राहुल द्रविड ही भारताची कसोट्यांमधील पहिली भिंत नाही. त्याच्यापूर्वीही ‘द ग्रेट वॉल’ या नावाने एक भारतीय फलंदाज ओळखला जाई. २३ सप्टेंबर १९५२ रोजी अंशुमन गायकवाडचा (मुंबईत) जन्म झाला. अंशुमनच्या वडलांनी – दत्ताजीराव गायकवाड – १९५९ साली इंग्लंड दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.आपले कसोटी पदार्पण आणि अखेरची कसोटीही अंशुमन खेळला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर. मधले अंतर राहिले सुमारे एक दशकाचे आणि ३८ कसोटी सामन्यांचे.१९७४ च्या डिसेंबरात विंडीजविरुद्ध अंशुमन पहिली कसोटी खेळला. हा आणि त्याच्यानंतरचाही साधारण भारताच्या विश्वविजेतेपदापर्यंतचा काळ कॅरिबिअन तोफखान्यांच्या वर्चस्वाचा होता. द्रुतगती गोलंदाजांविरुद्ध आदरयुक्त संयम हे अंशुमनच्या फलंदाजीचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. ह्या लक्षणामुळेच सुनील गावसकरचा उजवा हात आणि श्रेष्ठ भिंत अशी बिरुदे त्याला चिकटली. १९८४ व्या सालातील अखेरच्या दिवशी त्याची कारकिर्दीतील अखेरची अक्सोटी सुरू झाली आणि १९८५ च्या चौथ्या दिवशी ती संपली. ४० कसोट्यांच्या कारकिर्दीत ३०.०७ च्या पारंपरिक सरासरीने दोन शतके आणि १० निमशतकांसह त्याने बरोब्बर १९८५ धावा जमविल्या. २०१ धावांचा डाव ही त्याची उच्चांकी खेळी. या २०१ धावांदरम्यान अंशुमन तब्बल ११ तास आणि ११ मिनिटे एवढा वेळ खेळपट्टीवर उभा होता. ४३६ चेंडूंचा सामना त्याने केला होता. हे घडले जलंधरमध्ये पाकिस्तानविरुद्ध. बिशनसिंग बेदी कर्णधार असताना भिवविणार्या गोलंदाजीमुळे त्यांनी संगाची फलंदाजी सुरू ठेवण्यास नकार दिल्याची अजब घटना क्रिकेट इतिहासात घडली होती. ‘त्या’ सामन्यात एक चेंडू डोक्यावर आदळून रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी अंशुमनने ८१ धावा केल्या होत्या !!
“लॉंग ऑफला एक कबूतर आहे, … आणि हार्लीफोर्ड रस्त्यावरून एक लाल बस भरधाव निघालीय जोरदार आवाज करीत. गोलंदाज आता धावायला सुरवात करतो आहे …”क्रिकेटच्या समालोचनाला नवी क्षितिजे दाखविणार्या ‘ब्लोवर’चा जन्म
२३ सप्टेंबर १९३९ रोजी झाला – दुसर्या महायुद्धाच्या धामधुमीत. समालोचनामुळेच हेन्री ब्लोफेल्ड एवढा
विख्यात झाला की तो एक देखणा क्रिकेटपटू होता याचा विसर पडतो. शाळेत असतानाच त्याने क्रिकेटची मैदाने गाजविण्यास आरंभ केला होता. १९५७ मध्ये एटनच्या शाळेचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती झाली पण नियती आडवी आली. आपल्या सायकलवरून एटन क्रिकेट मैदानाकडे जात असताना त्याला एक बसने धडक दिली. २८ दिवस हेन्री बेशुद्ध होता. या अपघातांमुळे त्याच्या क्रिकेटबद्दल शंका निर्माण झाल्या. तरीही तो पुढे प्रथमश्रेणी सामने खेळला आणि काही सामन्यांमधून त्याने यष्टीरक्षणही केले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply