नवीन लेखन...

डिसेंबर १९ : रिकी पॉन्टिंग

 

 

१९ डिसेंबर ही राजेश चौहान, नयन मोंगिया आणि रिकी पॉन्टिंग या प्रसिद्ध खेळाडूंची जन्मतारीख आहे. राजेश चौहानने कारकिर्दीत एकूण २१ कसोटी सामने खेळले. या एकवीसपैकी एकही सामना भारताने गमावला नाही. नयन मोंगिया हा कारकिर्दीच्या एका टप्प्यात ‘सामना जिंकण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल’ प्रश्नांकित झाला होता.

सध्या सुरू असलेली अ‍ॅशेस मालिका पाहता आजचा फोकस एका गु-णी ऑस्ट्रेलियाई कर्णधारावर !

 

१९ डिसेंबर १९७४ रोजी रिकी टॉमस पॉन्टिंगचा जन्म झाला. आज तो ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताचा फलंदाज, स्लिप्स आणि फलंदाजानिकटच्या क्षेत्रांचा रक्षक आणि खूप अधूनमधून गोलंदाज. आधुनिक युगातील ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आणि आजच्या पिढीतील अत्यंत सुबुद्ध फलंदाजांपैकी एक अशी ‘पंटर’ची खास ओळख आहे. (पैजा लावण्याची भारी हौस असल्याने ‘पंटर’ हे लाडनाव.)

 

ऑस्ट्रेलियाई स्थानिक स्पर्धांमध्ये रिकी तास्मानियन टायगर्सकडून खेळतो. २००८ च्या आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता.

 

शेफिल्ड शील्डमध्ये सर्वात लहान वयात पदार्पण करणारा खेळाडू रिकीच आहे. प्रथमश्रेणी पदार्पणानंतर कसोटीसंघात प्रवेश मिळविण्यासाठी त्याला अडीच वर्षे थांबावे लागले. १९९५ मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले असले तरी १९९९ पर्यंत त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू राहिले. अखेर २००२ मध्ये तो कांगारूंचा एदिसा कप्तान आणि २००४ मध्ये कसोट्यांमध्येही कप्तान बनला.

 

१५० कसोट्या आणि साडेतीनशे एदिसांनंतर पॉन्टिंग ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक कसोटी आणि एदिसा धावा काढणारा फलंदाज बनला. कसोटी शतकांमध्ये सचिन तेंडुलकरच्या खालोखाल त्याचा क्रमांक येतो (३९ शतके) आणि एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविणारांमध्ये सचिन आणि सनथनंतर त्याचा क्रमांक येतो.

 

पॉन्टिंग हा एक आक्रमक स्पर्धक आहे- मैदानाबाहेर आणि मैदानावरही. अ‍ॅलन बॉर्डर या भूतपूर्व ऑसी कर्णधाराच्या सांगण्यानुसार पंटरकडे चिकार निश्चय, धैर्य आणि कौशल्य आहे. २००६ च्या चॅपेल-हॅडली ट्रॉफीत पंच बिली बाव्डेन यांनी क्षेत्ररचनेतील त्रुटी

हेरून एक चेंडू नो-बॉल दिल्याने पंटरने त्यांच्याशी वाद घातला होता या घटनेत हे तिन्ही गुण त्यांच्या परमोत्कर्षाने दिसून येतात असे आमचे प्रांजळ मत आहे.

 

फलंदाज म्हणून तो लाजवाब आहे. आजमितीला जगातील सर्वोत्तम हूक आणि पुल मारणारा खेळाडू अशी त्याची ख्याती असली तरी फ्रंटफूट-बॅकफूट दोन्हीवर तो तितक्याच लीलया खेळतो. अलीकडे अलीकडे तो हूक आणि पुलच्या नादातच अनेकदा बाद होत असला तरी आपण ते खेळत राहूच असे त्याने म्हटलेले आहे.

 

भेदक फिरकी मारा पंटरला झेपत नाही असेही म्हटले जाते. भारतीय फिरकीपटू हरभजनसिंगने त्याला १३ वेळा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बाद केलेले आहे. फ्रंटफूटवर जात मनगटाच्या हालचालीने फिरकी चेंडू झटकण्याचा तो प्रयत्न करतो आणि अनेकदा निकटच्या रक्षकांहाती झेल देऊन बाद होतो. वरच्या फळीतील फलंदाजांच्या तंत्राशी तुलना करता पॉन्टिंग स्वीपचा वापर फार कमी करतो, हेही त्याच्या अपयशाचे एक कारण असावे. स्वीप करण्यापेक्षा तो क्रीज सोडून मारणे किंवा चेंडू ऑफ-साईडला ढकलणे पसंत करतो.

 

पॉन्टिंग कंदुकफेक्याची भूमिका फार कमी वेळा करीत असला तरी एदिसामध्ये त्याने एकदा ब्रायन लाराचा बळी मिळविलेला आहे!

 

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..