प्रकाशन दिनांक :- 25/01/2004
देशात सर्वत्र सध्या ‘फिल गुड’ चा बोलबाला आहे. एका मागोमाग एक घोषणांचा सपाटा लावीत सरकार प्रत्येकाला खूष करण्याच्या प्रयत्नात दिसते. तसेही निवडणुकीचे वर्ष असले की, सर्वसामान्य जनता खूष असतेच. सत्ता कायम राहावी, यासाठी सरकार पक्ष इमानदारीने प्रयत्नाला लागतो तो याच शेवटच्या वर्षात. शासकीय तिजोरीची कवाडं उघडतात, नव्या नव्या योजनांचा वर्षाव होतो, आश्वासनांची खैरात होते, ‘फिल गुड’ चा आकर्षक भुलभुलैय्या निर्माण केला जातो आणि नेहमीच्या सवयीने जनता या मोहमयी जादूला बळी पडलीच तर पुढच्या पाच वर्षांची सहज तरतूद होते. मग हळूहळू आपण ज्या ‘फिल गुड’ ला बळी पडलो, प्रत्यक्षात ते ‘नथिंग गुड’ होते हे जनतेच्या लक्षात येऊ लागते, परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो.
वास्तविक ‘फिल गुड’ ची भावना निश्चितच आकर्षक आहे. जनतेच्या मनात आत्मविश्वास जागविणारी, सुरक्षिततेची (विशेषत: आर्थिक बाबतीत) भावना निर्माण करणारी आहे. परंतु सरकारतर्फे सध्या समाजातील विविध घटकांसाठी नव्या नव्या योजनांची घोषणा करून जो ‘फिल गुड’ ची भावना जागविण्याचा प्रयत्न सुरू आहे तो खूपच तकलादू, वरवरचा आहे. घातल्या पाण्याने गंगा वाहविण्याचा हा प्रकार वाटतो. खऱ्या अर्थाने ‘फिल गुड’ ची भावना जनतेत निर्माण व्हावी, असे सरकारला वाटत असेल तर काही मूलभूत गोष्टीकडे सध्या जे अक्षम्य दुलर्क्ष होत आहे त्याची तातडीने दखल घेणे भाग आहे. आकर्षक परंतु पाया नसलेल्या घोषणांना सामान्य जनता बळी पडू शकते, त्यातून सरकार पक्षाचा स्वार्थही साधला जाऊ शकतो, परंतु अंतिमत: ते देशहिताचे कधीच ठरणार नाही. कोणतीही योजना आखताना, घोषणा करताना दीर्घकालीन विचार क्रमप्राप्त ठरतो. चार-सहा महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकींना सामोरे ठेवून केलेल्या घोषणांचे आयुष्यही तेवढेच ठरत असते. सरकारला खरोखरच देशाच्या विका
साची कळकळ असेल तर असल्या सवंग घोषणा
करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला पूरक ठरतील
असे निर्णय घेऊन ते कठोरपणे राबविण्याची तयारी सरकारने दाखवायला पाहिजे,परंतु त्यासाठी सत्तेचे राजकारण करण्यापेक्षा देशहिताचे राजकारण करण्याची तयारी राजकीय पक्षांनी दाखविणे गरजेचे आहे. दुर्दैवाने पूर्वी आणि आताही आपल्या देशातले राजकारण सत्तेभोवतीच फिरत आहे. या सत्ताकेंद्रित राजकारणाने बरेचदा सरकारचे निर्णय वरवर आकर्षक परंतु मूलत: विकासाला मारकच ठरत आले आहे. अशा अनेक निर्णयामुळेच आज देशाची अवस्था बिकट झाली आहे.
सर्वाधिक खेदाची बाब ही आहे की, आपल्या धोरणांना, विकासाच्या कल्पनांना एक निश्चित दिशा कधीच नव्हती. अगदी नेहरूजींपासून तर थेट वाजपेयींपर्यंत अशीच गोंधळलेली स्थिती राहिली आहे. एकाचवेळी अनेक दिशांनी प्रयत्न करायचे आणि परिणामस्वरूप कोणत्याच प्रयत्नांना यश मिळायचे नाही, असेच आतापर्यंत होत आले. आमच्या पंचवार्षिक योजनांचे मातेरे झाले ते याचमुळे. हरितक्रांती फसली तीदेखील याचमुळे आणि औद्योगिक क्रांती तर स्वप्नातच जन्माला आली आणि स्वप्नातच मेली. दुसऱ्यांच्या डोळ्यांनी स्वप्न पाहण्याची किंमत आम्ही चुकविली. आम्ही युरोपचा विकास पाहिला आणि त्यांच्या मार्गाने जाऊ लागलो. आम्ही अमेरिकेला श्रीमंत होताना पाहिले आणि भांडवलशाहीची कास धरली. रशिया, चीननेही आम्हाला भुरळ घातली आणि आम्ही साम्यवादाचीही स्वप्ने पाहून घेतली. इतक्या सगळ्या मार्गांनी एकाचवेळी जाण्याच्या प्रयत्नात आम्ही पोहोचलो मात्र कुठेच नाही. त्यापेक्षा आम्ही आमच्या हातांची क्षमता, आमच्या पायातले बळ, आमची उपलब्ध साधन संपत्ती, नैसर्गिक उपलब्धता लक्षात घेऊन स्वत:चा मार्ग निवडला असता तर आज चित्र काही वेगळे दिसले असते. चूक नेमकी तिथेच झाली. आम्ही घोड्यावर बसून विमानातून उ
ण्याची स्वप्न पाहिली. इथल्या संसाधनाचा, पर्यावरणाचा, मनुष्यबळाचा, बौद्धिक संपदेचा विचार करून विकास योजना आखल्या गेल्या असत्या तर आज आपणही विकसित देशाच्या पंक्तीत विराजमान झालो असतो, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. या संदर्भात लोकसंख्या नियंत्रणाचे आपले धोरण पुरेसे बोलके ठरावे. लोकसंख्यावाढ देशाच्या विकासाला घातक आहे हे आपल्या नेत्यांना विविध माध्यमाद्वारे पटवून देण्यात काही कथित पुढारलेले देश यशस्वी ठरले आणि आम्ही लोकसंख्या नियंत्रणाची जोरदार मोहीम राबविली. 75 ते 85 च्या दशकात सरकारच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाने तर अक्षरश: हैदोस घातला होता. वास्तविक मनुष्यबळ हे कधीही विकासातला अडसर ठरू शकत नाही. चीनने ते सिद्धच करून दाखविले आहे. काम करणाऱ्या हातांची संख्या जितकी अधिक तितके ते चांगलेच आहे. पूर्वी शेतकऱ्यांची मुले आपल्या शेतातच कष्ट करायचे. कष्ट करणारी, देखरेख करणारी घरचीच माणसं असल्यामुळे मजूर मिळविण्याची समस्या नसायची, बटाईने वगैरे देण्याचा प्रकार नसायचा. आज ‘हम दो हमारे दो’ च्या जमान्यात पारंपरिक व्यवसाय-धंद्यात लक्ष घालायला कोणी मिळत नाही. शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. व्यावसायिक-उद्योजकांना देखरेख करणारी विश्वासार्ह माणसं मिळत नाही. पूर्वी मुकादम असायचे. त्यांचे काम केवळ मुका दम भरण्याचे, देखरेख करण्याचे होते. दिवाणजी होते. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे व्यवसाय-उद्योग सांभाळणारी घरचीच माणसं भरपूर असायची. आज माणसं शोधावी लागतात. लायक-विश्वासार्ह माणसं मिळत नाहीत. कष्टाने उभारलेला व्याप सांभाळणारे कुणीच नसल्याने अनेकांना आपले व्यवसाय-उद्योग आवरते घ्यावे लागत आहेत. कधी कधी तर नाईलाजाने गुंडाळावे लागत आहेत. लोकसंख्यावाढ हाच विकासातला एकमेव अडसर होता तर आज लोकसंख्या नियंत्रणात आल्यावर विकास व्हायला हरकत नव्हती, परंतु च
त्र उलटेच दिसत आहे. ज्याकाळी लोकसंख्यावाढ ही कथित समस्या होती त्याकाळी इथला शेती व्यवसाय आणि उद्योगधंदे व्यवस्थित होते. आज अपुऱ्या मनुष्यबळामुळे शेती आणि उद्योग ही दोन्ही क्षेत्रे मोडकळीस आलेली दिसतात. भारतातले मनुष्यबळ हेच भारताचे खरे शक्तिस्थळ आहे, हे लक्षात आल्याने भारताला संपविण्याचा घाट घालणाऱ्या शक्तींनीच लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा उभा केला. दुर्दैवाने आम्ही या लोकांच्या भ्रामक प्रचाराला बळी पडलो.
केवळ खाणारी तोंडे वाढत असतील तरच लोकसंख्या वाढ विकासाला
घातक ठरू शकते, परंतु खाणाऱ्या एका तोंडासोबत काम करणारे दोन हात वाढत
असतील तर लोकसंख्या वाढ इष्टापत्तीच ठरते. तशी ती चीनमध्ये ठरली. आपल्याकडेही ठरू शकली असती किंवा ठरू शकेल, फक्त सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. वाढणारे हात विकासाला हात देणारे ठरावेत. तसा प्रयत्न सरकारने करायला हवा. या वाढणाऱ्या हातांचा योग्य वापर करणारे धोरण आखायला हवे.
चीनमध्ये खेड्यातल्या नागरिकाला नोकरीचे नियुक्ती पत्र असल्याशिवाय शहरात राहण्याची परवानगी नाही; आपल्याकडे मात्र आधुनिक पिढीला शहरातील सुखासीन आयुष्याची चटकच लागली आहे. त्यामुळे खेडी ओस पडत आहे. शेतात राबायला मजूर मिळत नाही आणि शहरात बेकारांचे तांडे फिरत आहेत. खरे तर लोकसंख्यावाढ ही समस्याच नाही आणि ती समस्या वाटतच असेल तर त्याला सर्वस्वी कारणीभूत आहे ते आपले एकाच मापदंडाचे सरसकट नियोजन. ज्यांचे उत्पन्न मर्यादित, काम मर्यादित त्यांनी कुटुंब नियोजन करणे समर्थनीय होते. मात्र, ज्यांचे उत्पन्न अमर्याद, काम, व्यवसाय, उद्योग अमर्याद त्यांनीही ‘हम दो हमारा एक’ म्हणजे अकलेचे दिवाळे निघाल्याचाच प्रकार. किमान भविष्यात तरी या चुका आपण टाळायला हव्यात. खाणाऱ्या तोंडांची संख्या वाढत आहे असा एककल्ली विचार करण्यापेक्षा त्यासोबत वाढणाऱ्या
ोन हातांना आणि येणाऱ्या मेंदूला पुरेसा वाव देऊन त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे विकासाला पूरक आणि प्रेरक ठरणार आहे. शेवटी मनुष्यबळ हीच आपली खरी संपत्ती आहे. फक्त या बळाला कार्यकुशल आणि समर्थ कसे करता येईल हीच खरी समस्या आहे. देशाच्या विकासाचे स्वप्न या राबणाऱ्या हातात आणि काम करणाऱ्या मेंदूतच दडले आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply