१९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते. या दिवशी पाकिस्तानतर्फे झिंबाब्बेविरुद्ध मैदानावर उतरत त्याने मुश्ताक मोहम्मदचा विक्रम मोडला. पाकिस्तानी जन्मप्रमाणपत्रांवर विश्वास ठेवणे तसे धार्ष्ट्याचेच पण पाकिस्तान मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माजिद खान यांच्या हवाल्यानुसार असून असून रजाचे वय याहून एक वर्ष अधिक असू शकते. मुश्ताक मोहम्मदचे ‘विक्रमी’ वय १५ वर्षे १२४ दिवस असल्याने त्याचा विक्रम तसाही मोडला गेला हे नक्की. कमी धावसंख्येच्या या सामन्यात रजाने २७ धावा काढल्या आणि पाकने हा सामना जिंकला. नंतर त्याला संघातून वगळण्यात आले पण २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने शारजात पुनरागमन केले. या सामन्यात त्याने नाबाद ५४ आणि ६८ धावा काढल्या.
बंधुपुराण – पूर्वार्ध १९६९ : कराचीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हनिफ आणि सादिक मोहम्मद या भावंडांनी पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. भावाभावांनी सलामी देण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती. ओवलवर १८८० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ई एम ग्रेस आणि डब्ल्यू जी ग्रेस यांनी डावाची सुरुवात केली होती. हनिफ मोहम्मदसाठी हा अखेरचा सामना ठरला. पाकिस्तानच्या कसोटी इतिहासातील पहिल्या सत्तावन्नपैकी तब्बल पंचावन्न सामन्यांमध्ये हनिफ खेळला.
बंधुपुराण – उत्तरार्ध १९७६ : भावाभावांचा आणखी एक विक्रम, तोही पाककडूनच. कसोटी सामन्याच्या एकाच डावात वैयक्तिक शतके पूर्ण करणारी सादिक (वरचाच) आणि मुश्ताक मोहम्मद (रजाने याचाच विक्रम मोडला होता) ही दुसरी जोडी ठरली. पहिली जोडी होती इअन आणि ग्रेग चॅपेल. सादिकने १०३ तर मुश्ताकने १०१ धावा करीत संघाला ४७३ एवढी मोठी धावसंख्या गाठून दिली. मुश्ताक, इंतिखाब आलम आि जावेद मियाँदाद (त्याचा हा दुसराच सामना होता) यांनी मिळून १० गडी बाद केले आणि हैद्राबादमधील न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना पाकने १० गडी राखून जिंकला. आपल्या पहिल्या सात सामन्यांमधून मियाँदादने १५ बळी घेतले होते पण नंतरच्या १०७ सामन्यांमधून त्याला अवघे दोन बळी मिळाले !
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply