२१ वॉर्ड ऑफिस, चार जिल्हा उपनिबंधक कार्यालये, एक विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि त्यामध्ये नोंदणी झालेल्या ३३६०० सहकारी संस्था. या संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी शासकीय यंत्रणा म्हणजे सहकार खात्याचा मुंबई विभाग.
हा अवाढव्य कारभार कोणत्या महानगरपालिकेचा नसून सहकारी संस्थांच्या मुंबई विभागाचा आहे. सहकार व्यवस्थेचा भलामोठा गाडा ओढतायत केवळ २५९ अधिकारी आणि कर्मचारी. २० वर्षांत सहकारी संस्थांची संख्या तिपटीने वाढली तरी कर्मचारी मात्र तेवढेच आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे विचारणा केली असता आहे त्याच्यावरच चालवून घ्या असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबापुरीतही सहकारी चळवळीने चांगलाच जोर धरला असून सहकारी बँका, पतसंस्था, गृहनिर्माण सोसायट्या अशा तब्बल ३३६०० हून अधिक संस्थांची नोंदणी मुंबई विभागात झाली आहे. या संस्थांची नोंदणी करणे, अहवाल तपासणे, निवडणुका घेणे, वेगवेगळ्या अपिलीय सुनावण्या घेणे, माहितीच्या अधिकारात मागेल त्याला माहिती उपलब्ध करून देण्याचे काम येथून चालते. २०११च्या आकृतीबंधानुसार मुंबई विभागासाठी ३५९ पदे मंजूर होती. त्यापैकी १०० जागा रिक्त होत्या. सध्या सहकारी संस्थांची संख्या भरमसाट वाढलेली असताना आजही येथे २५९ कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबई विभागाने नुकताच २१४ नवीन पदे भरण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठवला असल्याची माहिती सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील यांनी दिली.
मुंबई विभागात हजारो गृहनिर्माण सोसायट्या असून त्यांच्याबाबतची माहिती मागवणारी शेकडो पत्रे दररोज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे येतात. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नाहीत. त्यामुळे दैनंदिन कामकाजाकरिता असलेल्या कर्मचार्यांवरच माहिती अधिकार्यांवर माहिती देण्याचा भार पडतो. माहिती वेळेत देणे बंधनकारक असल्याने अनेकदा दैनंदिन कामे बाजूला ठेवावी लागत असल्याचे चित्र आहे.
मुंबई विभागातील अधिकारी-कर्मचारी
सहनिबंधक ३
उपनिबंधक १८
न्यायालयीन अध्यक्ष आणि सदस्य २
न्यायाधीश ४
द्वितीय श्रेणी कर्मचारी १३
तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचारी २१९
— अमित चोरगे
Leave a Reply