३३१ ची भिडूगिरी १९९९ : तीनच दिवसांपूर्वी राजकोटमध्ये झालेला सामना न्यूझीलंडने त्यांची सर्वोच्च धावसंख्या (३४९) उभारून जिंकल होता. मालिकेतील दुसर्या सामन्यात हैद्राबादमध्ये भारतीयांनी किवींचा १७४ धावांनी दणदणीत पराभव केला आणि मालिकेत बरोबरी आणली. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी ३३१ धावा भागीदारीत जोडल्या. एकदिवसीय सामन्यात कुठल्याही क्रमांकाच्या जोडीसाठी हा विक्रम आहे. राहुल द्रविडने १५३ चेंडूंमध्ये तितक्याच धावा काढल्या पण त्याच्यापेक्षा तीन चेंडू कमी खेळून ३३ धावा जास्त काढणार्या तेंडुलकरमुळे तो झाकोळून गेला. हातोडा सर्वच गोलंदाजांना त्रासदायक ठरला. क्रिस ड्रमने ९ षटकांमध्ये ८५ धावा दिल्या. शेवटच्या सहा षटकांमध्ये भारतीयांनी ९० धावा काढल्या.
उलटा झाडू, सुटला चषक १९८७ : माईक गॅटिंगने झाडूचा उलटा फटका मारण्याचा भयावह (आणि अयशस्वी) प्रयत्न केला तो हा दिवस. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी २५४ धावांचे आव्हान इंग्रजांना मिळाले होते. अलन बॉर्डरचा पहिलाच चेंडू रिवर्स स्वीप (बॅटवरची पकड बदलून बॅटच्या नैसर्गिक झोकाच्या उलट दिशेने पोटाकडील बाजूस- ऑफ साईडला –फलंदाजाने मारलेलाफटका) करण्याचा प्रयत्न इंग्लिश कर्णधार गॅटिंगने केला, बॅटच्या वरच्या कडेला लागून उडालेला चेंडू थेट यष्टीरक्षक ग्रेग डायरच्या मोज्यांमध्ये स्थिरावला. गॅटिंग गेला तेव्हा इंग्लंडला १५ षटकांमध्ये १०२ धावांची गरज होती. माईक व्हेलेट्टाने ३१ चेंडूंमध्ये ४५ धावा झोडल्या पण अलन लँबचा बळी निर्णायक ठरला. ४५ धावांवर असताना लँबला स्टीव वॉने त्रिफळाचित केले. इंग्लंडचे शेपूट लांबलचक होते पण वॉने ते अलगद कापून काढले. सुमार दर्जाच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या आगमनाची घोषणा केली आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply