क्रिकेटच्या इतिहासातील दाढ्या – किंवा त्या दाढ्यांचे मालक – हा एक मनोरंजक विषय आहे.
सर्वात विख्यात दाढी आहे ती अर्थातच डॉ. डब्ल्यू. जी. ग्रेस यांची. अलीकडच्या काळातील प्रसिद्ध ‘दाढवानां’मध्ये सईद अन्वर, युसूफ योहाना (धर्मांतरानंतरचा मोहम्मद युसूफ) आणि हाशीम आमला यांचा समावेश करावा लागेल.श्रीलंका संघाकडून गाजलेल्या आणि दाढीमुळे परिचय-सौलभ्य आलेल्या असांका प्रदीप गुरुसिन्हाचा जन्म १६ सप्टेंबर १९६६ रोजी झाला. कोलंबोतील नालंदा कॉलेजात शिकलेला असांका आता मात्र कांगारूंच्या भूमीत स्थायिक झाला आहे.आंतरराष्ट्रीय वर्तुळाने असांकाला आवतण दिले ते त्याच्यातील यष्टीरक्षणाची कौशल्ये पाहून. आरंभीचा काही काळ तो यष्टीरक्षक म्हणूनच खेळला पण हळूहळू तिसर्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून त्याने बस्तान वसविले. उंचापुरा असांका स्वतःच्या खास शैलीत चेंडूला ’बॅट’ देण्यासाठी सज्ज होई. तीही त्याची ओळखमुद्रा बनली होती. श्रीलंकेकडून तो ४१ कसोट्या आणि १४७ एदिसा खेळला. ‘लंकेची फलंदाजी ज्याच्यावर उभी राहते तो पाया’ असे त्याच्या फलंदाजीचे सार्थ वर्णन केले जाते. अरविंद डिसिल्वाच्या सामनावीर पुरस्कारामुळे झाकोळला जाणे साहजिकच आहे पण श्रीलंकेच्या १९९६ च्या विश्वजेतेपदात असांकाचा मोठा वाटा होता. डिसिल्वाने शतक काढले तर असांकाने ६५ धावा अंतिम सामन्यात केल्या होत्या. विज्डेनच्या म्हणण्यानुसार असांकाने अरविंदाला त्या सामन्यात ‘भक्कमपणे वाढत जाणारा पाठिंबा’ दिला होता.
१६ सप्टेंबर १९९६ रोजी क्रिकेटचे जागतिकीकरण होत असल्याच्या शंकेला बळकटी देणारी आणि क्रिकेटचा फारसा प्रचार नसलेल्या भूमीवर क्रिकेट पोहचवणारी एक घटना घडली. कॅनडातील टोरॉन्टो शहरात या तारखेस एक आंतरराष्ट्रीय सामना खेळविला गेला. अहमहमिकेत सामील असलेले संघ होते पारंपरिक उपखंडीय प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान. मैदान होते – क्रिकेट, स्केटींग अन्ड कर्लिंग क्लब, टोरॉन्टो. सहारा चषकाच्या अय पहिल्या सामन्यात सचिन तेंडुलकरने ८९ चेंडूंमध्ये ८९
धावा काढल्या. (थोडी फिरकी – ८९ ला हिंदीत काय म्हणतात? उन्यासी म्हणजे ७९
असतात आणि ‘उनब्बे’ असा शब्द हिंदीत नाही.) भारताने या सामन्यात आठ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. पृथ्वीतलावर ज्या काही मोजक्या आणि ‘मोक्याच्या’ त्रयस्थ ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले किंवा खेळले जाते त्यात टोरॉन्टोचा समावेश होतो. मलेशियातील क्वाला लुम्पूर, सिंगापूर आणि अमिरातीमधील शारजा ही अन्य काही स्थाने.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply