नवीन लेखन...

नोव्हेंबर २३ : मर्व ह्युजेस- मिशी हीच ओळख आणि खेळपट्टीचे राजकारण



डॉ. डब्ल्यू जी ग्रेस ही क्रिकेटविश्वातील चिरपरिचित ‘दाढी’ म्हणून ओळखली जाते. दाढीप्रमाणेच मिशांचीही क्रिकेटविश्वात आगळी ओळख आहे. सध्या खेळणार्‍या कुठल्याही खेळाडूकडे त्याची परिचयदाती ठरू शकेल अशी खास झुपकेदार मिशी नाही हे बहुधा जिलेटने आणलेले दुर्दैव मानावे लागेल.

१९६१ मध्ये या तारखेला जन्मलेल्या मर्विन ह्युजेसची खास भरघोस आणि काहीशा सोनेरी छटांच्या मिशांसाठी खास ओळख आहे. १९८१-८२ च्या हंगामात मर्वची व्हिक्टोरिया संघात निवड झाली. तीन हंगामांनंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. पहिल्या मालिकेत त्याला लक्षवेधक म्हणण्यासारखी कामगिरी करता आली नाही.

दोन दिवसांमध्ये, तीन षटकांमध्ये, एवढेच नव्हे तर दोन वेगवेगळ्या डावांमध्ये विभागलेला कसोटी त्रिक्रम मर्विनने साधलेला आहे. १९८८-८९ च्या विंडिजविरुद्धच्या कसोटीत त्याने आपल्या छत्तिसाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कर्टली अम्ब्रोजला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने पॅट्रिक पॅटर्सनला तंबूचा रस्ता दाखविला आणि तिथेच विंडीजचा पहिला डाव संपला. विंडीजच्या ४४९ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची काहीशी दमछाक झाली. ४ बाद १६७ नंतर वॉ आणि वूडने डाव काहीसा सावरला. या दोघांनी २०० धावांची भागीदारी केली आणि मग विंडीज गोलंदाजांना उसळत्या गोलंदाजीचे तंत्र वापरावे लागले. ऑस्ट्रेलिया ५४ धावांनी पिछाडीवर असताना लॉसनला अम्ब्रोजचा उसळता चेंडू लागला आणि त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्याची पाळी आली. कांगारू कर्णधार अलन बॉर्डरने डाव घोषित केला. विंडीजच्या डावात पहिले षटक ह्युजेसने टाकले आणि पहिल्याच चेंडूवर गॉर्डन ग्रिनीज पायचित दिला गेला. मर्विनचा त्रिक्रम पूर्ण झाला. आश्चर्य म्हणजे आपण त्रिक्रम साधला आहे हे मर्विनच्या गावीही नव्हते! तब्बल तीस वर्षांच्या कालखंडानंतर कांगारू गोलंदाजाने त्रिक्रम साधण्याचा विक्रम केलेला होता.

१९८५ ते १९९४ या काळात ऑस्ट्रेलियाकडून ५३ कसोट्या खेळताना ह्युजेसने २१२ बळी मिळविले. ३३ एदिसांमधून त्याने ३१ बळी मिळविले. कसोट्यांमध्ये त्याने एकूण १,०३२

धावाही

जमविलेल्या आहेत, दोन अर्धशतकांसह.

वेगवान गोलंदाजीव्यतिरिक्त मद्यपी आणि अत्यंत खादाड अशी ख्याती ह्युजेसने मिळविलेली आहे. चॅनेल नाईनवरून प्रसारित झालेल्या ‘सेलेब्रिटी ओव्हरहॉल’ या वजन घटविण्याच्या रिअलिटी शोमध्ये दोनदा ह्युजेस सहभागी झाला. पहिल्या हंगामात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती.

फॅट पिऽझ्झ नावाच्या (Fat Pizza) एका विनोदी चित्रपटात आणि वजन घटविण्याचे उपाय सांगणार्‍या जाहिरातींमधून मर्विनने अभिनय केलेला आहे.

राजकारणाचा क्रिकेटमधील प्रभाव दाखविणारी एक घटना या तारखेला (१९७४) घडली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबावर एका आठवड्यानंतर खेळला जाणार होता. या सामन्यासाठी ज्या पद्धतीने खेळपट्टी बनविली जात होती त्या पद्धतीवर आक्षेप घेत ब्रिस्बेनच्या महापौरांनी क्युरेटरला निलंबित केले. आल्डरमन क्लेम जोन्स नावाचे हे महाशय मैदानाच्या विश्वस्त संस्थेचे सभासदही होते.

विज्डेनच्या अहवालानुसार खेळपट्टी घाईने तयार करण्यात आली आणि दक्षिणेकडील टोकावर चेंडूला मिळणारी उसळी अंदाज न येण्याजोगी होती. या टोकाला इंग्लंडने त्यांच्या २० पैकी १६ गडी गमावले आणि ऑस्ट्रेलियाने १५ पैकी आठ.

ऑस्ट्रेलियाने हा सामना १६६ धावांनी जिंकला आणि मालिकेतही १-० असा विजय मिळवला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..