१८९१ मधील क्रिस्मसच्या दिवशी क्लॅरेन्स व्हिक्टर ग्रिमेटचा जन्म झाला. क्लॅरी ग्रिमेट या नावाने तो प्रसिद्ध आहे. जन्म न्यूझीलंडमधला पण आपले बरेचसे क्रिकेट क्लॅरी ऑस्ट्रेलियासाठी खेळला. जुन्या काळातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आणि फ्लिपरचा जन्मदाता अशी ग्रिमेटची ख्याती आहे.
ग्रिमेटला वेगवान गोलंदाजीचे आकर्षण होते पण
त्याच्या मुख्याध्यापकांनी त्याला फिरकीवर लक्ष केंद्रित करावयास सांगितले. वेलिंग्टमध्ये क्लब क्रिकेट खेळत खेळत क्लॅरी मोठा झाला आणि वेलिंग्टनकडूनच त्याचे प्रथमश्रेणी पदार्पण झाले. या पदार्पणावेळी त्याचे वय सतरा वर्षांचे होते आणि न्यूझीलंड कसोटी संघाचा तर जन्मही झालेला नव्हता.
१९१४ मध्ये ग्रिमेट ऑस्ट्रेलियात दाखल झाला. सिडनीमध्ये तो तीन वर्षे क्लब क्रिकेट खेळला. विवाहानंतर तो पत्नीच्या प्रांताकडून- विक्टोरियाकडून क्रिकेट खेळू लागला. त्याने खरे नाव कमावले ते मात्र ऑस्ट्रेलियाई संघाकडून कसोट्या खेळूनच.
१९२४ ते १९३६ या काळात ग्रिमेट ३७ कसोट्या खेळला. या काळात एका फलंदाजामागे केवळ २४.२१ धावा मोजत त्याने २१६ बळी मिळविले. दोनशे कसोटी बळी घेणारा क्लॅरी ग्रिमेट हा कसोटिहासातील पहिला गोलंदाज बनला. वयाच्या तिशीनंतर पदार्पण करून कसोटी बळींचे शतक पूर्ण करणारे कंदुकफेके दोनच- पहिला क्लॅरी आणि दुसरा दिलीप दोशी (पहा २२ डिसेंबर).
२१६ भागिले ३७ = ५.७८ म्हणजे प्रत्येक कसोटीमागे तब्बल सहा बळी !! बिल ओरेली आणि क्लॅरी ग्रिमेट हे दोघे जोडीने वाट लावण्यासाठी विख्यात आहेत. तब्बल एकवीस वेळा क्लॅरीने पाचाळ्या मिळविल्या आणि सात वेळा त्याने सामन्यात किमान दहा गडी बाद केले.
वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चव्वेचाळीस गडी बाद केले. एवढे गडी बाद करूनही नंतर त्य चा संघात समावेश झाला नाही !
२४८ प्रथमश्रेणी सामन्यांमधून त्याने १,४२४ बळी मिळविले, पुन्हा सामन्यामागे सुमारे सहा बळी. ७९ शेफिल्ड शील्ड सामन्यांमधून त्याने ५१३ बळी मिळविले.
<कसोट्यांमध्ये किमान २०० बळी मिळविणारे फिरकीपटू
१. मुथय्या मुरलीदरन (श्रीलंका) १३३ कसोट्या, ८०० बळी.
२. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) १४५ कसोट्या, ७०८ बळी.
३. अनिल कुंबळे (भारत) १३२ कसोट्या, ६१९ बळी.
४. हरभजन सिंग (भारत) ९१ कसोट्या, ३८० बळी.
५. डॅनिएल वेटोरी (न्यूझीलंड) १०३ कसोट्या, ३३९ बळी.
६. लान्स गिब्ज (वेस्ट इंडीज) ७९ कसोट्या, ३०९ बळी.
७. बिशनसिंग बेदी (भारत) ६७ कसोट्या, २६६ बळी.
८. दानिश कनेरिया (पाकिस्तान) ६१ कसोट्या, २६१ बळी.
९. रिची बेनॉ (ऑस्ट्रेलिया) ६३ कसोट्या, २४८ बळी.
१०. भागवत चंद्रशेखर (भारत) ५८ कसोट्या, २४२ बळी.
११. अब्दुल कादिर (पाकिस्तान) ६७ कसोट्या, २३६ बळी.
१२. क्लॅरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया) स-द-ती-स कसोट्या, २१६ बळी.
१३. स्टुअर्ट मॅकगिल (ऑस्ट्रेलिया) ४४ कसोट्या, २०८ बळी.
१४. सकलेन मुश्ताक (पाकिस्तान) ४९ कसोट्या, २०८ बळी.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply