प्रकाशन दिनांक :- 07/09/2003
मनुष्यप्राण्याची आणि त्यातही आपल्या देशातील मनुष्यप्राण्याची काही खास वैशिष्ट्ये सांगायची असतील तर त्यात ‘उत्सवप्रियता’ या वैशिष्ट्याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. साजरा करणे या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या या देशातील लोकांनी अगदी नको त्या गोष्टीला नको तितके महत्त्व देऊन उत्सवाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे अगदी वैयक्तिक किंवा खासगी स्वरूपात साजरी करण्याची बाबसुद्धा सार्वजनिक होऊन गेली आहे. असे करताना मुळात त्या उत्सवामागची संकल्पना, प्रेरणा किंवा उद्देश काय आहे/होता, याचे भान आम्हाला राहत नाही. साजरे करण्यासाठी आम्ही कोणते तरी कारण, कोणती तरी संधी शोधतच असतो आणि सुदैवाने (किंवा दुर्दैवाने म्हणणेच अधिक योग्य ठरेल) आम्हाला अशी निमित्तं भरपूर मिळतात. मग काय, आमच्या तरूणाईला उधाण येते, धुंदीला बहार येतो. एका उत्सवाची धुंदी उतरत नाही तोच दुसरा उत्सव आपल्या आगमनाची नांदी देतो.
खरे तर सण-उत्सवाची विपुलता स्वस्थ सामाजिक-सांस्कृतिक विकासाची परिचायक आहे. त्यांच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाजातील वीण घट्ट होत असते. कुटुंबात,समाजात एकजिनसीपणा निर्माण करण्याचे, परस्पर सौहार्द वाढविण्याचेच काम हे उत्सव करीत असतात. परंतु काळाच्या वेगवान आणि परिवर्तनशील गतीशी त्यांची सांगड घालणे तितकेच महत्त्वाचे ठरते. पन्नास-शंभर वर्षापूर्वी जे उपयुक्त होते ते आज तितकेच उपयुक्त असेलच असे नाही. अलीकडील काळात तर बदलांची गती इतकी तीप झाली आहे की, अगदी कालची गोष्टसुद्धा आज कालबाह्य ठरू शकते. त्यामुळे आपले अस्तित्त्व टिकवून शर्यतीतले आव्हान कायम राखण्यासाठी काळाच्या गतीशी जुळवून घेणे भाग आहे. आम्ही नेमके तिथेच कमी पडत आहोत. वेळ, पैसा आणि श्रमशक्ती ही अस्तित्वाच्या आधुनिक लढाईतील महत्त्वाची आणि पर्याय नसलेली हत्यार
आहेत. ही हत्यारं अतिशय काळजीपूर्वक वापरणे भाग आहे. त्या पृष्ठभूमीवर आपली भूमिका, आपले विचार, आपली कार्यशैली तपासली असता जे
चित्र उभे राहते ते अतिशय
निराशाजनक आहे. वेळ, पैसा आणि श्रमशक्तीच्या महत्त्वाची आपल्याला जाणीवच नाही. एवढा मोठा आपला देश, प्रचंड लोकसंख्या, विपूल साधनसंपत्ती, परंतु विकासाच्या बाबतीत मात्र आम्ही पार मागासलेले हो! असा सुस्कारा सोडत तासन्तास गंभीर चर्चा करणाऱ्यांची या देशात कमतरता नाही, परंतु चर्चेतले हे गांभीर्य कृतीत कधीच उतरत नाही.
सध्या सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’ ची धुंदी पसरली आहे. हजारो-लाखो लोकांना (आणि त्यात तरूणांचा भरणा खूप मोठ्या प्रमाणात) दहा दिवस दुसरे काही सुचणार नाही. घराघरात, गल्लीबोळात गणराया विराजमान झालेले आहेत. त्यांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सर्वत्र उत्सवाचे वातावरण असते. कुठे नाचगाणी होतात, कुठे सांस्कृतिक कार्यक्रम तर कुठे व्याख्यानमालाही. कुठे वर्गणीच्या रक्कमेचे वाटप कसे करायचे यावर वितंडवाद रंगतात. हे सगळं त्या गणेशाच्या साक्षीने चालत असते. तोही बिचारा विवश असतो. बुद्धीच्या महानायक, परंतु इच्छा असूनही थोडीशीही बुद्धी आपल्या कथित भक्तांना देऊ शकत नाही.
टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले ते स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने. आज स्वातंत्र्यानंतरच्या दोन पिढ्या संपल्या तरी ती प्रथा सुरूच आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य, मांगल्य कायम ठेवून जनप्रबोधनाचे कार्य या निमित्ताने झाले असते तर ही प्रथा सुरू ठेवण्यात काही अर्थ राहिला असता. परंतु आज गणेशोत्सवाला जे हिडीस स्वरूप झाले आहे ते पाहून टिळकांनाही स्वर्गात पश्चाताप होत असेल. पावित्र्य, मांगल्य तर केव्हाच लोप पावले आहे आणि जनप्रबोधनाची जागा अत्यंत खालच्या स्तरातील मनोरंजनाने घेतली आहे. काही गणे
मंडळे त्याला अपवाद असतील परंतु बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव रिकामचोट लोकांचा वेळ घालविण्याचा उपाय ठरले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची उपयुक्तता आणि औचित्य दोन्हीही संपुष्टात आले आहे. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसादरम्यान किती वेळ, पैसा, श्रमशक्ती खर्च होते याचा हिशोब केला तर तेवढ्याच गुंतवणुकीत कितीतरी समाजोपयोगी किंवा राष्ट्राच्या हिताचे उपक्रम राबविता येतील, हे आपल्या सहज लक्षात येईल. ही समस्या केवळ गणेशोत्सवाशी संबंधित नाही. एकूण सर्वच सण आणि उत्सवांकडे पाहण्याची आमची दृष्टी योग्य नाही. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आणि विशिष्ट झाडाची लाकडे जाळून होळी पेटवायची असते. त्यापासून निघणाऱ्या धुराने निर्माण होणाऱ्या उष्णतेने वातावरण शुद्ध होते. पर्यावरणाचे संतुलन बिघडवू पाहणारे हवेतील घटक नष्ट होतात, ही त्यामागची संकल्पना. परंतु आज होळी आणि शिमग्याची अवस्था आम्ही काय केली आहे? ज्याच्या मागची प्रेरणा, संकल्पना, श्रद्धा समजून घेऊन साजरा केला जातो, असा एकतरी सण आहे का? सगळ्या सणांना आम्ही उत्सवाचे स्वरूप दिले आहे आणि उत्सवाची आमची व्याख्या आहे निव्वळ मौजमस्ती, धांगडधिंगा. त्यात मांगल्य कुठेही नसते, श्रद्धा तर केव्हाच लोप पावली. हे सगळे सण केवळ निमित्त म्हणून ठरले आहेत. केवळ सणच नाही तर जन्म, मरण, लग्न यासारख्या बाबीदेखील उत्सवाच्या निमित्त ठरत आहेत. एखाद्याचा वाढदिवस आहे, तो साजरा तर झालाच पाहिजे. चला कुठेतरी रम्य ठिकाणी. उघडा बाटल्यांची बुचं, फेसाळू द्या ग्लास, म्हणा चिअर्स! मनसोक्त खा! मनसोक्त प्या! आयुष्याचा एक दिवस बरबाद करून परत या आणि वाट पहा दुसऱ्या एखाद्या मित्राच्या वाढदिवसाची! लोकं मरणाचेही सोहळे करतात. माणूस गेला, संपलं. त्यानंतर जे काही धार्मिक विधी करायचे ते घरातल्या घरात करावे, त्याची व्याप्ती कुटुंबापुरती 2-3 दिवसापूरती
मर्यादित ठेवावी. पण नाही; उत्सवप्रियतेच्या सुप्त अभिलाषेला ही संधी कशी सोडाविशी वाटेल? बारा दिवस सुतक पाळल्यानंतर तेरवीचा मोठा थाट मांडला जातो, जो बिचारा कोरभर भाकरीसाठी तरसत मेला त्याच्या नावाने गोड जेवणाच्या प्रसंगी कर्ज काढून पंगतीच्या पंगती उठतात. सांगायचे तात्पर्य, येनकेनप्रकारेन वेळ, पैसा, शक्ती वाया घालवून आम्ही आमची उत्सवप्रियता भागवत असतो. लग्नाचा थाटमाटही काही वेगळा नसतो आणि त्यावर पुन्हा लिहून वेळेचा अपव्ययच होईल.
अनेक अनावश्यक गोष्टींवर केवळ हौसमौजेखातर पैसा, वेळ खर्च केला
जातो.
उत्सवप्रियता ही जागरूक, संवेदनशील, उत्साही मनोवृत्तीचे प्रतीक असली तरी सध्या आपल्या देशात उत्सवप्रियतेला जे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यातून डोकावतो तो निव्वळ बाजारू थिल्लरपणा. हाताला आणि डोक्याला काम नसलेल्यांनी या उत्सवाचे स्तोम माजवून ठेवले आहे. काळपुरूष काय सांगतो आहे, त्याकडे कोणाचे लक्ष नाही. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. वेळ, पैसा आणि शक्तीची ही उधळपट्टी आपल्याला खचितच परवडणारी नाही. लढाई अस्तित्वाची आहे आणि प्रत्येकाला ती संपूर्ण ताकदीने लढायची आहे. प्रत्येकाने हे भान जपायला हवे. रात्र-रात्रभर चालणारे दांडिया, रास-गरबा पाहिले की, मन कासाविस होते. विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाचे नागरिक आणि विशेषत: युवा पिढी इतकी बिनधास्त कशी असू शकते? या देशाचे अस्तित्व नामशेष करायला हजारो शक्ती टपून बसल्या आहेत. विकासाची शर्यत अतिशय जीवघेणी झाली आहे. ‘मागे राहिला तो संपला’ अशी परिस्थिती आहे आणि आम्ही मात्र उत्सवाच्या नव्या नव्या संधी शोधतो आहोत. कालबाह्य रूढी-परंपरांना नव्याने उजाळा देत आहोत. भविष्यातील संकटांची कुणाला जाणीवच नाही. प्राप्त परिस्थितीत काय योग्य आणि काय अयोग्य, याचा सारासार विचार करताना कोण
च दिसत नाही.
गौरी; गणपती झाले की नवरात्र, त्यानंतर दसरा-दिवाळी-31 डिसेंबर-होळी-शिमगा, उत्सवांची मालिकाच लागून गेली आहे. हे कमी की काय आता नवीनच निघालेले ‘ते’ दळभद्री ‘डेज’ आहेतच साजरे करायला. कुणासाठी साजरे करतो आहोत हे उत्सव, काय साध्य होत आहे त्यातून? हे सगळे सण आणि ‘डेज’ उत्सवाच्या स्वरूपात साजरे करण्याइतकी सुबत्ता, तेवढी शांतता आपल्या देशात आहे का? देशासमोरचे सगळेच प्रश्न संपले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर जोपर्यंत अशी सुबत्ता, अशी समृद्धी या देशात निर्माण होत नाही, जोपर्यंत एक समृद्ध शांतता या देशात नांदत नाही, तोपर्यंत प्रत्येकाचे ध्येय हा देश समृद्ध, बलशाली करणे हेच असायला हवे. वेळ खूप कमी आहे, आव्हानं मात्र खूप मोठी आहेत. सगळ्यांनी मिळून या आव्हानांचा मुकाबला करायचा आहे. एक दिवस तोही येईल, ज्या दिवशी खऱ्या अर्थाने उत्सव साजरा करण्याची परिस्थिती या देशात निर्माण होईल आणि त्याच दिवशी उत्सव महोत्सव ठरतील, परंतु तोपर्यंत प्रत्येकाने एकच ध्यास ठेवावा, ‘बलशाली, समृद्ध’ देश उभा करण्याचा!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply