२ डिसेंबर १९३२ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा एक कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला. हा केवळ ‘आणखी एक’ कसोटी सामना नव्हता. क्रिकेटच्या इतिहासातीले एक अत्यंत ऐतिहासिक महत्त्व या सामन्याला जडलेले आहे. हा सामना ठरलेल्या कालावधीचा नव्हता, अर्थात निकाल लागेपर्यंत तो खेळविला जाणार होता.
कांगारू कर्णधार बिल वुडफूलने नाणेकौल जिंकला आणि डग्लस जार्डिनच्या नेतृत्वाखालील पाहुण्या संघाला गोलंदाजीचे आमंत्रण दिले. सामन्याच्या पहिल्या षटकातच पारंपरिक क्षेत्ररचना असूनही हॅरल्ड लार्वूडचा एक चेंडू बिल वुडफूलच्या डोक्याला लागला. त्यानंतर बिल पॉन्सफोर्ड आणि जॅक फिंगल्टन यांनाही चेंडूचा प्रसाद मिळाला. या सामन्याच्या वार्तांकनामधूनच ‘बॉडीलाईन’ या संज्ञेचा जन्म झाला हे स्पष्ट आहे पण नेमकी कुणी ती संज्ञा प्रथम वापरली असावी याबाबत मतभेद आहेत. जॅक वॉराल या लेखकाने आपण ती संज्ञा प्रथम वापरली असे म्हटले असले तरी ही संज्ञा ह्युग बग्गी या वार्ताहराच्या टेलिग्रॅममधूनच आलेली असण्याची जास्त शक्यता आहे.
उपरोल्लेखित कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळाचे वार्तांकन द सन या दैनिकाला पाठविताना बग्गीने (हा फिंगल्टनचा सहकारी होता) “इन द लाईन ऑफ द बॉडी” असे शब्द वापरले होते पण टेलिग्रॅमचा खर्च कमी करण्यासाठी या सहा शब्दांऐवजी “बॉडीलाईन” हा एकच शब्द अखेरीस त्याने वापरला आणि तो फार लवकर ‘प्रसिद्ध’ झाला.
वरचा परिच्छेदही तसा सर्वमान्य नाही. बग्गीने मेलबर्न एज या दैनिकाला एक प्रत पाठविली आणि तिथे काम करणार्या एका उप-संपादकाने बॉडीलाईन ही संज्ञा वापरली असेही उल्लेख काही ठिकाणी आहेत.
१९३२-३३ च्या या दौर्यानंतर एमसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले. गोलंदाजी ही फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशानेच केली जात आहे असे जाणवल्यास हस्तक्षेप करण्याचा अधिकार पंचांना देण्यात आला. या घटनेनंतर पाव शतकाच्या अंतराने या
घटनेशी लांबचे नाते सांगणारा एक नियम
अस्तित्वात आला. स्क्वेअर लेगच्या मागील भागात (टोल्या फलंदाजाच्या बाजूचे पंच जिथे उभे असतात ते स्थान म्हणजे स्क्वेअर लेग) जास्तीत जास्त दोनच क्षेत्ररक्षक तैनात केले जाऊ शकतील असा नियम आला. शरीरवेधी गोलंदाजीच्या युक्तीमध्ये लेग साईडला क्षेत्ररक्षकांचे कोंडाळे उभे करून जाणूनबुजून उसळते चेंडू टाकण्याचा समावेश होतो. लेगसाईडला क्षेत्ररक्षक कमी असल्यास तिकडे चेंडू टोलविला जाऊन अधिक धावा निघतील अशी शक्यता निर्माण करवून गोलंदाजाला आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यापासून परावृत्त करणे ही या नियमामागची प्रेरणा होती.
नंतर ‘भयप्रद आखूड टप्प्याची गोलंदाजी’ या शीर्षकाखाली एका षटकात टाकल्या जाऊ शकणार्या बाऊन्सर्सची संख्या दोन एवढी निश्चित करण्यात आली. प्रत्यक्ष शरीरवेधी गोलंदाजीचे भय मात्र नंतर हेल्मेटसारख्या संरक्षक वस्तूंच्या वापराने कमी झाले.
या पहिल्या कसोटीबाबत आणखी काही दखलपात्र गोष्टी अशा : ऑस्ट्रेलियन मंडळाशी झालेल्या मतभेदांमुळे डॉन ब्रॅडमन या सामन्यात नव्हते. इंग्लंडच्या संघात पतौडीच्या थोरल्या नवाबांचा समावेश होता. ह्या पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी शतक काढले आणि इंग्लंडला दुसर्या डावात विजयासाठी तब्बल एक धाव काढण्याचे कडवे आव्हान मिळाले होते !
क्रिकेटच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांपैकी एक असा ‘बॉडीलाईन टूर’चा सार्थ उल्लेख केला जातो. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स या प्रांताच्या अकराव्या इयत्तेच्या आधुनिक इतिहासाच्या पुस्तकात या दौर्याचा समावेश दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेला आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply