१९०० : शरीरवेधी गोलंदाजीच्या आविष्कारकर्त्याचा जन्म. फलंदाजाच्या पाठीकडील बाजूला क्षेत्ररक्षकांचे कोंडाळे उभे करावयाचे आणि जाणूनबुजून आखूड टप्प्याचे चेंडू त्याच्या अस्थिपिंजराच्या (बरगड्यांच्या) दिशेने गुरकावून भिरकवायचे असे हे गोलंदाजीचे (की भिवविण्याचे / सडकावण्याचे) तंत्र डग्लस जार्डिन या इंग्लंडच्या कप्तानाने (म्हणे ब्रॅडमनला रोखण्यासाठी) वापरले. यामागचा हेतू असा असूनही फलंदाजाच्या हातात बॅट तर असतेच ना असे खिलाडू उत्तर ब्रॅडमनने दिले होते. १९३२-३३ च्या हंगामात ‘रक्षापात्र’ पुन्हा मिळविणे हाही जार्डिनचा यामागील एक हेतू होता. आश्चर्य म्हणजे हे दोहों हेतू साध्य झाले. इंग्लंड ४-१ ने जिंकले आणि ब्रॅडमनची सरासरी अगदीच कमी राहिली (त्याच्यासाठी) फक्त ५६ ! हे तंत्र वादग्रस्त ठरले. हूक (बॅट जमिनीला समांतर ठेवून पाठीकडच्या बाजूला मारलेला फटका) करण्याचा प्रयत्न करताना बर्ट ओल्डफील्डच्या कवटीचे हाड मोडले. जार्डिन ऑस्ट्रेलियात खलनायक ठरला पण त्याने हे तंत्र चुकीचे नसल्याचे निग्रहाने सांगितले. लिअरी कॉन्स्टन्टाईन आणि मॅनी मार्टिन्डेलने पुढच्याच उन्हाळ्यात ओल्ड ट्रॅफर्डवर जार्डीला त्याच्याच औषधाची चव चाखावयास लावली !
डॉक्टर गेले…
१९१५ : क्रिकेटमधील सर्वात विख्यात दाढीचे मालक असलेल्या डॉक्टर विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांचे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पहिल्या महयुद्धात जर्मनांनी झेपेलीन नावाचे हवाईहल्ल्याचे एक तंत्र अवलंबिले होते, त्याची डॉक्टरसाहेबांनी धास्ती घेतली होती. ‘जगातील सर्वात वेगवान गोलंदाजाचा वयस्कपणात सामना केलेला असतानाही आपण या विमानहल्ल्याला का घाबरताहात?’ या पृच्छेला डॉक्टरांनी मजेदार उत्तर दिले होते- “ते भिकारी (गोलंदाज) मला दिसू शकत होते, हे भिकारी दिसू शकत नाहीत!” उत्तरोत्तर वाढलेल्या हल्ल्यांनी त्यांची तगमग वाढत गेली होती. केन्टमधील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. अंतिम दर्शनासाठी खूप लोक आणि तेही दूर-दूरून येत असल्याने त्यांच्या प्रेतावरील अंत्यसंस्कार तीन दिवस लांबले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply