प्रकाशन दिनांक :- 30/11/2003
एखाद्या गोष्टीचे यथार्थ, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे असेल तर केवळ त्या गोष्टीच्या बाह्यरंग, रूप, आकारावरून कधीच करता यायचे नाही. तसा प्रयत्न केला तर हाती येणारा निष्कर्ष हमखास चुकू शकतो. एखादे साधे बीज असेल तर ते सकस आहे, चांगल्या प्रतीचे आहे, त्याचा वाण उत्तम आहे, हे केवळ ते बी हातात घेऊन सांगता येणार नाही. ते बीज नेमके कसे आहे हे त्या बीपासून तयार होणाऱ्या रोपाच्या गुणावरूनच सांगता येईल. अगदी साधी गोष्ट आहे, आरसा किंवा आपले प्रतिबिंब दाखविणारी कोणतीच वस्तू अस्तित्वात नसती तर आपण कसे दिसतो हे आपल्याला कधीच कळले नसते. चेहरा आपला, सौंदर्य आपले परंतु ते जाणून घ्यायचे असेल तर माध्यम मात्र बाहेरचं लागत असतं. आपलं प्रतिबिंब आरशात उमटत नाही तोपर्यंत आपण किती सुंदर(?) आहोत, हे आपल्याला कळत नाही. एखादा योध्दा खूप शूर असेल तरी जोपर्यंत प्रत्यक्ष रणांगणावर त्याचा पराक्रम निखरत नाही तोपर्यंत त्याचे शौर्य प्रमाणित होऊ शकत नाही. शौर्य हा त्याच्या अंगचा गुण असतो, पण तो सिध्द व्हायला रणांगणाचे बाह्य माध्यम आवश्यक ठरते. एखादा वक्ता कितीही वाकपटू असला तरी समोर श्रोते, माईक व व्यासपीठ असल्याशिवाय त्याला भाषणाची उर्मी येणे कठीणच. हा नियम जवळपास प्रत्येक बाबतीतच लागू होतो. सांगायचे तात्पर्य, आपण जेव्हा एखादा दावा करतो तेव्हा त्या दाव्यातील तथ्य ज्यातून प्रगट होते, अशा घटना किंवा प्रसंगच त्या दाव्याला प्रमाणित करू शकतात. आपण खूप सुंदर आहोत, असा दावा आपण केला तरी आरशात पडणारे प्रतिबिंब काही वेगळेच सांगत असेल तर आपला दावा खोटा ठरतो. ते प्रतिबिंब किंवा तो आरसा कधीच खोटा ठरू शकत नाही.
येत्या वीस वर्षात हा देश एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास
येईल असा दावा सध्या
राजकारणी, विशेषत: सत्ताधारी लोकं करीत आहेत. तिसऱ्या जगातील विकसनशील र
ष्ट्रे तर भारताकडे आदर्श म्हणून पाहत असल्याचेही सांगितले जाते. प्रचंड मनुष्यबळाचा कुशलतेने वापर करून चीनने जशी अल्पावधीतच उत्तुंग झेप घेतली तशीच झेप भारतसुध्दा घेऊ शकेल, हा स्वप्नील आशावाद बाळगला जात आहे. चलन फुगवट्याचा दर स्थिर आहे, परकीय चलनाची गंगाजळी फुगतच आहे, आर्थिक विकासाचा दर वाढतोच आहे, अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत, विदेशात जाणाऱ्या डॉक्टर्स, इंजिनिअर्सची संख्या वाढती आहे. आमच्या देशाच्या या ‘साजिऱ्या – गोजिऱ्या’ रूपाचे कौतुक करण्यात सत्ताधारी मग्न आहेत. खरं म्हणजे यामध्ये सरकारी कर्तृत्वाचा किंवा सहभागाचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. मात्र फुकटचे श्रेय घेऊन ‘कॉलर टाईट’ केली तरी ते कळणारी वा विरोध करणारी बुद्धीजीवी मंडळी आहे तरी किती? उद्या सत्ताधारी बदलले तरी कौतुकाचा हाच पाळणा म्हटल्या जाईल, यात कसलीही शंका नाही. परंतु आपल्या देशाच्या या ‘साजिऱ्या – गोजिऱ्या’ रूपाचे वस्तुस्थितीच्या आरशात पडलेले प्रतिबिंब काय म्हणते? बेंबीच्या देठापासून विकासाच्या आरोळ्या ठोकणाऱ्यांना ठिकठिकाणी विखुरलेल्या भकासाच्या खुणा दिसत नाहीत का? असं कोणतं क्षेत्र आहे की, ज्याकडे बोट दाखवून आपण अभिमानाने म्हणू शकू की, होय आम्ही या क्षेत्रात विकास साधला आहे. समाजातील असा कोणता घटक आहे की, जो पूर्णपणे समाधानी आहे? आज शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक बालकाच्या भविष्यात एका निश्चिंत, समाधानी जीवनाच्या ऐवजी असते अनिश्चित, अंध:कारमय भवितव्य! प्रचंड मेहनत घेऊन पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांच्या डोळ्यात भविष्याची कोणती उज्ज्वल स्वप्ने असतात? असते ती हे शिक्षण आपल्याला दोन वेळेची भाकरी मिळवून देणार की नाही, ही अनामिक भीती! हमखास नोकरीची वा चरितार्थाची शाश्वती नाही. शिक्षणाचे स्वरूपच असे आहे. स्वत:च्या हिंमतीवर एखादा व्यवसाय
उभा करण्याचा आत्मविश्वास आणि कौशल्य त्यातून कधीच मिळणार नाही. परिणामी उच्चशिक्षित बेरोजगारांची एक स्वतंत्र जमातच अस्तित्वात येऊ पाहत आहे. ही ‘स्कॉलर’ युवकांची अवस्था आहे. ज्यांची बुध्दी यथातथा आहे त्यांचे हाल तर कुत्रेही खात नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणून बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीप होत आहे. अंध:कारमय भविष्याच्या काळजीने धास्तावलेले हे युवक कळत – नकळत गुन्हेगारीकडे वळत आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आमची शिक्षण पध्दती गुन्हेगाराला जन्म देणारी आहे. संपूर्णपणे राजकारणाच्या ताब्यात गेलेली शिक्षणपध्दती आधीच नासली होती. उरलीसुरली कसर ही पध्दत राबविणाऱ्यांनी भरून काढली. या असल्या ‘साजऱ्या’ रूपाचे कोण कौतुक करेल?
बेरोजगारांचा तांडा निर्माण करणाऱ्या शिक्षणाची ही अवस्था तर उद्योगाची काही वेगळी नाही. प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची क्षमता सरकारमध्ये नाही आणि एखादी व्यक्ती उद्योग – व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: तसेच इतरांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा विचार करत असेल तर हे विचार कृतीत येण्यापूर्वीच त्यांचा गळा घोटण्याइतके इथले कायदे सक्षम (?) आहेत. एकंदरीत ‘आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना’ अशी परिस्थिती. एखाद्याला आपला स्वतंत्र व्यवसाय, उद्योग उभा करायचा असेल तर सुरूवातीलाच विविध जाचक परवान्यांचा चक्रव्यूह भेदावा लागतो. त्यातून तो सहीसलामत बाहेर पडलाच तर किचकट आणि क्लिष्ट कामगार कायदे त्याचा अवसानघात करायला टपलेलेच असतात. त्यावरही मात करून एखादा जिद्दी उद्योजक उभा राहिलाच तर विविध प्रकारचे कर, सरकारी कृपेने निर्माण झालेली अनैसर्गिक स्पर्धा, पायाभूत सुविधांचा अभाव, व्यवसायासाठी उभाराव्या लागलेल्या भांडवलावरचे अत्याधिक व्याजदर त्याला आडवे केल्याशिवाय राहत नाही. खुल्या अर्थव्यवस्थेने तर परिस्थिती अधिकच गंभीर कर
ून ठेवली आहे. परिणामी नवे उद्योग उभे राहणे तर जवळ-जवळ बंदच झाले आणि जुन्या उद्योगांनीही आपला गाशा गुंडाळायला सुरूवात केली.
सरकारच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल ओतणाऱ्या या उद्योगांनी सरकारी नियम आणि धोरणांना कंटाळून कारखान्यांच्या
जमिनी विकायला सुरूवात केली. कारखान्यांच्या ठिकाणी आता निवासी, व्यापारी संकुले उभी
राहू लागली आहेत. त्यातही सरकारची टांग मध्ये येते. हे असेच चालत राहिले तर भारत कोणत्या शताब्दीत आर्थिक महासत्ता बनेल? आरसा कधीच खोटं बोलत नाही. भकास होत चाललेल्या ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतून दिसणारे विकासाचे प्रतिबिंब आमच्या ‘साजिऱ्या – गोजिऱ्या’ रूपावर पुरेसे प्रकाश टाकणारे आहे.
कोंडी केवळ विद्यार्थी, युवक, उद्योजकांचीच झालेली नाही. समाजातला प्रत्येक घटक, प्रत्येक नागरिक कोंडीत सापडला आहे. शेतकरी तर जणू अन्यायाच्या मूक सोशिकतेचा प्रतीक ठरला आहे. उत्पादन वाढलं – कमी झालं, जागतिक बाजारभाव चढले – कोसळले, पाऊस कमी झाला – जास्त झाला, या कशाचाच शेतकऱ्यांवर परिणाम होत नाही. भाकरी असेल तर चटणीसाठी आणि चटणी असेल तर भाकरीसाठी झुरणे हेच त्यांच्या नशिबी उरले आहे. आमच्या हरितक्रांतीच्या घोषणा केवळ कागदावरच यशस्वी झाल्यात. प्रत्यक्षात समृध्दीची खरी हिरवळ पुढे फुललीच नाही. आज वातावरण इतके कलुषित झाले आहे की, एखाद्याने निरपेक्ष वृत्तीने सेवाकार्य करतो म्हटले तरी त्याच्याकडे संशयाने पाहिले जाते. नि:स्वार्थ बुध्दीने कुणी समाजकारण – राजकारण करू शकतो, यावर विश्वास ठेवायलाच लोकं तयार नाहीत. त्यामुळे एखाद्याची इच्छा असेल तरी तो प्रामाणिक राहू शकत नाही, त्याला प्रामाणिक राहू दिले जात नाही. प्रामाणिक, सचोटीने वागणारा, सरळमार्गी माणूस आज संठाहालयात ठेवण्याइतपत दर्मीळ झाला आहे. भ्रष्टाचाराला पूर्वी पाप समजले जायचे, भ्रष्टाचारी माण
स समाजाच्या निंदेचा विषय ठरायचा. आज परिस्थिती इतकी बदलली आहे की, कोणत्याही पातळीवरचा भ्रष्टाचार न करता एखादा माणूस जगूच शकत नाही. पूर्वीचा अपवाद आज नियम झाला आहे.
समाजातली ही ढासळती नीतिमत्ता, रसातळाला चाललेली जीवनमूल्ये कशाचे प्रतीक आहेत? वास्तवतेच्या आरशातून प्रतिबिंबित होणारे आपले खरे स्वरूप खरेच ‘साजिरे – गोजिरे’ आहे का? आपल्याला आपला देश महान करायचा आहे. स्पर्धेच्या, अस्तित्वाच्या जीवघेण्या लढाईत आपले आव्हान टिकवायचे आहे. एक सशक्त – समृध्द भारत उभा करायचा आहे आणि मनापासून आपल्याला हे करायचे असेल तर अगदी शेवटच्या स्तरापासून आपल्याला ही संपूर्ण व्यवस्थाच घुसळूण काढावी लागेल.
आज प्रत्येकाची कोंडी झालेली आहे. भ्रष्टाचार, अनैतिकता, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाढलेले प्राबल्य आदींमुळे प्रत्येक क्षेत्रातील संपूर्ण वातावरणच प्रदुषित झाले आहे. मुक्त, मोकळ्या हवेत श्वास घेणे दुरापास्त झाले आहे. ही परिस्थिती आहे तशीच कायम राहिली तर हा देश लवकरच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply