शरीरवेधी गोलंदाजी म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या ‘बॉडीलाईन’ प्रकारची गोलंदाजी या दिवशी, १९३२ मध्ये सर्वप्रथम पहावयास मिळाली, मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या एमसीसी विरुद्ध ऑस्ट्रेलियाई एकादश या सामन्यात. डग्लस जार्डिन हा शरीरवेधत्वाचा मानकरी या सामन्यासाठी मैदानातच काय, प्रेक्षागारातही उपस्थित नव्हता. तो गेला होता मासेमारीसाठी ! हॅरल्ड लार्वूड मात्र गोलंदाजी करीत होता. बिल वुडफूलच्या छाताडाला त्याने असे सडकले की दहा मिनिटांसाठी खेळ थांबवावा लागला. दुसर्या टोकाकडून डॉन ब्रॅडमन ‘खेळ’ पहातच होते.
लेग साईडला क्षेत्ररक्षकांचे कोंडाळे उभे करायचे आणि उसळते चेंडू फलंदाजाच्या थेट छाताडाकडे भिरकावून द्यायचे या प्रकाराला तांत्रिक भाषेत ‘लेग थिअरी’ अशी संज्ञा आहे. अखेर ब्रॅडमनही पायचित झाले.
बॉडीलाईनबद्दल बोलताना ब्रॅडमन यांनी नंतर ‘फलंदाजाच्या हातात बॅट असते’ असे सूचक उद्गार काढले होते. या सामन्यात त्यांनी डोक्याच्या दिशेने आलेला एक चेंडू टेनिसच्या रॅकेटने फटकवावा तसा फटकावला होता आणि पळून पाच धावा काढल्या होत्या. उपस्थित अर्धा लाख प्रेक्षकांसाठी ही मेजवानीच होती. याच दिवशी लार्वूडने प्रथमश्रेणीतील आपला हजारावा बळी मिळविला.
‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ ही म्हण आता स्पॉटफिक्सिंगच्या युगात म्हणण्याजोगी राहते की नाही अशी परिस्थिती आलेली आहे. अनपेक्षित निकालांकडे पाहण्याचे एक नवे परिप्रेक्ष्य (पर्स्पेक्टिव) निकालनिश्चितीमुळे प्रेक्षकांना उपलब्ध झालेले आहे. पंधराएक वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती अशी नव्हती.
१९ नोव्हेंबर १९६५ रोजी रजब अली या केनियाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूचा जन्म झाला. ३१ वर्षांनंतर त्याच्या संघाने एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील एक चमत्कार घडवून आणला त्याची बीजभरणी रजबनेच केलेली होती. पुण्याच्या नेहरू स्टेडिअमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात २९ फेब्रुवारी १९९६ या ‘वाढीव’ दिवशी केनियाचा संघ १६६ धावांमध्ये सर्वबाद झाला होता.
विंडीजच्या डावात पहिला बळी रजब अलीने मिळविला. वैयक्तिक ५ धावांवर रिची रिचर्डसनचा त्रिफळा उद्ध्वस्त झाला.
मग दुसरा सलामीवीर
शेर्विन कॅम्पबेलला मार्टिन सुजीने तंबूचा रस्ता दाखविला. ८ धावा काढलेल्या ब्रायन लाराला अलीने यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले : विंडीज ३ बाद ३३. मग कर्णधार मॉरिस ओडुम्बेने आपला वाटा उचलला. क्रमांक अकराचा फलंदाज कॅमेरून कफीला रजब अलीनेच त्रिफळाबाद केले आणि केनियाच्या एका खळबळजनक विजयावर शिक्कामोर्तब केले. रजब अली ७.२ षटके, २ निर्धाव, १७ धावा, ३ बळी !
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply