भुकेला पॉनी १९०० : धावांची खूप जास्त भूक असणार्या बिल पॉन्सफोर्डचा जन्म. दोन प्रथमश्रेणी चतुःशतके काढणारे दोनच बहाद्दर झाले आहेत आणि पॉनी त्यापैकी एक आहे. त्याची एकाग्रता अतिशय दृढ होती. पहिले चतुःशतक त्याने आपल्या चौथ्याच प्रथमश्रेणी डावात व्हिक्टोरियासाठी काढले होते. ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणार्या शेफील्ड शील्ड स्पर्धेत त्याची कारकिर्दीतील सरासरी ८३ एवढी राहिली. (प्रायोजक नसल्याने एका तपाचा खंड या स्पर्धेत पडला. आता ही स्पर्धा पुन्हा सुरू झालेली आहे.) १९३४ साली इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले आणि ओवलवर त्याने सलग सामन्यांमध्ये १८१ आणि २६६ धावा काढल्या. ओवलवरच्या त्या खेळीदरम्यान त्याने डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत दुसर्या जोडीसाठी ४५२ धावांची भागीदारी केली. वयाच्ता चौतिसाव्या वर्षीच त्याने क्रिकेटला रामराम ठोकला. व्हिक्टोरियात १९९१ मध्ये मृत्यूची शिकार होण्याआधी बिल पॉन्सफोर्ड ऑस्ट्रेलियाचा सर्वात ‘म्हातारा’ जिवंत क्रिकेटपटू होता.
मार्कची मृदुता १९९८ : पेशावरमधील सामना अनिर्णित राहिल्याने १-० अशी आघाडी कायम राखत १९६०नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्याच्या आशा कांगारूंनी जिवंत ठेवल्या. सामन्यावर फ्लॅश येण्याचे कारण असे की कर्णधार मार्क टेलरने एका कसोटी डावात सर्वाधिक धावा करणारा कांगारू होण्याच विक्रम हातातोंडाशी आलेला असतानाही डाव घोषित केला. ३३४ धावांवर दुसर्या संध्याकाळी नाबाद राहत त्याने डॉनच्या ३३४ धावांशी बरोबरी केली. डॉनने १९३० साली हेडिंग्लेवर हा विक्रम केला होता. सामन्याच्या शेवटच्या दिवशीही फलंदाजी करणार्या टेलरने ९२ धावा काढल्या आणि कसोटी सामन्यात ४०० धावा करणारा तो दुसराच खेळाडू ठरला. तत्पूर्वी इंग्लंडच्या ग्रॅहम गूचने १९९० मध्ये लॉर्ड्सवर भारताव
रुद्ध ३३३ आणि १२३ धावा काढल्या होत्या.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply