ब्रिटॅनिक अश्युरन्स काऊन्टी स्पर्धेतील नॉटिंगहमशायर वि. यॉर्कशायर हा सामना १७ सप्टेंबर १९८८ रोजी संपला. मैदान ट्रेन्ट ब्रिज. हा सामना सुरू होण्यापूर्वी फ्रॅंक्लीन स्टीफन्सनला एकाच काऊन्टी हंगामात १,००० धावा आणि १०० बळी असा दुहेरी बार उडविण्यासाठी २१० धावांची आवश्यकता होती. नॉट्सच्या संघाने (फ्रॅंकचा ‘संग’) पहिल्या डावात ३८० धावा प्रतिस्पर्ध्याला दिल्या. यॉर्कशायरकडून कुणालाही शतक काढणे जमले नाही. फ्रॅंकने मात्र ३७ षटकांमध्ये १०५ धावा देऊन ४ गडी बाद केले.
नॉट्सच्या पहिल्या डावात वैयक्तिक १११ धावांवर फ्रॅंक बाद झाला. इंग्लिश लोकसमजुतींमध्ये नेल्सन नंबर या नावाने ओळखला जाणारा ‘१११’ अशुभ मानला जातो. फ्रॅंकला मात्र तो पावला असेच म्हणावे लागेल. एका हंगामातील १,००० धावा त्याने पूर्ण केल्या. गोलंदाजीतील शतकाची भरपाई त्याने फलंदाजीत ६ धावा जास्त काढून केली खरी पण अखेर त्याचा संघ पहिल्या डावाच्या आधारावर ८४ धावांनी पिछडला गेला.
यॉर्कशायरच्या दुसर्या डावात मात्र स्टीफन्सनने कमाल केली. तब्बल ७ यॉर्कींना त्याने तंबूचा रस्ता दाखविला आणि पुन्हा एकदा तो शतकवीर बनला. ३४ षटकांमधून त्याने ११७ धावा दिल्या. यॉर्कींचा दुसरा डाव घोषित : ७ बाद ३४०. इतर चौघा ‘नॉटीं’ना एकही गडी बाद करता आला नाही – शतक ‘देणे’ लांबच राहिले !
४२५ धावा काढून विजय मिळविणे नॉटींना शक्य नव्हतेच. उत्सुकता होती ती फक्त स्टीफन्सनच्या कामगिरीची. या डावात फ्रॅंकने बरोब्बर ११७ धावा केल्या !! २९७ धावांवर नॉट्सचा डाव संपुष्टात आला.
१९६९ मधील पुनर्रचनेनुसार इंग्लिश प्रथम श्रेणी हंगामातील सामन्यांची संख्या कमी करण्यात आली. तेव्हापासून एकाच हंगामात १,००० धावा आणि १०० बळी ही कामगिरी केवळ दोघांनाच साधली आहे. वेस्ट इंडीजचा ‘हा’ अष्टपैलू फ्रॅंक्लीन स्टीफन्सन (१,०१८ धावा आणि १२५ बळी) आणि न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली.
एकदिवसीय स्पर्धांमध्ये
भारतीय संघाचे अंतिम सामन्यातील विजय आताशा खूपच दुर्मिळ झाले आहेत. १७ सप्टेंबर १९९४ हा दिवस मात्र त्याला अपवाद मानावा लागेल. श्रीलंकेतील सिंगर विश्वमालिकेचा अंतिम सामना पावसामुळे प्रेमदासा मैदानावरून सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर हलविण्यात आला. तिथेही मैदान ओले असल्याने सामना २५ षटकांचाच झाला. यजमानांच्या ९ बाद ९८ च्या उत्तरादाखल मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सहा गडी राखून हा सामना जिंकला. अझरचा वाटा मोठा राहिला : ५८-चेंडू-४५.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply