भारतीय संघातून क्रिकेट खेळणे ही ज्यांच्या घराण्याची एके काळी मिराशी बनली होती (असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती) त्या घराण्यात २४ सप्टेंबर १९५० रोजी मोहिंदरचा जन्म झाला. ‘जिमी’ हे त्याचं लाडाचं नाव. जिमीचे वडील लालाजी आणि जिमीचा भाऊ सुरिंदर हेही कसोटीपटू होते. राजिंदर हा जिमीचा आणखी एक भाऊ. तो प्रथमश्रेणी खेळला.अजूनही मोहिंदरच्या चेहर्यावरून त्याचे वय दिसत नाही. आताही तो षोडशवर्षीय कुमार असल्याचेच भासते ! क्रिकेटचा सामना सुरू होण्यापूर्वी, मध्यंतरात आणि सामन्यानंतरही आजकाल जी टिवटिव आणि वीट आणणारी वटवट सुरू असते त्या जमान्यातही स्वयंस्फूर्त कवितेच्या ओळी गाऊन दाखविणारा मोहिंदर हा अतिशय सुखद अनुभव असतो. १९६९ संपता संपता मोहिंदर कसोटीपटू झाला आणि वेगवान गोलंदाजांचे आखूड टप्प्याचे चेंडू तो खेळू शकतो का अशी शंका घेतली जाऊ लागली. पहिल्या कसोटी मालिकेनंतर पुन्हा कसोटी खेळण्यासाठी त्याला १९७५ पर्यंत थांबावे लागले. कारकीर्द संपता संपता मात्र त्याची ओळख तत्कालीन फलंदाजांमधील बिनीच्यांपैकी एक अशी होती. सुनील गावसकरने आपल्या ‘आयडॉल्स’ नावाच्या पुस्तकात जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक अशी मोहिंदरची प्रशंसा केली आहे.१९८२-८३ च्या हंगामात ११ सामन्यांमधून मोहिंदरने १,००० हून अधिक धावा जमविल्या. याच हंगामाचे विश्लेषण करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान याने मोहिंदर हा त्यावेळी जगातील सर्वोत्तम फलंदाज होता असे म्हटले होते. ते खरेही होते – पाकिस्तान आणि तोफखान्यांची जन्मभूमी असलेल्या विंडीजविरुद्ध त्या धावा निघाल्या होत्या. एवढे असूनही मोहिंदरच्या कसोटी स्थानाची शाश्वती कधीच नव्हती याच्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याची कसोटी कारकीर्द दोन दशकांमध्ये पसरलेली आहे. अनेकदा त्याला संघातून वगळण्यात
आले आणि त्या प्रत्येक वेळी मोहिंदरने आपल्या खेळाच्या धडाक्याने संघाची दारे स्वतःसाठी खुली केलेली आहेत. ‘त्याला नियमितपणे संधी मिळायला हवी होती’ हे बोल कुणा भारतीयाचे
नाहीत – दस्तुरखुद्द इम्रान खानचे आहेत
!आणखी काही खास गोष्टी मोहिंदरच्या नावावर आहेत – क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने बाद दिला गेलेला पहिला आणि आजवरचा एकमेव भारतीय फलंदाज; चेंडू हाताळल्यामुळे बाद दिला गेलेला जगातील पहिला फलंदाज (एकदिवसीय सामने) आणि – विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील एकमेव भारतीय सामनावीर.
मोहिंदर अमरनाथच्या जन्मानंतर ५६ वर्षांच्या अंतराने भारताने एक विश्वजेतेपद पटकावले – अगदी पहिल्याच विसविशीत स्पर्धेत. तेही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अंतिम फेरीत सामना करून. भारताचा एक विश्वविजय साक्षात् पाहण्याचे भाग्य आम्हांस जरूर लाभले पण त्यानंतरच्या दोन वर्षांतील भारतीय संघाची त्याच स्पर्धेतील कामगिरी पाहता तो विजय ‘फ्ल्यूक’ होता असेच माझे ‘ठाम्हणे’ (ठाम म्हणणे) आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply