१९७४ : खूप खूप खास फलंदाजाचा जन्म. १३-१४ मार्च २००१ या दोन दिवसांत वेरिगुप्पा वेंकट साई लक्ष्मणचे आयुष्य पार बदलून गेले. या दिवसापर्यंत २८ची कसोटी सरासरी राखणार्या लक्ष्मणला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकत्यात फॉलोऑन मिळाल्यानंतर भारत २-० असा मालिकेत पिछाडीवर पडणार अशी स्पष्ट चिन्हे असताना लक्ष्मणने धीरोदात्त खेळ करीत २८१ धावा काढल्या. त्यावेळी भारतीय फलंदाजाचा कसोटीतील हा सर्वोत्तम डाव होता आणि या खेळीने कांगारूंचा त्या मागच्या १६ कसोट्यांमध्ये चौखूर उधळलेला वारू रोखला गेला. राहुल द्रविड आणि हरभजनसिंगने त्याला चांगली साथ दिली आणि या २८१ धावांनी एका संस्मरणीय कसोटीविजयाचा पाया घातला. लक्ष्मणला कांगारूंचा मारा फारच आवडतो आणि नुकत्याच झालेल्या मालिकेतही त्याचे हे प्रेम गृहस्थाश्रमाच्या अंतिम टप्प्यातही टिकून असल्याचे दिसून आले. क्रिकेटच्या छंदापायी वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडलेल्या लक्ष्मणला कांगारूंच्या गोलंदाजीचे अचूक निदान झालेले आहे.
१९७० : शेर्विन कॅम्प्बेलचा जन्म. वेस्ट इंडीज क्रिकेट सलामीच्या भरवशाच्या जोडीच्या शोधात असूनही शेर्विनला संधी का मिळाली नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाच्या २००१-०२ च्या दौर्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि कथा तिथेच संपली. वेगाने धावा जमविण्याच्या हव्यासाने त्याच्यातील फलंदाज कुजत गेला असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १९९९-२००० मधील न्यूझीलंड दौर्यात त्याने काढलेल्या धावा हा या दाव्याचा पुरावा म्हणून सांगितला जातो : १७०, ०, ०, ३, ५१, ०, ०. हा पुरावा ‘पुरण्यासारखा’ आहे का हे ज्याने त्याने ठरवावे !
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply