१९०९ : इमॅन्युएल आल्फ्रेड ऊर्फ ‘मॅनी’ मार्टिन्डेलचा जन्म. मॅनीचा वेस्ट इंडीजकडून केवळ दहा कसोट्यांमध्ये खेळला. १९३३ मध्ये मॅनी आणि लिअरी कॉन्स्टन्टाईनने इंग्लंडच्या संघाला इंग्लंड संघाने शोधलेलीच दवा पाजली होती – शरीरवेधी गोलंदाजी. ओल्ड ट्रॅफर्डवरील दुसर्या कसोटीत या दोघांनी आखूड टप्प्याचे चेंडू टाकून पाहुण्या ब्रिटिशांना बेजार केले. मार्टिन्डेलने वॉल्टर हॅमंडची हनुवटीही शेकली आणि त्या मालिकेत केवळ तीनच डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने तब्बल १४ बळी मिळविले.
१९५२ : पाकिस्तानच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा जन्म, नामे इम्रान खान नियाजी.
१९७१ ते १९९२ या काळात इम्रान पाकिस्तानी संघाकडून क्रिकेट खेळला. कारकिर्दीच्या अखेरच्या दशकात ‘अधूनमधून’ तो संघाचा कर्णधारही होता. १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो निवृत्त झाला पण पुढच्याच वर्षी त्याला माघारी बोलावण्यात आले. वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी त्याने नायकपद सांभाळीत पाकिस्तानाल विश्वविजेतेपद मिळवून दिले. कसोटी सामन्यांमध्ये ३,००० धावा आणि ३०० बळी अशी कामगिरी आजवर केवळ आठ खेळाडूंना करता आली आहे. इम्रान खान त्यापैकी एक ठरतो.
नियाजी पठाणी कुटुंबात जन्म झालेल्या इम्रानचे शिक्षण लाहोरात आणि इंग्लंडमध्ये झाले. १९७२ मध्ये इम्रान ऑक्सफर्डमधील केब्ले कॉलेजात तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र शिकण्यासाठी शरीक झाला. राजकारणात द्वितीय श्रेणी आणि अर्थशास्त्रात तृतीय श्रेणी मिळवून तो पदवीधर झाला.
मे १९९५ मध्ये जेमिमा गोल्डस्मिथ या धर्मांतरित मुस्लिम स्त्रीशी दोन मिनिटांच्या इस्लामी विधीनुसार इम्रानचा निकाह झाला. एका महिन्यानंतर इंग्लंडमधील एका नागरी समारंभात ते पुन्हा विवाहबद्ध झाले. निकाहच्या शर्तींनुसार इम्रानने वर्षातील चार महिने इंग्लंडमध्ये राहणे बंधनकारक होते. या विवाहातून दोन अपत्यांचा जन्म झाला. २००४ मध्ये‘जेमिमाला पाकिस्तानी जीवनशैलीशी जुळते घेता येत नाही’ या सबबीवरून इम्रान-जेमिमाचा काडीमोड झाला.
१९७१ मध्ये इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅममध्ये खेळून इम्रान आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला. १९७६-७७ च्या हंगामातील
न्यूझीलंड दौर्यापासून तो
नियमित खेळाडू बनला, तोवर त्याचे शिक्षणही संपलेले होते. १९७७ मध्ये तो जगातील एक गुणवत्तासंपन्न वेगवान खेळाडू असल्याची जाणीव क्रिकेटविश्वाला झाली. या दौर्यानंतर टोनी ग्रेगच्या नादाने इम्रान पॅकर सर्कशीत दाखल झाला.
८८ कसोट्यांमधून ३७.६९ च्या पारंपरिक सरासरीने ३,८०७ धावा तर २२.८१ च्या सरासरीने ३६२ बळी अशी इम्रानची कामगिरी आहे. पावणेदोनशे एदिसांमधून ३,७०९ धावा (सरासरी ३३.४१) आणि १८२ बळी (सरासरी २६.६१) अशी त्याची कामगिरी आहे.
एप्रिल १९९६ मध्ये इम्रानने पाकिस्तान तेहरीके-इन्साफ (न्यायासाठी आंदोलन) या राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाकडून आजवर एकच व्यक्ती पाकिस्तानी संसदेत निवडून आलेली आहे- दस्तुरखुद्द संस्थापक अध्यक्ष इम्रान खान.
शौकत खानुम ह्या इम्रान खानच्या आई. कर्करोगाने त्यांच्या आयुष्याचा बळी घेतला. जगभरातून निधी गोळा करून इम्रान खानच्या पुढाकाराने लाहोरात १९९६ मध्ये शौकत खानुम मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply