प्रकाशन दिनांक :- 12/09/2004
एकदा एका शिष्याने आपल्या गुरूला विचारले, ”महाराज, मला आयुष्य यशस्वीपणे जगायचे आहे. मला माझ्या बांधवांसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काहीतरी करायचे आहे आणि त्याचवेळी मला अजातशत्रूदेखील व्हायचे आहे. मला कोणी शत्रू असणार नाही, माझे वाईट कोणी चिंतणार नाही, अशा प्रकारचे आयुष्य मला जगायचे आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.” शिष्याचे निवेदन गुरूने लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर शांतपणे त्याला म्हणाले की, ”वत्सा! आधी तू तुझ्या मनातला गोंधळ दूर कर. तुला नेमके काय करायचे आहे आणि तुझ्या अपेक्षा काय आहेत, याची आधी नीट सांगड घाल. समाजासाठी काहीतरी करायचे म्हणतोस आणि त्याचवेळी तुला अजातशत्रू व्हायचे आहे! बाबारे, हे कलियुग आहे. तू चार चांगली काम करायला जा, काहीही न करता तुझे चाळीस शत्रू आपोआप पैदा होतील. इथे फक्त दगडंच अजातशत्रू असू शकतात. कारण ते काहीच करत नाही. तुला काहीतरी एकच शक्य आहे. एकतर चार चांगले काम करून आयुष्य सार्थकी लाव किंवा दगडासारखा निश्चल बनून जग आणि अजातशत्रू हो! काय निर्णय घ्यायचा तो तुझा तूच घे.” त्या गुरूने केलेले मार्गदर्शन योग्यच होते. इथे एखाद्याने काही चांगले करतो म्हटले की त्याचे हात बळकट करायला फारसे कुणी समोर येणार नाही; परंतु त्याला संपविणाऱ्यांची फौज उभी राहते. आधुनिक युग स्पर्धेचे आहे आणि ही स्पर्धा जीवघेणी आहे. ती शब्दश: जीवघेणी आहे. गुणवत्ता आणि दर्जाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला मागे टाकायचे, ही निकोप वृत्ती केव्हाच लोप पावली आहे. आपल्या लंगड्या पायांनी आपण स्पर्धा जिंकू शकत नाही हे ज्यांच्या लक्षात आले त्या लंगड्या स्पर्धकांनी इतरांचे पाय छाटण्याचा उद्योग करून स्पर्धेचे पावित्र्यच नष्ट केले आहे. कुठलेही चांगले काम कुणाला सहन होत नाही. खुज्या मनोवृत्तीच्या लोकांचा सर्वत्र सुळसुळाट झाला
आ
े आणि त्यांना
आपल्यापेक्षा कुणी उंच झालेले सहन होत नाही. मग अशावेळी येनकेन प्रकारे, साम-दाम-दंड-भेद अशी वाट्टेल ती नीती किंवा अनीती वापरून समोरच्याला संपविण्याचा प्रयत्न होतो.
आमच्या दुर्दैवाने आम्हालासुद्धा अशाच खुज्या प्रतिस्पर्धांचा सामना करावा लागत आहे. छातीवर वार करण्याची आणि छातीवर वार झेलण्याची मर्दानी नीती आम्हाला मान्य आहे. या नीतीने लढणाऱ्यासोबत दोन हात करायला आम्ही केव्हाही सज्ज आहोत, अशा प्रतिस्पर्ध्यासोबत लढताना आमचा पराभव झाला तरी आम्हाला त्याचे वैषम्य वाटणार नाही. एका मर्दाच्या हातून पराभव झाल्याचे समाधान मिळेल; परंतु आमच्या कथित प्रतिस्पर्ध्यांना लढाईची ही मैदानी नीती मान्य नाही. मान्य नाही म्हणण्यापेक्षा त्यांची तशी कुवतच नाही, असेच म्हणावे लागेल. अशा लढाईसाठी छातीचा कोट करावा लागतो. चार द्यायची आणि चार घ्यायची तयारी ठेवावी लागते. सख्यांच्या मंचावर तथाकथित समाजकारण व राजकारण करणाऱ्यांना ते कसे जमावे?
वऱ्हाडच्या कसदार काळ्या मातीत रुजून अल्पावधीतच विदर्भ-मराठवाड्यात फोफावलेल्या देशोन्नतीचा विस्तार शिखंडी वृत्तीच्या आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या डोळ्यात अगदी सुरुवातीपासूनच सलत आहे. बहुजन समाजातील एका शेतकरी कुटुंबातील एक मनुष्य आपल्या महाराष्ट्रभर पसरलेल्या साम्राज्याला आव्हान देतो, त्याची एवढी हिंमत? अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या घोडदौडीला (की गाढवदौडीला!) कुणी लगाम घालू शकले नाही आणि हा साधा शेतकऱ्याचा पोरगा शेती करण्याचे सोडून आमच्या धंद्याच्या मुळावर उठला, आमच्या आर्थिक साम्राज्याला आव्हान देण्याच्या बाता करू लागला; त्याच्या नांग्या वेळीच ठेचल्या गेल्या पाहिजे, या भावनेतून देशोन्नतीवर सातत्याने हल्ले सुरू झाले. आमिष दाखवून देशोन्नतीतील माणसे पळविण्यापासून पेपर वाटणाऱ्या पोरांना
ितवण्यापर्यंत सगळेच प्रकार करून पाहिले; परंतु यश आले नाही. देशोन्नतीच्या प्रगतीचा आलेख सतत चढताच राहिला. शेवटी कधी एक रुपयात अंक विकून हॉकर्सचा जीव घे तर कधी अंक फुकटात वाट, अशी भिकारचोट नीतीसुद्धा वापरून पाहिली, परिणाम शून्यच राहिला. प्रत्येक आव्हानाला सहजगत्या परतवून लावीत देशोन्नतीचा विकास होतच राहिला. आवृत्त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. देशोन्नतीच्या खपाचे आकडे जसे जसे वाढू लागले तसे तसे कथित नंबर वन मुखपत्रकारांचे डोके आणि डोळे गरगरू लागले. त्यातच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भक्कमपणे पाय रोवणाऱ्या देशोन्नतीने नागपूर आवृत्तीच्या माध्यमातून पूर्व विदर्भातही मुसंडी मारली आणि सम्राटांच्या पायाखालची वाळू वेगाने सरकू लागली. आता यांना रोखले नाही तर आपल्या कथित साम्राज्याचा डोलारा केव्हाही कोसळू शकतो, या भयप्रद जाणिवेने सगळे नीती-नियम, ताळतंत्र पायदळी तुडवून देशोन्नतीवर जमेल त्या प्रकारे, हाती येईल त्या शस्त्राने हल्ले सुरू झाले. आमच्या विरुध्द निशांत पतसंस्थेच्या संदर्भातील तथ्यहीन बातम्यांची मालिका हा केवळ एक बहाणा, निशाणा निशांतचा असला तरी लक्ष्य देशोन्नती आहे हे न कळण्याइतके कुणी भोळसट नाही. वास्तविक वृत्तपत्रांमध्ये स्पर्धा असणे अपेक्षितच असते; परंतु ही स्पर्धा सकस वैचारिक लिखाण, वस्तुनिष्ठ बातम्या, सामान्यांच्या समस्यांची प्रभावी मांडणी या निकषावर व्हायला पाहिजे. या निकषावर कोणते वृत्तपत्र चांगले आहे, याचा कौल वाचक देतील, ते वाचकांनाच ठरवू द्या; परंतु कथित नंबर वन मुखपत्रकारांना असा अहंकार झालेला आहे की, जगातले न्यायाचे ठेकेदार आपणच आहोत. आपण म्हणू तीच पूर्व, आपण ज्याला प्रमाणपत्र देऊ तीच व्यक्ती चांगली, आपण ज्याची तळी उचलू तोच पक्ष, तीच राजकीय विचारधारा श्रेष्ठ, लोकांना काहीच कळत नाही, त्यामुळे आ
ण सांगू तेच सत्य म्हणून लोकांनी स्वीकारावे, आपण तेवढे राजा हरिश्चंद्राचे अवतार, बाकी सगळे ढोंगी, लोकांना लुबाडणारे, या असल्या मूर्ख अहंकारातून कथित नंबर वन मुखपत्रवाल्यांचे पोरकट उद्योग चाललेले असतात. वस्तुस्थिती मात्र फार वेगळी आहे. सुजाण वाचकाला या वस्तुस्थितीची जाणीव असल्याने कथित नंबर वनवाल्यांच्या मर्कटचेष्टांकडे ते कधीच लक्ष देत नाही. हा सुजाण वाचकच देशोन्नतीचा भक्कम आधार आहे. आम्ही देशोन्नतीचे नाममात्र
मालक-संपादक आहोत. देशोन्नतीचे खरे मालक आणि संपादक आमचे वाचक
आहेत. त्यामुळेच प्रकाश पोहरे नावाच्या व्यक्तीवर कितीही अश्लाघ्य हल्ले झाले तरी त्याचा परिणाम देशोन्नतीच्या विकासावर झाला नाही. खरे तर पूर्वीच्या अनुभवातून शहाणे होऊन नंबर वनवाल्यांनी आपला गुणात्मक, वैचारिक दर्जा वाढवून स्पर्धा करायला हवी होती; परंतु वर्तमानपत्राकडे केवळ धंद्याच्या दृष्टिकोनातून बघणाऱ्यांकडे नोकरी करणारेही बिचारे मग केवळ नोकरी एके नोकरी याच व्यवहारी भावनेतून नोकरी करतात. त्यामुळे वैचारिक चळवळ निष्पक्षपणे राबविणाऱ्या देशोन्नतीमधील वारकऱ्यांच्या लिखाणासारखी धार त्यांच्या लिखाणाला चढूच शकत नाही. स्पर्धा करायची म्हणजे स्पर्धकाला कायमचे संपवायचे एवढेच कथित नंबर वनवाल्या मुखपत्रकारांना ठाऊक आहे आणि त्यासाठी कोणत्याही पातळीवर उतरायची त्यांची तयारी असते. असे म्हणतात की, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दिवसा उजेडी कपडे बदलू नयेत; परंतु हा संकेत सभ्य लोकांसाठी आहे. नागवे होऊनच ज्यांनी काचेचे महाल उभारले आणि महालातही जे नागवेच राहिले, त्यांना कसली आली नीतिमत्तेची चाड? पश्चिम विदर्भात जंग-जंग पछाडूनही देशोन्नतीला मात देता आली नाही आणि आता केवळ पन्नास दिवसात खपाचा आकडा पन्नास हजारावर गेलेल्या नागपूर आवृत्तीने पूर्व विदर्भातही भक्कम प
य रोवलेेले! भविष्य स्पष्ट दिसू लागले. शेवटी काय करावे, हे न सुचल्याने देशोन्नतीच्या संदर्भात सातत्याने अपयशी ठरलेले जुनेच डावपेच नव्याने वापरले जाऊ लागले. किंमत कमी करणे,अंक विकू न देणे, माणसं पळविणे, पार्सली पळविणे, वितरक-जाहिरातदारांना धमकावणे आदी प्रकार झाले. प्रकाश पोहरे या व्यक्तीचे चारित्र्यहनन हासुद्धा त्या डावपेचांचाच एक भाग.
एक मराठी माणूस मोठा होतो, हे या क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांना सहन झाले नाही. प्रकाश पोहरे अपवाद नाही. मोठा होऊ पाहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचे पाय छाटण्याचे उद्योग या मंडळींनी सातत्याने केले. नागपुरातून ‘निर्मल महाराष्ट्र’ हे वृत्तपत्र काढणाऱ्या प्रमोद मानमोडे यांनाही यांनी याच प्रकारे त्रस्त करून वृत्तपत्र बंद करायला भाग पाडले. बाबासाहेब केदारांच्या संस्थेची देखील अशीच बदनामी केली. अण्णा हजारेंसारख्या समाजसेवकाने लावून धरल्यावरही सुरेशदादा जैन यांच्या घोटाळ्यांकडे जाणीवपूर्वक दुलर्क्ष केले.आम्ही सुरू केलेल्या देशोन्नतीच्या नागपूर आवृत्तीमुळे आमच्या मागे लागणे अपेक्षितच होते. देशोन्नतीच्या द्वेषातूनच त्यांचे आमच्यावरील प्रेम (?) उफाळून आले आहे. वृत्तपत्र क्षेत्रात यांना कोणी प्रतिस्पर्धी नको आहे. या क्षेत्रावर आपला एकाधिकार जमविला की राज्याचे संपूर्ण राजकारण आपल्याला वाट्टेल तसे नाचवता येईल, हाच त्यांचा माफक आणि उदात्त हेतू. मराठी माणसाचा द्वेष आणि आपल्या क्षुद्र राजकीय महत्त्वाकांक्षा या दोन असाध्य रोगाने पीडित असलेल्या कथित नंबर वनवाल्या मुखपत्रकारांकडून नीतिमत्तेची, निकोप स्पर्धेची आम्ही कधी अपेक्षाही केली नाही. त्यांच्याशी स्पर्धा करायचा प्रयत्नही केला नाही. आचार, विचार आणि नीतीने अपंग असलेल्यांसोबत कसली आली स्पर्धा? परंतु वाईट याचे वाटते की अनेक मराठी माणसाचा गळा घ
टू पाहणाऱ्यांचे हात बळकट करणारी ताकद मराठी मुलखातूनच उभी झाली. राजकीय दलाली आणि ब्लॅकमेलिंगचे एक साधन म्हणजे वर्तमानपत्र, यापलीकडे ज्यांची वैचारिक झेप गेली नाही तेच आज आम्हाला नीतिमत्ता शिकवायला निघाले आहेत. स्वत: न्यायदेवतेचा आव आणीत सर्वसामान्यांना न्याय देण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी आपल्या बुडाखाली काय जळते आहे ते पाहावे. अर्थात देशोन्नतीचा अश्वमेध रोखण्याचे सामर्थ्य त्या अपंग मंडळीत नाही. पूर्वीप्रमाणे यावेळीसुद्धा त्यांना तोंडघशीच पडावे लागेल. फक्त अपेक्षा एवढीच आहे की, सुजाण मराठी वाचकांनी पुन्हा कोणत्याही मराठी माणसाचा गळा घोटण्याची हिंमत करणाऱ्यांना आपली ताकद पुरवू नये व कायमचा धडा शिकवावा.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply