३ जानेवारी १९६६ रोजी लुधियानात चेतन शर्माचा जन्म झाला. भारताकडून प्रामुख्याने मध्यमगती गोलंदाज या नात्याने तो खेळला असला तरी त्याच्याकडे चांगल्या फलंदाजीची क्षमता देखील होती. पुरते सहा फूट एवढीही उंची नसताना ऐंशीच्या दशकातील सर्वाधिक वेगवान भारतीय गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश होई.
वयाच्या सोळाव्या वर्षी चेतन हरियानाकडून प्रथमश्रेणी खेळता झाला आणि त्यानंतर वर्षभराच्या आतच तो भारताकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळू लागला. ७ डिसेंबर १९८३ ही त्याच्या पहिल्यावहिल्या एकदिवसीय सामन्याची तारीख.
ऑक्टोबर १९८४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध लाहोरात त्याचे कसोटीपदार्पण झाले. कसोटीतील वैयक्तिक पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने मोहसिन खान या पाकिस्तानी सलामीवीराचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून त्याने चौदा बळी मिळवले. १९८५ च्या विश्वमालिकेत अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारताला विजय आवश्यक झालेला असताना चेतन शर्माने नाबाद ३८ धावांची खेळी केली.
ज्या चेंडूसाठी चेतन शर्मा अतिविख्यात झाला तो चेंडू त्याने टाकला शारजात १९८६ मध्ये ऑस्ट्रेलेशिया चषकाच्या अंतिम सामन्यात. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी चार धावांची आवश्यकता असताना चेतन शर्माने लेगस्टिकबाहेर एक कमी उंचीचा फुल्टॉस टाकला आणि जावेद मियांदादने त्या चेंडूवर सहा धावा ठोकल्या.
१९८६ च्या इंग्लंड दौर्यात भारतीय संघाने २-० असे यश मिळविले, त्यात चेतनचा मोठा वाटा होता. त्या मालिकेत तो दोनच सामन्यांमध्ये खेळला होता आणि या दोन सामन्यांमधून त्याने सोळा बळी मिळविले होते. बर्मिंगममध्ये त्याने दुसर्या डावातील ६-५८ सह एकूण दहा गडी बाद केले. इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये कुणा भारतीयाने सामन्यात दहा मिळविण्याची ही पहिलीच वेळ होती.
वीस वर्षे एवढेच वय असूनही तंदुरुस्तीच्या नावाने शर्मा यथातथाच होता. जेव्हा जेव्हा तो तंदुरुस्त असे तेव्हा तेव्हा तो कपिलसोबत गोलंदाजीला सुरुवात करी. कपिल आणि
चेतन हे देशप्रेम आझाद या एकाच गुरुचे
चेले !
वेगवान गोलंदाज आणि खालच्या क्रमांकावर येऊन धावा करण्याची क्षमता या गोष्टींमुळे कपिलनंतरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून चेतनकडेच पाहिले जात होते पण नंतर नंतर अगदी भारतीय खेळपट्ट्यांवरही त्याच्या गोलंदाजीतील आग दिसेनाशी झाली.
विश्वचषक स्पर्धांमधील पहिला त्रिक्रम चेतनच्या नावे आहे. ही कामगिरी त्याने केली १९८७ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध. केन रदरफोर्ड, इअन स्मिथ आणि इवेन चॅटफिल्ड – तिघेही त्रिफळाबाद. १९८९ च्या नेहरू करंडकात त्याला वन-डाऊन पाठविण्यात आलेले असताना त्याने नाबाद १०१ धावा काढल्या. पासष्ट एकदिवसीय सामन्यांमधून त्याने काढलेले हे एकमेव शतक.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply