डेविडसन ६-८७) ऑस्ट्रेलिया दुसरा डाव सर्वबाद २३२ (अॅलन डेविडसन ८०, रिची बेनॉ ५२, वेस्ली हॉल ५-६३).
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply