जगात सर्वाधिक समृद्ध परंपरा, संस्कृती आणि इतिहास लाभलेला देश म्हणून भारताला ओळखले जाते. भारताची ही ओळख अनाठायी म्हणता येणार नाही. जगात क्वचितच एखाद्या सभ्यतेला किंवा संस्कृतीला भारतीय संस्कृतीइतका विशाल वारसा लाभला असेल. या देशाने संपूर्ण जगाला जे काही दिले त्याची तुलनाच करता येणार नाही. ज्ञानाच्या सगळ््याच शाखा, सभ्यतेचे सगळे मापदंड, संस्कृतीची सगळी वैशिष्ट्ये भारताने जगाला प्रदान केली आहेत. एके काळचा दातृत्वाने भारलेला आणि भरलेला हा भारत आज मात्र याचक बनून उभा दिसतो. ब्रिटिशांना किंवा इतर आक्रमकांना त्यासाठी दोष देण्यात अर्थ नाही. आपणच कुठेतरी कमी पडलो असू ही कमतरता किंवा न्यूनता आजही कायम आहे. भारतानेच पुरविलेल्या ज्ञानावर समृद्ध झालेले कितीतरी देश आज जगाच्या पाठीवर आहेत. केवळ ज्ञानविज्ञानाच्या प्रांतातच नव्हे तर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही भारतीयांनी शिखर सर केले होते. संपूर्ण जगाने ज्यांच्या केवळ नावापुढे नतमस्तक व्हावे असे अनेक तत्त्वज्ञ, ज्ञानी पुरुष या देशात होऊन गेले. गौतम बुद्धासारखा महात्माही याच देशाची देण आहे. पण आमचीच झोळी फाटकी असेल तर त्याला दैव तरी काय करणार? गौतम बुद्धाच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाला भारतातच विरोध झाला. हे ज्ञान सीमा ओलांडून परदेशात गेले आणि ते देश धन्य झाले. आज जपान आणि चीन बौद्धमय झाले आहेत. त्यांच्या प्रगतीचा संबंध त्यांनी स्वीकारलेल्या या तत्त्वज्ञानाशी निश्चितच असला पाहिजे. भारतीयांमध्ये असलेली सगळ््यात मोठी कमतरता म्हणजे भारतीय लोकं अति दैववादी आहेत. थोर विभूतींना देवत्व बहाल करून त्यांना मंदिरात बंदिस्त करण्यातच आम्ही धन्यता मानतो. हा एक सोयीस्कर पलायनवाद आहे. उच्च विचार आचरणात आणण्यापेक्षा त्यांना अमानवी किंवा अति मानवी, थोडक्यात दैवी मानून स्वत:ची सुटका करून घेण्
ाचा हा एक सोपा मार्ग आहे. बौद्ध धर्म भारतात रुजू शकला नाही, किवा त्याचा प्रसार होऊ
शकला नाही यामागे हाच पलायनवाद
कारणीभूत ठरला. गौतम बुद्धांचे निखळ मानवतावादी विचार सामाजिक विषमतेवर पोसल्या गेलेल्या धर्ममार्तंडांना पचवता आले नाहीत. वैयक्तिक स्वार्थातून त्यांनी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला विरोध केला आणि त्याची किंमत संपूर्ण देशाला चुकवावी लागली. भारतात हे दुर्दैव केवळ महात्मा बुद्धांच्याच वाट्याला आले असे नाही. प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीत अशा एखाद्या तरी महात्म्याचा बळी आम्ही दिलेला आहे. नवे विचार किंवा नवी वैचारिक क्रांती अंगीकारून त्यानुसार समाजजीवनात किंवा वैयक्तिक आचरणात बदल करायला आम्ही तयार नसतो. आम्ही आमची कवाडे बंद करून घेतली आहेत. नव्या प्रकाशाची किरणे आमच्या बंदिस्त घरात डोकावू शकत नाहीत. मग ही किरणे पूर्वेकडून आलेली असोत अथवा पश्चिमेकडून! आम्हांला त्यांचे स्वागत कधी करावेसे वाटले नाही. आमच्या या मानसिकतेमुळेच सध्या आमची अवस्था ना धड पौर्वात्य ना धड पाश्चिमात्य अशी त्रिशंकू झाली आहे. आम्ही निखळ विज्ञानवादी नाही आणि निखळ धर्मवादीही नाही. आम्ही संपूर्ण सश्रद्धही नाही आणि पूर्णपणे अंधश्रद्धही नाही. कदाचित त्यामुळेच अनेक थोरपुरुष, महात्मे या देशात होऊन गेल्यावरही आमची प्रगती झालेली नसावी. अहिंसक संघर्षाचे अमोघ तत्त्वज्ञान जगाला देणारे महात्मा गांधी याच देशात होऊन गेले हे 100 वर्षांनंतर सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटावे या गतीने आमची हिंसेकडे वाटचाल सुरू आहे. गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या राज्यात बुवाबाजी रोखण्यासाठी कायदा करावा लागतो ही केवढी मोठी शोकांतिका! छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरसारख्याच्या कर्मभूमीत
लित महिलेची नग्न धिंड काढण्यात येते, सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी भरण्यास मज्जाव करण्यात येतो, प्रसंगी या प्रमादासाठी (?) दलितांना जाळण्यात येते ही लक्षणे कशाची समजायची? आम्ही महापुरुषांची महानता केवळ त्यांचे पुतळे उभारून, देव्हारे निर्माण करून गुंडाळून ठेवली आहे. या सगळ््या महापुरुषांचे विचार शाळेत शिकविल्या जाणाऱ्या क्रमिक पुस्तकांच्या छापील कागदाच्या बाहेर कधी पडलेच नाहीत, किंवा असेही म्हणता येईल की, या विचारांचा व्यापक प्रसार होण्याने ज्यांची अडचण होणार होती त्यांनी सुनियोजित प्रयत्नातून या विचारांना पुस्तकातच बंद करून ठेवले. हेच महापुरुष इतर देशात जन्माला आले असते तर आज साऱ्या जगासाठी ते आदर्श ठरले असते. एका शेक्सपिअरचे कौतुक करीत इंठाज साऱ्या जगभर फिरत असतात. एखादा जॉर्ज वॉशिंग्टन किवा लिंकन अमेरिकेच्या पिढ्यान्पिढ्यांना मार्गदर्शन करीत असतो. एक गटे (कवी) जर्मनांसाठी आपल्या श्रेष्ठत्वाची शेखी मिरविण्याकरिता पुरेसा ठरतो. एक कालर् माक्र्स आणि त्याचा ‘दास कॅपिटल’ जगातील तमाम साम्यवाद्यांच्या जगण्याचा आधार ठरतो. तुलनाच करायची झाल्यास हे सगळेच पासंगालाही पुरणार नाहीत इतके थोरपुरुष या भारत देशात होऊन गेले आहेत. परंतु पिकते तिथे विकत नाही हेच खरे. या देशात जवळपास प्रत्येक पिढीत संपूर्ण जगाने ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे असा महापुरुष जन्माला आला आहे. ही इतकी समृद्धी जगाच्या पाठीवरील इतर कोणत्याही देशाला लाभलेली नाही आणि तरीही आम्ही कंगालच राहिलो. आमच्यासारखे कमनशिबी, कपाळकरंटे, दुर्दैवी, हतभागी आम्हीच! विशेषणे द्यावीत तरी किती? किमान आतातरी आम्ही आमच्या मूलभूत क्षमतेला, मौलिक ज्ञानाला, प्रचंड विद्वत्तेला न्याय द्यायला हवा. अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश भारत जगाचे नेतृत्व करू शकतो असे म्हणतात. बुश यांचे हे वत्त*
्य म्हणजे केवळ तोंड चोपडणे नाही. भारताची तेवढी क्षमता आहेच, फक्त भारतीयांना त्याची जाणीव नाही! ही जाणीव ज्या दिवशी जागृत होईल तो दिवस भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरेल. त्यासाठी आधी आपण आपले गोडवे गाणारी मानसिकता बदलायला हवी. थोरपुरुषांना देवत्व बहाल करून त्यांना संपविण्याचे प्रकार थांबवायला हवेत. पुतळ््यांपेक्षा विचारांचा प्रसार अधिक महत्त्वाचा. भारतात असे एकही शहर नसेल की, जिथे एकतरी ‘गांधी चौक’ किंवा ‘गांधी मार्ग’
नाही. चौकाचौकांत, रस्त्यारस्त्यांवर आम्ही गांधीजींना पोचविले आणि त्यांच्याच समक्ष
त्यांच्याच नावाच्या चौकात, त्यांच्याच नावाच्या रस्त्यावर आम्हीच हिंसेचा नंगा नाच घालत असतो. अमेरिकन अध्यक्षांच्या सुरक्षा पथकातील कुत्रे राजघाटावर गेले म्हणून आम्हांला कोण वाईट वाटले? परंतु गांधी चौकात देशी दारूचे दुकान उघडताना आम्हांला काहीच वाटत नाही आणि या दुकानाला परवानगी देताना सरकारलाही गांधीजींच्या मानसन्मानाची जाणीव राहत नाही.अंधश्रध्दा व दैववादाच्या विरोधात समाजजागृती करणारे थोर संत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज याच भारतात होऊन गेले. तुकडोजींनी म्हटलेले, कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने विकावे, हे आचरण अंमलात आणून ठाामीण प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभारायचे ऐवजी आम्ही त्यांच्या समाधीवर हारतुरे, कुंकू गुलाल उधळण्यात धन्यता मानतो तर गाडगे महाराजांचे पुतळे उभारण्यात धन्यता मानतो. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश अंमलात आणायला शेवटी सरकारला ठाामस्वच्छता अभियान राबवावे लागते. छत्रपतींची थोरवी बिंबविण्याकरिता त्यांची नावे रेल्वेस्थानकाला द्यावी लागतात आणि विमानतळाला देण्याकरिता संघर्ष करावा लागतो. हे एकूणच विसंगत आचरण आमच्या वैचारिक आणि आर्थिकही कंगालपणाला कारणीभूत ठ
ले आहे. ही विसंगती कमी व्हायला हवी. हा देश गौतम बुद्धांचा, शिवरायांचा, महात्मा गांधींचा म्हणून ओळखला जावा, असे आम्हांला वाटत असेल तर ते केवळ पुतळे उभारून साध्य होणार नाही. आमच्या विचारातून, आचारातून महात्मा बुद्ध, शिवराय, महात्मा गांधी डोकावायला हवेत!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply