शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विषण्ण झालेल्या आर. आर. पाटलांनी या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार गृहरक्षक दलाची मदत घेण्याच्या विचारात असल्याचे विधान नुकतेच केले. आबा खरेच तसा विचार करत असतील तर ते निश्चितच एक स्वागतार्ह पाऊल म्हटले पाहिजे. समाजातील अंतर्गत वादांवर किंवा समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच गृहरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. ही मूळ कल्पना होती मोरारजी देसाई यांची! पोलिस ही व्यवस्था ब्रिटिशांनी निर्माण केली होती. पोलिसदलाच्या स्थापनेमागे ब्रिटिश साम्राज्याला विरोध करणाऱ्या शक्तींचा बिमोड करणे हाच एक उद्देश होता. थोडक्यात पोलिस ही साम्राज्याचे किंवा राजाचे हित जपणारी व्यवस्था होती. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी स्थापन केलेली ही गुलामगिरीला पोषक व्यवस्था विसर्जित व्हायला हवी होती, परंतु तसे झाले नाही. मोरारजी देसाईंनी पोलिस दलाला पर्यायी ठरू शकेल अशा गृहरक्षक दलाची संकल्पना मांडली. अपेक्षा ही होती की फौजदारी स्वरूपाच्या तक्रारीच केवळ पोलिस विभागातर्फे हाताळल्या जातील आणि इतर तक्रारींचे निवारण गृहरक्षक दलामार्फत होईल. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शस्त्रधारी पोलिसांऐवजी ज्यांचा समाजात नैतिक धाक आहे, अशा गृहरक्षकांवर सोपविण्याची कल्पना पुढे आली. बरेचदा तणावठास्त परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शस्त्राच्या धाकापेक्षा नैतिक धाकच अधिक उपयुक्त ठरत असतो. शेवटी आपण सगळे एकाच देशाचे नागरिक आहोत, पोलिसांना आपल्याच देश बांधवांसोबत लढायचे नसते. त्यांच्या हातातील शस्त्रे आपल्याच लोकांवर वापरण्याची वेळ येऊ नये, ही अपेक्षा बाळगुनच गृहरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या नैतिक धाकाचा किंवा त्यांच्या प्रतिष्ठेचा वा त्यांच्या सामाजिक कार्यकर्ते म्हणून असलेल्या प्रति
ेचा वापर करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याची ही कल्पना निश्चितच स्वागतार्ह म्हणावी लागेल. अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास, ज्याप्रमाणे घरातील कर्ता पुरुष घरी येताच घरातील सगळी भांडणे वा कुरबुरी शांत होतात त्याचप्रमाणे समाजातील कर्त्या व्यत्त*ींच्या धाकाने समाजातील
भांडणे, वादविवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न
गृहरक्षक दलाच्या माध्यमातून व्हावा, हाच एक प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन गृहरक्षक दलाची कमान समाजातील सभ्य, सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित लोकांकडे सोपविण्यात आली. गृहरक्षक दलाची ही आदर्श कल्पना प्रत्यक्षात केवळ आदर्शवतच का राहिली, यामागे अनेक कारणे आहेत. त्या कारणांची चर्चा अप्रस्तुत ठरू नये, परंतु ही चर्चा करण्यापूर्वी आर.आर.पाटलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी गृहरक्षक दलाची मदत घेण्याचा जो विचार बोलून दाखविला, त्यावर चर्चा करणे अधिक उपयुक्त ठरेल. गृहरक्षक दलातील शिपाई हा करड्या लष्करी शिस्तीत वाढलेला आणि केवळ लढण्याचे प्रशिक्षण घेतलेला जवान नसतो. त्याने लढण्यापेक्षा समजून घेण्याचे, समजावून सांगण्याचे कसब अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात केलेले असते किंवा त्याच्याकडून तशीच अपेक्षा ठेवणे हेच गृहित धरायला हवे. समाजातील लोकांच्या मानसिकतेचा त्याला चांगला अभ्यास असतो. त्याचा हा अभ्यास आणि समाजाकडे मानवीय दृष्टिकोनातून पाहण्याच्या त्याच्या या वृत्तीचा वेगळ्या संदर्भात वापर करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा उद्देश चांगलाच आहे. आत्महत्या करणारा शेतकरी हा परिस्थितीने पार खचलेला असतो. चारही बाजूने कोंडी झाल्यामुळे दुसऱ्या कुठल्याच पर्यायाचा विचार त्याच्या डोक्यात येत नाही. अशावेळी त्याला खरी गरज असते ती मानसिक आधाराची . हा आधार किंवा जिद्दीने पुन्हा उठून उभे राहण्याची प्रेरणा देण्याचे काम गृहरक्
षक दलाकडून आर. आर. पाटलांना अपेक्षित असेल तर त्यात वावगे काहीच नाही. आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. कदाचित ती स्वत:पुरती सुटका ठरेलही, परंतु ज्यांच्यासाठी आपण जगतो, ज्यांच्या काळजीने हवालदिल होऊन आपण मरण्याचा विचार करतो त्यांच्या जीवनात आपल्या आत्महत्येने केवळ दु:खच पेरल्या जातील, हा विचार शेतकऱ्यांच्या मनात बिंबविणे अधिक महत्त्वाचे आहे आणि हे काम गृहरक्षक दलाची माणसं (मी मुद्दाम जवान किंवा शिपाई हा शब्द वापरला नाही.) अधिक चंागल्या प्रकारे करू शकतील. आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेणारा तो एक क्षण टाळता आला तर त्याच शेतकऱ्याचे भावी आयुष्य अधिक सुखकर करता येईल. हा क्षण टाळण्यासाठी त्या शेतकऱ्याला प्रेमाची, आपुलकीची, आधाराची गरज असते. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा’, असे म्हणणाऱ्या बालकवींची क्षमा मागून म्हणावेसे वाटते की, ‘क्षण तो टळे मरणाचा, वर्षाव होता प्रेमाचा’. हा वर्षाव करण्याचे काम आर.आर. पाटलांच्या अपेक्षेनुसार गृहरक्षक दल करू शकेल, परंतु या दलाची सद्यस्थिती किती भयंकर आहे याचा आधी विचार व्हायला हवा. गृहरक्षक दलात लोक स्वेच्छेने आपली सेवा देतात. त्यांना तुटपुंज्या दैनिक भत्त्यावर मानहानी सहन करित पोलिसांच्या अंतर्गत काम करावे लागते. वेतन, निवृत्ती वेतन वगैरेंचे संरक्षण त्यांना नसते. केवळ सामाजिक बांधीलकीचे भान ठेऊन समाजातील प्रतिष्ठित किंवा ज्यांना कोणत्या न् कोणत्या प्रकारे समाजाची सेवा करायची आहे, असे लोक गृहरक्षक दलात सामील होत असतात. त्यांच्या समर्पित भावनेचा फारसा विचार करताना कुणी दिसत नाही. बरेचदा त्यांना पोलिसांच्या हाताखाली काम करावे लागते. नियमित वेतन, भत्ते घेणाऱ्या पोलिसांकडून या सेवापती ‘होमगार्ड’ला अपमानास्पद वागणूक मिळते. त्यांच्या निरपेक्ष सेवाभावाची किंमत आमचे सरकार त
यांना 24 तासाकरिता भोजन, पाणी, चहा वगैरे काहीही न देता केवळ 90 रुपये दैनिक मजुरी देऊन चुकविते. प्रश्न पैशाचा नाही तर त्यांच्या सन्मानाची योग्य काळजी घेतली जात नाही, हा आहे. अशा परिस्थितीत गृहरक्षक दलात काम करण्यास समाजातील सेवाभावी तरुण पुढे येतील तरी कसे? आणि आले तरी त्यांच्यात आपण ‘सेकंड फिडेल’ असल्याची कमीपणाची भावना निर्माण होणारच नाही, याची काय खात्री देता येईल? त्यामुळे गृहरक्षक दलाकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी आबांनी आधी त्यांचा सन्मान कसा ठेवला जाईल तसेच गरज असेल त्यांची आर्थिक आणि इतर परिस्थिती सुधारण्याची काळजी करावी. त्यांना योग्य सन्मान, योग्य अधिकार कसे मिळतील सन्मानाची
वागणूक कशी मिळेल याची तजविज करावी. आबा प्रयोगशील आहेत. त्यांच्या
डोक्यात बऱ्याच चांगल्या कल्पना आहेत. फक्त गरज आहे ती त्यांनी या कल्पनांना मूर्त स्वरूप बहाल करण्याची. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी गृहरक्षक दलाची मदत घेण्याची त्यांची कल्पना निश्चितच अभिनव आहे. मात्र आत्महत्या करणारा शेतकरी त्यांनी कसा शोधावा हेही नेमके त्यांनी सांगावे. आज गृहरक्षक दलाचा उपयोग गणपती, देवीच्या विसर्जन मिरवणुकीपुरता किंवा फार फार तर निवडणूक काळात बंदोबस्ताकरिता होताना दिसतो आणि त्यांना केवळ ‘वापरून’ घेणे ह्या वृत्तीने गलेलठ्ठ पगार घेऊन काम करणारे पोलिस दलातील नोकरशहा हुकूम देतात की, ही बाबच मुळात गंभीर आहे. नोकर पोलिस आहेत तर गृहरक्षक दल हे समाजसेवी लोक आहे त्यामुळे गृहरक्षक दल पोलिसांच्या अधिनस्त राहून काम करणार नाही तर पोलिस दल गृहरक्षक दलाच्या अधिनस्त राहून काम करेल. गृहरक्षक काही कुणाचा नोकर नसतो तर तो एक स्वयंसेवक असतो, किंबहुना अशाच लोकांची नोंद त्या यादीत असावी. पोटाथर्निी गृहरक्षक दलात नव्हे तर राखीव पोलिसात स्वत:ची भरती करून घ्यावी; हेच योग्य. वास
्तविक या दलाची उपयुक्तता फार मोठी आहे, पण त्या दिशेने कुणी विचार करताना दिसत नाही. आता आबांनी एका नव्या प्रयोगाचा विचार पुढे मांडला आहेच तर या अनुषंगाने गृहरक्षक दलाचे पुनर्गठन व्हायला हरकत नाही. त्यांच्या मानधनासोबतच त्यांच्या अधिकारातही वाढ व्हायला हवी. त्यामुळे पोलिस दलावरील ताण तर कमी होईलच शिवाय समाजातील प्रतिष्ठितांचा, मान्यवरांचा समाजसेवेतील सहभागदेखील वाढेल. आज समाजातील चांगले लोक समाजाच्या दृष्टीने निष्क्रिय किंवा उदासीन असल्याचे दिसून येते. त्यांची ही निष्क्रियता किंवा उदासीनता समाजाचे नुकसानच करत आहे. गृहरक्षक दलाच्या पुनर्बांधणीतून कदाचित एक नवे क्षेत्र किंवा उमेद ह्या लोकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. आबांनी त्यादृष्टीने विचार करावा.या माध्यमातून समाजातील सुष्ट शक्तींना चालना मिळाली तर समाजाची घसरत चाललेली नैतिक पातळीदेखील उंचावण्यास हातभार लागू शकेल.त्यातूनच कदाचित एक दिवस असाही उगवेल की ब्रिटिशांची देण असलेल्या पोलिस यंत्रणेची उपयुक्तताच संपलेली असेल! मात्र तो धोका ओळखून पोलिस दलामार्फत स्वत:ची पोळी भाजून घेणारे स्वार्थी लोक झारीतील शुक्राचार्याची भूमिका नक्कीच बजावण्याचा प्रयत्न करतील; त्यांना दूर कसे ठेवावे हाच खरा कळीचा मुद्दा आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply