१९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती. तटवा-तटवा-तटवा-ठोका आणि तटव्याची भरपाई करा असे त्याच्या फलंदाजीचे तंत्र होते. त्याची शतके सीमापार गेलेल्या चेंडूंनी भरलेली असत. १९९२-९३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध लखनौमध्ये त्याने २२३ चेंडूंमध्ये १२४ धावा काढल्या होत्या. त्या डावात त्याने आठ षटकार आणि नऊ चौकार मारले होते. हे १७ चेंडू सोडले तर २०६ चेंडूंमध्ये त्याने अवघ्या ४० धावा काढल्या होत्या. एम्बुरी नावाच्या गोलंदाजाला त्याने दौर्यावरील एका सामन्यात लाँगऑनला नऊ षटकार खेचले होते. १९९७-९८ मध्ये त्याने शेन वॉर्नचीही धुलाई केली. समालोचक म्हणूनही त्याने कारकीर्द गाजवली. ‘भारताची फलंदाजी सायकलस्टँडसारखी आहे; एक सायकल पडली की उरलेल्या धडाधड कोसळतात’ आणि ‘इतका उंच षटकार की जणू हवाई सुंदरीसाठी नजराणा पाठविला आहे’ ही काही प्रसिद्ध सिद्धूफळे. ‘बात-बात पे हसता है; आदमी है की नवजोतसिंग सिधू’ अशी म्हण त्याच्या हसण्यावरून रूढ करता येईल.
नजफगढचा नवाब
१९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला. त्याचे खेळण्याचे तंत्र पाहता कसल्याही चेंडूवर तो केव्हाही बाद होऊ शकतो. पदलालित्य उचित नसल्याचे आक्षेप त्याच्यावर सुरुवातीपासून घेतले गेले आहेत पण एकदा सूर लागल्यावर भल्याभल्या गोलंदाजांना तो ‘खेळणे’ करतो- स्वतःचे आणि प्रतिस्पर्धी संघाला ‘खेळणे’ नकोसे होते ! तुरळक अपवाद वगळता कामगिरीतील सातत्य कायम ठेवत अनेक तडाखेबंद खेळ्या त्याने केलेल्या आहेत. २००३-०४ मध्ये मुल्तान कसोटीत पाकविरुद्ध त्याने ३०७ धावा काढल्या. २००८ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईत त्रिशतक काढले. दोन कसोटी त्रिशतके काढणारा डॉन आणि लारानंतरचा वीरू केवळ तिसरा आहे. एकदिवसीय सामन्यांमधील त्याची कामगिरी तितकीशी सातत्यपूर्ण नसल्याने २००७ मध्ये त्याला संघातून वगळण्यात आले होते पण वर्षभरातच त्याने पुनरागमन केले आणि आता तर तो भारताचा नियमित उपकर्णधार आहे. दिल्लीला त्याच्या मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये मुल्तान के सुल्तान की तिकडी या नावाची तीन व्यक्तींना पुरेल अशी खास थाळी ३०७ रुपयांना मिळते ! बूट खुंटीला टांगेपर्यंत अशा किती खास थाळ्या तो बनवितो ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply