स्लॅटर स्लॉटर १९९९ : मायकेल स्लॅटरचा धमाका. ब्रिस्बेन कसोटीत पाकिस्तानच्या ३६७ धावांना प्रत्युत्तर देताना कुणीही सावधच सुरुवात केली असती पण मायकेल स्लॅटरने वेगवान १६९ धावा काढल्या आणि ग्रेग ब्लिवेटसोबत पहिल्या जोडीसाठी २६९ धावा रचल्या. पाकिस्तानविरुद्ध कांगारूंचा हा विक्रम होता. नंतर मार्क वॉने शतक काढले. अडम गिल्क्रिस्टने त्याच्य पहिल्याच कसोटी डावात ८८ चेंडूंमध्ये ८१ धावा काढल्या आणि शेन वॉर्नने चार षटकारांसह ८६ धावा काढताना अंतिम जोडीसाठी स्कॉट म्यूलरसह (नाबाद ६) ८६ धावा जोडल्या. कांगारूंनी पहिल्या डावात पावणेसहाशे धावा काढल्या. अखेर हा सामनाही त्यांनी दहा गडी राखून जिंकला.
कामिकाझे किड १९५६ : पश्चिम ऑस्ट्रेलियात ग्रॅएम वूडचा जन्म. या डावखुर्या सलामीवीराला ‘कामिकाझे किड’ (स्वतःला गोत्यात आणणार्या गोष्टी स्वतःहून करणारा मुलगा) असे संबोधले जाते. १९७८-७९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अपयशानंतर त्याला हे संबोधन चिकटले. उल्लेखनीय गोष्ट अशी की त्याच्या कारकिर्दीत दोन वेळा शतकानंतर सलग तीन वेळा तो शून्यावर बाद झाला. १९८५ च्या इंग्लंड दौर्यानंतर त्याची कारकीर्द संपल्यात जमा होती पण घरगुती स्पर्धांमधील जबरदस्त कामगिरीमुळे तो संघात परतला. पर्थमध्ये मार्शल, वॉल्श, अम्ब्रोज, पॅटर्सन यांच्याशी दोन हात करीत त्याने शतक काढले पण पुढच्याच सामन्यानंतर त्याला संघातून कायमचे वगळण्यात आले. मार्क टेलर हा दुसरा डावखुरा सलामीवीर कांगारूंना गवसला होता.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply