१६ ऑक्टोबर १९५२ : पाकिस्तान कसोटी खेळणारे सातवे राष्ट्र बनले. पूर्वीच्या संघांच्या इतिहासाप्रमाणेच त्यांचा सुरुवातीला चोळामोळा झाला. लाला अमरनाथ या सामन्यात भारताचे कर्णधार होते. त्यांचा जन्म ‘आताच्या’ पाकिस्तानात झालेला होता. भारताने हा सामना एक डाव आणि ७० धावांनी जिंकला. अब्दुल कारदर यांनी या सामन्यात पाकचे नेतृत्व केले. हनिफ मोहम्मद यांनी पाकतर्फे पहिले अर्धशतक काढण्याचा मान मिळविला. खान मोहम्मद याने पंकज रॉय यांना बाद करून पहिला बळी नोंदविला. दुसरे सलामीवीर विनू मंकड हे त्याच्याकडूनच आणि त्रिफळाबादच झाले. पाकिस्तानच्या कसोटीइतिहासातील पहिला गडी झेलबाद झाला. इसरार अलीला बाद करून पहिला पाक बळी घेणारे गोलंदाज विनू मंकड ठरले. या पहिल्या डावात त्यांनी ८ पाकींना बाद केले. भारताच्या पहिल्या डावात हेमू अधिकारी आणि गुलाम महम्मद यांनी शेवटच्या गड्यासाठी तब्बल १०९ धावांची भागीदारी केली. पाकची चिकाटी मात्र फार लवकर दिसून आली. पुढचाच सामना त्यांनी जिंकला.
क्रिकेटिहासातील मोठमोठ्या अष्टपैलू खेळाडूंच्या तुलनेला सहज पुरू शकेल अशा जॅक्स रुडॉल्फ कॅलिसचा जन्म १६ ऑक्टॊबर १९७५ रोजी झाला. कसोटीमध्ये अर्धशतकाहून अधिक पारंपरिक सरासरी, दहा हजाराहून अधिक धावा आणि उमद्या उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीसह त्याने आपले अष्टपैलूत्व सार्थ ठरविले आहे. स्वतःचा खास असा फटका किंवा जादुई करिष्मा नसतानाही सातत्य आणि उपयुक्ततेच्या जोरावर जगातील कोणताही कर्णधार त्याचा समावेश डोळे झाकून आपल्या संघात करेल. ऑक्टोबर २००५ मध्ये झालेल्या ‘आंक्रिप’च्या पारितोषिक वितरण समारंभात वर्षातील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम कसोटी खेळाडू अशी दोन्ही बक्षिसे कॅलिसने मिळविली. २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत प्रोटियांकडून सर्वाधिक धावा त्यानेच काढल्या. मात्र कमी वेगाबद्दल त्याच्यावर खरमरीत टीका झाली. त्यानंतर झालेल्या विसविशीत विश्वचषकासाठीच्या संघात त्याचा समावेश झाला नाही. २००८-०९ च्या हंगामात त्याने एदिसा व कसोट्या या दोन्ही प्रकारांमध्ये १०,००० धावांचा टप्पा गाठला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply