व्हिक्टर ट्रम्पर १८७७ : ब्रॅडमनपूर्व ऑस्ट्रेलियातील सर्वश्रेष्ठ फलंदाजाचा जन्म. अत्युत्तम हस्त-नेत्र सुसंबद्धतेमुळे व्हिक्टर ट्रम्पर हा देखणेपणाचा आदर्श नमुना ठरला. तो अनुकूल परिस्थितीतच धावा करणार्यांपैकी नव्हता. त्याची सर्वोत्तम खेळी अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत झाली : १९०२ मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या चिकट खेळपट्टीवर १०४, १९०३-०४ मध्ये इंग्लंडविरुद्ध मेलबर्नमध्ये (१२२ पैकी) ७४ आणि सात वर्षांनंतर याच मैदानावर त्याने काढलेल्या १५९ धावांमुळे दक्षिण आफ्रिका पराभूत झाली. ४८ सामन्यांमधून त्याची सरासरी ३९ एवढी राहिली. वयाच्या सदतिसाव्या वर्षीच ब्राईटच्या रोगाने (मूत्रपिंडाला ज्यात दाहयुक्त सूज येते त्या रोगाचे ब्रिटीश संशोधक रिचर्ड ब्राईट यांच्या नावावरून पडलेले नाव) त्याचा बळी घेतला. ऑस्ट्रेलियातर्फे सलामीला खेळताना अनेक मजबूत भागीदार्या रचलेल्या आहेत.
फ्रेड बेक्वेल १९०८ : विचित्र पवित्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रेड बेक्वेलचा जन्म. तो खूप वाकून उभा राही आणि बॅटच्या दांड्याच्या दोन्ही टोकांना एक एक हात लावत एखादे झाड तोडण्यासाठी कुर्हाड धरावी तसा उभा राही. विज्डेनच्या म्हणण्यानुसार ‘तो असा उभा राही की त्याचा उजवा खांदा इतका वळलेला असे की हा खांदा आत्ता मिडॉनला जाईल असे वाटे.’ एवढा वेगळेपणा असूनही त्याची प्रतिभा नाकारता येणार नाही. पुस्तकातील सर्व फटके त्याला जमत आणि आपल्या तिसर्याच कसोटीत ओवलवर विंडीजविरुद्ध त्याने शतक काढले. तो त्यापुढे आणखी तीनच सामने खेळला, हा भाग अलहिदा. १९३६ मध्ये एका कार अपघातात त्याला गंभीर इजा झाली आणि तो पुढे प्रथमश्रेणीतही खेळू शकला नाही. नियतीने त्याला वयाच्या सत्ताविसाव्या वर्षीच क्रिकेटपासून अलग केले. १९८३ साली डॉर्सेट येथे त्याला मृत्यू आला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply