नवीन लेखन...

गॅगरीन !




जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वरुणराजाने अख्ख्या महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. या विक्रमी पावसाने मुंबई आणि कोकणाची पार वाताहत केली. विदर्भातील काही भागालाही मोठा फटका बसला. त्या आधीच्या दोनतीन वर्षांत महाराष्ट्रातील पर्जन्यमान अगदीच सरासरी होते. काही भागात तर सरासरीपेक्षाही खूप कमी पाऊस पडला. या पृष्ठभूमीवर मान्सूनची यंदाची अतिरेकी सक्रियता निश्चितच चिंतेचे कारण बनली आहे. पाऊस चांगला वा चांगल्यापेक्षाही अधिक झाला, ही समाधानाची बाब असली तरी या पावसाकडे जरा वेगळ््या दृठिकोनातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. पाऊस अजिबात न येणे किंवा अपेक्षेपेक्षा, सरासरीपेक्षा खूप जास्त येणे या दोन्ही गोष्टी कुठेतरी नैसर्गिक संतुलन बिघडत असल्याच्या निदर्शक आहेत. आधीच्या दोनतीन वर्षांत पावसाचे प्रमाण खूप कमी होते आणि यावर्षी जुलैतच बहुतेक भागात सरासरीपेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला. निसर्गाच्या या लहरीपणाच्या कारणांचा वेळीच वेध घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात आपल्या नशिबी कायमचा दुष्काळ लिहिल्या जाईल. हा दुष्काळ एकतर कोरडा असेल किंवा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला ओला दुष्काळ असेल. या संदर्भात ‘नेचर’ या मासिकाने आपल्या ऑगस्टच्या अंकात भारतासोबतच संपूर्ण जगाला गंभीर इशारा दिला आहे. निसर्गाच्या या लहरीपणाच्या मुळाशी जगभरात वाढत चाललेले प्रदूषण असल्याचा निष्कर्ष ‘पोस्टडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च’च्या संशोधन प्रमुख क्रिस्टिन झिकफिल्ड आणि त्यांच्या चमूने काढला आहे. हवामानातील या अनाकलनीय बदलाला वातावरणातील वाढत चाललेले कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे या संशोधन चमूचे म्हणणे आहे. कार्बनडाय ऑक्साइडच्या वाढत्या प्रमाणामुळेच भारतातील मान्सून लहरी बनत चालला आहे.

त्यामुळेच कधी अवर्षण तर कधी प्रचंड वृष्टी असा प्रकार होत आहे. भारतासारख्या प्रामुख्याने शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या देशाला मान्सूनचा हा लहरीपणा खचितच परवडणारा नाही. सिंचनाच्या कितीही सुविधा उपलब्ध केल्यातरी आजही भारतातील 80

टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे

ही वस्तुस्थितीच मान्सूनचे महत्त्व अधोरेखित करते. अवर्षण किंवा अतिवृष्टी या दोन्ही प्रकारांचा पहिला फटका शेतीलाच बसतो. अर्थात या प्रकोपासाठी निसर्गाला जबाबदार धरता येणार नाही. नैसर्गिक चक्र अगदी नियमानुसार काम करीत असते. जोपर्यंत या चक्रात ढवळाढवळ होत नाही तोपर्यंत निसर्गाचा तोलसुद्धा कायम असतो; परंतु प्रगतीच्या विकृत हव्यासाने मानवाने थेट निसर्गालाच आव्हान द्यायला सुरुवात केली. सुखाच्या, समृद्धीच्या भौतिक कल्पनांनी वेडे झालेल्या माणसाने निसर्गाला वेडे करून टाकले. पाऊस कधी वेड्यासारखा कोसळू लागला तर कधी संन्यासासारखा अतिविरक्तपणे वागू लागला तो माणसाच्या कर्तृत्वामुळेच! नैसर्गिक चक्रानुसार साधारणपणे जमिनीचे आणि समुद्राचे तापमान पावसाला नियंत्रित करीत असते. सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीचे तापमान वाढते त्या तुलनेत समुद्राचे तापमान वाढत नाही. त्यामुळे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन समुद्रावरील वारे जमिनीकडे वाहतात. हे वारे आपल्यासोबत ढग घेऊन येतात आणि त्या ढगांमुळेच पाऊस पडतो. जमिनीचे तापमान हा यामधील सगळ््यात महत्त्वाचा घटक. अलीकडील काळात औद्योगिकीकरण, वाहनांची वाढती संख्या यामुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या कार्बनडाय ऑक्साइडमुळे सूर्याच्या उष्णतेने जमीन गरम होण्याच्या नैसर्गिक क्रियेवर परिणाम झाला. शिवाय वातावरणातील उष्णता शोषून जमीन उबदार ठेवणाऱ्या वृक्षांची अपरिमित कत्तल झाली. हवेचे वाढते प्रदूषण
आणि त्यातच वृक्षांची लांडगेतोड या दोन्ही कारणाने जमीन तप्त होणे आणि समुद्रावरील वारे जमिनीकडे वाहू लागणे या नैसर्गिक क्रमावर परिणाम झाला. त्यामुळेच मान्सूनचा अनियमितपणा वाढू लागला. सांगायचे तात्पर्य, आपण ज्याला नैसर्गिक प्रकोप म्हणतो तो मुळात निसर्गाचा प्रकोप नसून माणसाच्या अत्याधिक लालसेचा दुष्ट परिणाम आहे. फुगत चाललेली लोकसंख्या शहरांमध्ये एकवटत आहे. शहरांच्या विस्ताराला असलेली मर्यादा कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. औद्योगिकीकरण वाढतच आहे. पाश्चिमात्य जीवनशैलीच्या अंधानुकरणामुळे मानवाची निसर्गाशी जुळलेली नाळ हळूहळू तुटत आहे. समृद्धीच्या बदलत्या व्याख्या आत्मघातकी ठरू पाहत आहेत. त्याचवेळी कृषी उत्पादनातील ऋण विक्रम (ऱ्ाुर्ीूग्न झ्ीद्ल्म्ूग्दह) वाढत आहे. पाण्याचा भरमसाट गैरवापर होत आहे. निसर्गत: पर्जन्यरूपाने मिळणारे पाणी आणि अतिरिक्त उत्पादनाच्या हव्यासापोटी पाण्याचा होत असलेला प्रचंड उपसा यामधील तफावत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे. दुर्दैवाने या अत्यंत महत्त्वाच्या समस्येकडे राज्यकर्त्यांनी कधीही गांभीर्याने पाहिलेले नाही. पाण्याचेही त्यांनी राजकारणच केले. अतिरिक्त संपत्तीची लालसा आणि त्या अनुषंगाने वाढत जाणारा उत्पादनाचा हव्यास याचा परिणाम जमिनीच्या उत्पादनक्षमतेवर होत आहे. भारतासारख्या कृषी आधारित देशामध्ये ही बाब अतिशय गंभीर ठरते. भारत हा कृषिप्रधान देश असल्याचे नेहमीच म्हटले जाते; परंतु शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या पाणी या महत्त्वाच्या घटकाकडे सातत्याने दुलर्क्ष झाले किंवा पाणी नियोजनाचे धोरण अगदीच चुकीच्या दिशेने राबविले गेले, असेच म्हणावे लागेल. सिंचनाच्या सोयीसाठी देशभर शेकडोनी धरणे बांधण्यात आली. त्यांपैकी निम्मी धरणे एकट्या महार
ष्ट्रात आहेत; परंतु महाराष्ट्रातील एकही धरण लक्ष्यपूर्तीच्या दिशेने 100 टक्के यशस्वी ठरले, असे म्हणता येणार नाही. आजही महाराष्ट्रातील 85 टक्के शेती मोसमी पावसावरच अवलंबून आहे आणि मानवाच्याच लालसी वृत्तीमुळे हा मोसमी पाऊस दिवसेंदिवस लहरी बनत चालला आहे. राष्ट्रपतींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पावसाच्या या लहरीपणावर मात करण्यासाठी नद्याजोडणी प्रकल्प राबविण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. ओल्या आणि कोरड्या दुष्काळाची तीपता कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प प्रभावी ठरू शकत असला तरी त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत प्रचंड अडचणी आहेत. अशा परिस्थितीत बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी एकतर आपल्याला बदलावे लागेल किंवा विकासाच्या आपल्या कल्पना बदलाव्या लागतील. विकासाच्या कल्पना बदलण्याइतकी सुजाणता आपल्या नेत्यांमध्ये नाही. आजही आपले पंतप्रधान शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याचेच आवाहन करीत आहेत. उत्पादन वाढविण्याच्या या हरितक्रांती स्वप्नानेच भारतातील शेतकरी आणि शेती नष्ट होऊ

पाहत आहे. मात्र, तरीसुद्धा आमच्या विकासाच्या कल्पना त्याच कायम आहेत. स्वत:ला

बदलायचे म्हणजे निसर्गाच्या लहरीपणाशी जुळवून घ्यायचे. आपल्या जीवनशैलीतच आमूलाग्र बदल करायचे. आपणांस खाऱ्या पाण्याशी जुळवून घ्यावे लागेल, त्यावर आधारित जनजीवन विकसित करावे लागेल, कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल करून अगदी थोड्या पाण्यात येणाऱ्या पिकांचा विचार करावा लागेल, ताण सहन करणारी कृषी पद्धती विकसित करावी लागेल. पाण्याचे जीवनाशी असलेले महत्त्व आपण लक्षात घेतले नाही तर भविष्यात आपल्याला इतरही अनेक तडजोडी कराव्या लागतील. पाण्याची समाजाशी कधीकाळी असलेली बांधीलकी संपुष्टात आली आहे. मुंबई याचे एक उत्तम उदाहरण ठरू शकते. मुंबईजवळ स्वत:च्या पाण्याचा एक थेंबही नसताना
शेकडो किलोमीटरवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मुंबईवासीय आरामदायी शहरी जीवन जगत आहेत. त्यांना या योजनेवर होणाऱ्या भरमसाट खर्चाची खंत नाही किंवा पाण्याच्या गैरवापराबद्दल खेद नाही. जेमतेम 30 ते 40 लाख लोकसंख्या सामावून घेण्याची मूळ क्षमता असलेल्या मुंबईत आज सव्वाकोटी लोकं राहत आहेत. यंत्रणेवर ताण किती द्यायचा आणि निसर्गाला ताणायचे तरी किती? या पृष्ठभूमीवर जलसाक्षरतेच्या दृष्टीने जनतेला प्रबोधन करणे हा एक उपाय ठरू शकतो; परंतु विद्यमान राज्यव्यवस्थेत अशा प्रकारच्या उपक्रमांची फलनिष्पत्ती शून्य ठरते. सामान्य जनता, प्रशासन आणि सरकार या तिन्ही घटकांत कुठलाच ताळमेळ नाही. कायदा करूनही परिस्थितीत बदल संभवू शकत नाही. नळाला पाणी आले नाही की, पाइपलाइन फोडणाऱ्या लोकांना शिस्त कोण लावणार? लोकांच्या सवयी बिघडलेल्या आहेत. स्वत:च्या अंगणातला कचरा शेजारच्या अंगणात ढकलून स्वच्छतेवर प्रवचन झोडणाऱ्या लोकांची भारतात कमतरता नाही. आपली देशाप्रति, समाजाप्रति काही बांधीलकी आहे याचे भानच लोकांना नाही. कायदा वेशीवर कसा टांगायचा हे लोकांना चांगले कळते. प्रशासकीय अधिकारीही आपल्या कर्तव्यापेक्षा हक्कांच्या बाबतीतच अधिक जागरूक असतात. राज्यकर्त्यांकडे दूरदृष्टी तर नाहीच, शिवाय प्रशासनावर त्यांचा कुठलाही अंकुश नाही. एकंदर संपूर्ण व्यवस्थाच सडली आहे. ज्या लोकांना आपले भांडे भरल्यावर नळाची तोटी बंद करावी, स्टेशनवर गाडी उभी असताना शौचालयाचा वापर करू नये, उरलेले अन्नपदार्थ भरून प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्यावर फेकू नये, एवढेही कळत नाही त्या लोकांना प्रदूषणामुळे आपण संकटात पडू शकतो, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो, इतके मोठे विचार कसे आणि कधी पचनी पडावेत? लोक बेशिस्त आहेत आणि त्यांना शिस्त लावणारी व्यवस्था त्यापेक्षा अधिक बेशिस्त आहे. बेशिस
तीची ही जखम आता गँगरीनमध्ये परावर्तित होत आहे. हे गँगरीन एखाद्या दिवशी सगळ््या मानव समाजाचाच बळी घेऊन जाईल. मोसमी पावसाच्या लहरीपणातून निसर्गाने त्याची सूचना आपल्याला दिलेलीच आहे. निसर्गाकडे स्मरणपत्रे पाठविण्याची व्यवस्था आहे की नाही, हे माहीत नाही किवा निसर्गाने दिलेल्या इशाऱ्याची भाषा आम्हांला कळायची व्यवस्था आहे की नाही, हेदेखील माहीत नाही. अशी व्यवस्था नसेल तर पुढच्या वेळी एकतर संपूर्ण देश बुडविणारी महावृष्टी तरी होईल किंवा गवताचे पातेही उगवू न देणारा भयानक कोरडा दुष्काळ पडेल. यावर्षीची महावृष्टी निसर्गाचे शेवटचे स्मरणपत्र आणि इशारा आहे, हे लक्षात घेऊन आम्ही स्वत:ला शिस्त लावली नाही तर बेशिस्तीचे हे गँगरीन आपला जीव घेऊन जाईल, हे मात्र निश्चित!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..