नवीन लेखन...

डिसेंबर ०७ : भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय यष्टीरक्षक आणि जेफ लॉसन





७ डिसेंबर १९०२ रोजी फुलगावात (महाराष्ट्र) जनार्दन ग्यानोबा नवलेंचा जन्म झाला. भारतीय संघाने खेळलेल्या पहिल्यावहिल्या अधिकृत कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून त्यांचा संघात समावेश होता.

वयाच्या सोळाव्या वर्षी चौरंगी सामन्यांमध्ये खेळण्यास नवलेंनी प्रारंभ केला आणि तिथपासून पुढची सोळा वर्षे ते हिंदूंच्या संघाचे यष्टीरक्षक राहिले. १९३२ मध्ये इंग्लंड दौर्‍यात भारत आपला पहिला अधिकृत कसोटी सामना खेळला. लॉर्ड्सवरील या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात कर्णधार डग्लस जार्डिनचा बळी सी के नायडूंनी मिळविला. यष्ट्यांमागे उभे असताना जनार्दन नवलेंनी अधिकृत कसोट्यांमध्ये मिळविलेला हा पहिला व एकमेव झेलबळी. भारताच्या पहिल्या डावातील पहिल्या चेंडूचा सामना नवलेंनीच केला. वैयक्तिक १२ धावांवर तो बाद झाले. दुसर्‍या डावात त्यांनी १३ धावा काढल्या.

आणखी एका अधिकृत कसोटीत ते खेळले. १९३३ च्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध मुंबईच्या जिमखाना ग्राऊंडवर. हा भारतीय भूमीवरील पहिलाच कसोटी सामना होता. इथे त्यांनी पहिल्या डावात १३ आणि दुसर्‍या डावात ४ धावा काढल्या. दुसरा डाव लाला अमरनाथांनी शतक काढून गाजविला होता.

७ डिसेंबर १९५७ रोजी जेफ लॉसनचा जन्म झाला. ऑस्ट्रेलियाकडून खेळलेला एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक अशी लॉसनची मैदानी ओळख आहे. ‘हेन्री’ या टोपणनावाने तो ओळखला जातो.

१९७८-७९ च्या हंगामात लॉसन प्रथम प्रकाशात आला. इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आलेला असताना न्यू साऊथ वेल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात एका वेगवान गोलंदाजाने जेफ बॉयकॉटला बाऊन्सर्स टाकून हैराण केले होते. तो वेगवान गोलंदाज होता जेफ लॉसन. १९७९ च्या भारत दौर्‍यावर बदली खेळाडू म्हणून त्याला बोलावण्यात आले पण कसोटी त्याच्या वाट्याला आली नाही. पुढच्या वर्षीच्या पाकिस्तान दौर्‍यातही त्याला कसोटी पावली नाही.

१९८०-८१ च्या हंगामात न्यूझीलंडविरुद्ध अखेर लॉसन ‘पदार्पिता’ झाला. ब्रिस्बेनमधील या कसोटीत त्याला

तीन बळी मिळाले. १९८१ च्या

इंग्लंड दौर्‍यात लॉर्ड्सवर पहिल्याच डावात त्याने ८१ धावांमध्ये ७ गडी बाद केले आणि कसोटीवीराचा बहुमान मिळविला. ही लॉसनची तिसरीच कसोटी होती. १९८२ च्या पाकिस्तान दौर्‍यात त्याने नऊ बळी मिळविले. याच वर्षाची अशेस मालिका त्याने गाजवली.

कारकिर्दीत एकूण ४६ कसोट्यांमधून तब्बल १८० बळी लॉसनने मिळविले. क्रिकेटपटू असण्याबरोबरच लॉसनने न्यू साऊथ वेल्स विद्यापिठातून ऑप्टोमेट्रीची पदवी मिळविलेली होती. एका स्थानिक सामन्यात तो गोलंदाजी करीत असताना वारंवार केलेल्या आग्रहांना (अपील्स) पंच दाद देत नाहीत हे पाहून त्यांचा चष्मा भर मैदानात तपासण्याचा प्रयत्न त्याने केला होता असे सांगितले जाते !

जुलै २००७ पासून सुमारे सव्वा वर्षे त्याने पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. आता तो स्तंभलेखक आणि समालोचकाच्या भूमिकेतून क्रिकेटवर ‘नजर’ ठेवून आहे.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..