१६ डिसेंबर १८८२ रोजी केंब्रिजमध्ये जॉन बेरी हॉब्ज यांचा जन्म झाला. ‘जॅक’ हे त्यांचे सुपरिचित तर ‘द मास्टर’ हे त्यांचे अल्पपरिचित लाडनाव. १९०१५ ते १९३४ या काळात ते सरेकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले आणि १९०८ ते १९३० या काळात ते इंग्लंडच्या संघाकडून ६१ कसोटी सामन्यांमध्ये खेळले.
सर जॅक हॉब्ज हे प्रथमश्रेणी क्रिकेटिहासातील सर्वोत्कृष्ट सलामीचे फलंदाज मानले जातात. प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (६१,२३७ किंवा ६१,७६०) आणि सर्वाधिक शतके (१९७ किंवा १९९) विक्रम आजमितीलाही हॉब्जच्याच नावावर आहे. दोन्ही कंसांमधील पहिले आकडे विज्डेन आणि प्लेफेअरनुसार तर दुसरे आकडे क्रिकेटआर्काईव्जनुसार.
विझियानगरमच्या महाराजांनी योजिलेल्या एका ‘खाजगी’ दौर्यावर १९३०-३१ च्या हंगामात जॅक हॉब्ज आणि हर्बर्ट सटक्लिफ भारत आणि श्रीलंकेत आले होते. हे महाराज विझ्झी या नावाने प्रख्यात आहेत. या दौर्यावरील सामन्यांच्या अधिकृततेबाबत शंका आहे. विज्डेनने या सामन्यांचा प्रथमश्रेणीमध्ये समावेश केलेला नाही. द क्रिकेटर नावाच्या नियतकालिकाने मात्र १९३२ च्या आपल्या वार्षिकांकात त्यांचा प्रथमश्रेणी म्हणून समावेश केला. प्रकाशनावेळी सांख्यिकीतज्ज्ञांचे तिकडे लक्ष गेले नाही. १९७०च्या दशकात काही सांख्यिकीतज्ज्ञांनी त्यात रस घेतला. दस्तुरखुद्द हॉब्ज आणि सटक्लिफ यांना हे सामने प्रथमश्रेणी नाहीत याची कल्पना होती आणि त्यांनी विझ्झींच्या रंजनासाठी खेळले गेलेले प्रदर्शनीय सामने म्हणून त्यांकडे पाहिले होते हे जगाला ठाऊक आहे. या सामन्यांमध्ये त्यांनी जमविलेल्या धावा (दोन शतकांसहित) प्रथमश्रेणीमध्ये गणण्यावरून मतभेद आहेत.
प्रथमश्रेणी क्रिकेट ही संकल्पना जुनीच असली तरी प्रथमश्रेणीची स्पष्ट व्याख्या सर्वप्रथम १९४७ म ्ये केली गेली. प्रथमश्रेणीचा दर्जा असलेल्या दोन संघांदरम्यान खेळला गेलेला तीन किंवा त्याहून अधिक दिवसांचा सामना म्हणजे प्रथमश्रेणी सामना अशी ही व्याख्या होती (आणि आहे.) प्रथमश्रेणीचा दर्जा त्या-त्या देशाच्या क्रिकेट मंडळांनी ठरवावयचा असतो.
हॉब्जबद्दल लिहिलेल्या अनेकांनी त्याच्या
नम्रतेचा, खिलाडूवृत्तीचा आणि सभ्यपणाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. त्याच्या विनोदबुद्धीचीही अनेक उदाहरणे सापडतात. हॉब्जच्या अखेरच्या प्रथमश्रेणी शतकाची आठवण सांगताना (ओल्ड ट्रॅफर्ड, वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षी) जॉर्ज डकवर्थ लिहितो – तेव्हा वातावरणात प्रचंड थंडी होती. शतक झाल्यावर हा पठ्ठ्या मला म्हणाला, स्वतःला गरम ठेवण्यासाठी मी शतक काढले!
हॉब्ज फलंदाजीतील कलाकारीसाठी जाणले जातात. ही कलाकारी आणि सांख्यिक मानदंडांपलीकडे ते त्यांच्या सातत्यासाठी ओळखले जातात. कसोटी सामन्यांमध्ये ते ९५ वेळा बाद झाले. यापैकी केवळ १२ वेळा ते एक-अंकी धावसंख्येवर बाद झाले. हॉब्जच्या क्रिकेट कारकिर्दीचे पहिल्या महायुद्धाआधीचा एक आणि नंतरचा दुसरा असे दोन टप्पे काही विश्लेषक करतात. प्रत्येकातील हॉब्जची स्टाईल वेगळी होती असेही म्हटले जाते. महायुद्धापूर्वी ते ट्रम्परसारखे खेळत (व्हिक्टर ट्रम्पर हा ऑस्ट्रेलियाई सलामीवीर त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.); कलाईंचा (मनगटाचा) अधिक वापर करीत आणि नंतर मात्र त्यांचा कल स्वतःची ऊर्जा वाचवून ठेवण्याकडे झाला असे फरक सांगितले जातात. १९१४ पूर्वीच्या फलंदाजीसाठी इतिहासाला आपले स्मरण रहावे असे हॉब्ज एकदा म्हणाले होते; मात्र पोतडीच्या पोतडी भरून धावा तुम्ही १९१९ नंतर काढल्या हे लक्षात आणून दिल्यावर ते म्हणतात- ‘त्यातल्या बहुतांश धावा बॅकफूटवरच आल्या.’
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply