एडी पेंटर १९०१ : एडी पेंटरचा जन्म. इंग्लंडकडून किमान दहा कसोटी डाव खेळणार्यांमध्ये फक्त हर्बर्ट सटक्लिफची सरासरी (६०.७३) त्याच्यापेक्षा (५९.२३) जास्त आहे. डावखुर्या पेंटरने वयाच्या एकोणतिसाव्या वर्षापर्यंत पदार्पणच केले नाही आणि एकूण वीसच सामन्यांमध्ये तो खेळला. यातील सात सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होते. रक्षा मालिकेत त्याची सरासरी आहे ८४ : इतर कोणताही इंग्रज या आकड्याच्या जवळपासही नाही. त्याने दोन द्विशतके काढली. एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दुसरे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. त्याचा संस्मरणीय डाव म्हणजे ब्रिस्बेनमध्ये १९३२-३३ साली टॉन्सिलची सूज आणि स्वास्थ्यरक्षक या दोहोंनाही न जुमानता आठव्या क्रमांकावर त्याने काढलेल्या ८३ धावा आणि रक्षा मालिका जिंकविणारा त्याने मारलेला षटकार.
आडवा आलेला मलिक १९९४ : ५ नोव्हेंबर १९९४ हा ऑस्ट्रेलियनांसाठी तडफड वाढविणारा एक दिवस ठरला. लाहोरात तिसर्या कसोटीच्या चौथ्या दिवसाखेर पाकिस्तानने दुसर्या डावात ५५ धावांची आघाडी घेतली होती आणि पाच फलंदाज शिल्लक होते. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्याची संधी कांगारूंना होती. पाकिस्तानचा कर्णधार सलीम मलिक मात्र ठामपणे खेळपट्टीवर उभा राहिला. दुसर्याच कसोटीत २३७ धावा करून त्याने सामना वाचवला होता आणि शेन वॉर्न व टिम मे यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या दिवशी वैयक्तिक १४३ धावा काढत आमीर सोहेलसोबत सहाव्या गड्यासाठी त्याने १९६ धावा जोडल्या. विज्डेनने लिहिले : ‘धावफलक सोडून सर्वत्र ऑस्ट्रेलिया विजयी झाली.’ पाकिस्तानमधील कसोटी विजयाची १४ सामने आणि ३५ वर्षांची कांगारूंची प्रतीक्षा अखेर १९९८-९९ मध्ये संपली.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply