नवीन लेखन...

बुध्दिभेद की…?




जगाने एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. एकविसावे शतक विज्ञानयुगाचे, आधुनिक युगाचे ‘ब्रँडनेम’ ठरले आहे. वैज्ञानिक विकासाची शिखरे या युगात मानवी प्रयत्नांसमोर थिटी वाटू लागली आहेत. संगणक क्रांतीने या जगाचा चेहरा- मोहराच बदलून टाकला आहे, परंतु या सगळ्या सकारात्मक आणि स्वागतार्ह गोष्टीला चिंतेची काळी किनारसुद्धा लागली आहे आणि ही चिंता आहे सर्वसामान्यांच्या आरोग्याची, त्यांच्या शारीरिक सुदृढतेची, मानवाच्या घटत्या सरासरी आयुर्मानाची! विज्ञानाने मानवाची जीवनशैली पार बदलून टाकली आहे. पूर्वी किमान ठाामीण भागातील लोकांची जीवनशैली तरी निसर्गाशी, पर्यावरणाशी सुसंगत होती. आता विज्ञानप्रेरित आधुनिक जीवनशैलीने खेड्यापाड्यातही आपला प्रभाव निर्माण केला आहे. हा प्रभाव केवळ राहणीमानापुरता मर्यादित नसून आपल्या आरोग्याच्या, आहाराच्या सवयी आणि कल्पनासुद्धा बदलत आहेत. वैज्ञानिक प्रगतीचे स्वागतच आहे, परंतु वैज्ञानिक प्रगतीच्या नावाखाली आधुनिकतेचे सोंग घेऊन ज्या जीवनशैलीचे आमच्यावर अतिक्रमण होत आहे, ती निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल. आधुनिक तेवढे चांगले आणि जुने ते सगळे निव्वळ मोडीत काढण्याच्या लायकीचे, हा जो नवविचार वेगाने फैलावत आहे, त्याचा दृश्य परिणाम म्हणून सातत्याने खालावत चाललेल्या नीतीमूल्यांकडे तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे पाहावे लागेल. फार पूर्वी नाही, अगदी शे-दोनशे वर्षापूर्वीच्या काळातील लोकांचे शारीरिक आरोग्य, सुदृढता आणि तंदुरुस्ती यांची आजच्या आधुनिक पिढीतील लोकांच्या आरोग्याशी, सुदृढतेशी तुलना केल्यास हा फरक अगदी ठळकपणे स्पष्ट होतो. वास्तविक दोन-तीनशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने अगदीच मागासलेला म्हणावा लागेल. गेल्या शंभर वर्षातच वैज्ञानिक प्रगतीचा झपाटा प्रचंड वाढला

. त्या अगोदरची प्रगती अतिशय संथगतीने झाली. अशा त्या वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने मागासलेल्या काळातील लोकांचे शारीरिक आरोग्य मात्र अतिशय सुदृढ होते. वास्तविक प्रगती ही सर्वांगीण असली पाहिजे, किंबहुना सर्वांगीण प्रगतीलाच प्रगती म्हणता येईल. त्या दृष्टीने विचार केल्यास आधुनिक प्रगतीला प्रगती

म्हणता येणार नाही. आधुनिक जगाने मानवाला

भौतिक सुविधा प्रचंड प्रमाणात उपलब्ध करून दिल्यात, परंतु त्याचवेळी मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने मात्र आमची उलट दिशेने घसरण सुरू झाली. याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की, वैज्ञानिक प्रगतीच्या गतीचा इतर क्षेत्रातील प्रगतीशी कधीच ताळमेळ राहिला नाही. खरेतर वैज्ञानिक प्रगतीच्या एकाच दिशेने होणाऱ्या वाढीमुळे प्रचंड असंतुलन निर्माण झाले. या दरम्यान एक मोठी चूक ही झाली की, विज्ञान युगात प्रवेश करताना आम्ही आमच्या परंपरागत ज्ञानाशी जुळलेली आमची नाळ तोडली. पोथ्या-पुराणातल्या भाकडकथा म्हणून आम्ही बहुतेक सर्वच नाकारले. त्यात भाकडकथांसोबतच वैज्ञानिक पाया असलेले ज्ञानसुद्धा आम्ही गमावून बसलो. विज्ञानाची जी काही प्रगती झाली ती आधुनिक युगातच, या प्रचंड भ्रमात राहून आम्ही आमच्या संस्कृती आणि परंपरांमधील विज्ञानाला साफ नाकारले. ज्या गोष्टी बुद्धीला किंवा तर्काला पटत नाही त्या नाकारल्याच पाहिजेत, परंतु तशा त्या नाकारण्यापूर्वी त्या खरोखरच नाकारण्यायोग्य आहेत की नाही, याचाही अभ्यास व्हायला हवा. आम्ही असा कुठलाही अभ्यास न करता पाश्चिमात्य देशाकडून येते तेच ज्ञान आणि तेच विज्ञान, या श्रद्धेवर विसंबून आमची संस्कृती आणि परंपरा सरसकट नाकारण्याची चूक केली. आमच्या मानसिक आणि शारीरिक खच्चीकरणामागच हे एक मोठेच कारण आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली आमची संस्कृती म्हणजेच जुन्या काळाच्या अभ्यासू लोकां
नी प्रचंड मेहनत करून तयार केलेली आमची जीवनशैली! आमच्या अभ्यासू पूर्वजांनी इथल्या निसर्गाचा, पर्यावरणाचा, भूगोलाचा सखोल अभ्यास करून एक सुसंगत जीवनशैली विकसित केली. त्यातूनच आहार-विहाराविषयीचे नेम-नियम तयार झाले. पुढे त्यांना धार्मिक अधिष्ठान मिळाले. कालांतराने काही भाकडकथा काही पोटार्थी वा गल्लाभरू लोकांनी या नेम-नियमांशी जुळविल्या, परंतु केवळ त्या कथांचा विचार करून या नेम-नियमांमागील विज्ञान नाकारणे योग्य ठरणार नाही. एक साधं उदाहरण आहे. आपल्याकडे चातुर्मासात म्हणजेच आषाढी ते कार्तिकी एकादशीदरम्यान आहारात कांदा, लसूणासारखे काही पदार्थ, एवढेच काय मांसाहारी पदार्थही वर्ज्य मानले जातात. चातुर्मासाचा हा काळ म्हणजे आपल्याकडचा पावसाळ्याचा काळ असतो. पावसाळ्यात हे वर्जीत पदार्थ शरीरासाठी अपायकारकच असतात. हा अगदी साधा शरीरशास्त्रीय नेम आहे, परंतु त्याचा संबंध धर्माशी, पौराणिक कथांशी जोडल्या गेल्याने त्यातील विज्ञान आम्हाला कळले नाही आणि धार्मिक खुळचट कल्पना म्हणून आम्ही या नेमाची वासलात लावली. हे केवळ एक उदाहरण झाले. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रकृतीच्या कुरबुरी ऐकायला येतात. चष्मे घातलेली शाळकरी मुलं तर मोठ्या प्रमाणात दिसतात. पाठीला पोक आलेली, हडकुळी किंवा मग अति लठ्ठ-गरगरीत मुलं पाहिली म्हणजे माझ्याच मनात कालवाकालव होते. हृदयविकाराच्या धक्क्याने ऐन तारुण्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या कमी नाही. कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रक्तदाबाचा विकार तर अगदी सार्वत्रिक झाला आहे. डोकेदुखी, पोटदुखी इतकी सामान्य झाली आहे की, त्याकडे कोणी लक्षही देत नाही. याचा सरळ संबंध आपल्या आहाराशी आहे. पूर्वीच्या काळी भोजनापूर्वी एक श्लोक आवर्जून म्हटल्या जायचा- ‘वदनी कवळ घेता…’, या श्लोकात एक ओळ ‘उदर भरण

नोहे जाणिजे यज्ञ कर्म’ अशीही आहे. त्या श्लोककर्त्याने भोजनामागील विज्ञानाचा चांगलाच अभ्यास केला असावा, हे निश्चित. आजचे आधुनिक विज्ञान हेच सांगते की, शरीर आपल्या नित्य कर्मासाठी लागणारी ऊर्जा ‘मंद ज्वलना’तून प्राप्त करीत असते. प्राणवायूच्या अन्नपदार्थांशी होणाऱ्या संयोगातून म्हणजेच ज्वलनातून शरीर ऊर्जानिर्मिती करीत असते. पोटाला यज्ञकुंड मानणारा तो श्लोककर्ता वेगळे काय सांगत होता? आपले पोट म्हणजे एक यज्ञकुंडच आहे. आपले भोजन म्हणजे त्या कुंडात पडणाऱ्या समिधा आहेत. यज्ञात ज्याप्रमाणे योग्य आणि विशिष्ट समिधांचाच वापर केला जातो, तसाच भोजनातही योग्य पदार्थांचाच समावेश असावा आणि यज्ञ ज्या सात्त्विक, पवित्र भावनेने केले जाते, तीच भावना भोजन

करतानासुद्धा असावी, हा साधा-सरळ आणि तितकाच वैज्ञानिक उपदेश ‘उदर भरण नोहे, जाणिजे

यज्ञकर्म’ या ओळीतून श्लोककर्ता करीत नाही का? परंतु आजकाल उदरभरणाच्या संकल्पनाच बदलल्या आहेत. भोजन नेहमी ताजे आणि गरम असावे हा संकेत आहे. यज्ञकुंडात थंड आणि ओल्या समिधा टाकून कसे चालेल? परंतु जिथे भोजनामागची भावना किंवा पवित्रता आणि शुद्धताच लोप पावली तिथे काय आणि कसे खावे याचा विधीनिषेध उरण्याचे कारणच नाही. आम्ही काहीही, केव्हाही आणि कसेही खातो. जीभेचे चोचले पुरविणे एवढाच आमचा उद्देश असतो. हे चोचले पुरविताना आम्ही पोटात काय कोंबतो याचा विचार अजिबात करत नाही. शेवटी यज्ञकुंडात ज्या प्रकारची समीधा पडेल तशीच ऊर्जा त्यातून प्रगट होईल. दक्षिणेकडील काही राज्यात पिण्याचे पाणी कोमट असते आणि तेच योग्य आहे. थंडगार पाणी पोटात ओतून पोटाला ऊर्जानिर्मितीसाठी अधिक मेहनत करायला लावण्यात काय हशील? आपल्या बहुतेक शारीरिक तक्रारींचे मूळ पोटात दडले आहे. शरीराच्या आरोग्याचा पोटाशी असलेला हा संबंध लक्षात घेऊनच आपल्या पूर्वजांनी त्य
ांच्या अनुभवातून आहार-विहाराचे नियम तयार केले. खुळचट कल्पना म्हणून आमच्या वैज्ञानिक दृष्टीने या नियमांकडे साफ दुलर्क्ष केले. त्याची किंमत म्हणून आज आम्ही आपले आरोग्य घालवून बसलो आहोत. पूर्वी दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर पडून थोडावेळ आराम करण्याची प्रथा होती. हेतू हाच की, भोजनानंतर शारीरिक ऊर्जा अन्नाच्या पचनासाठी कामी लागावी आणि अन्नाचे पचन सुलभ तसेच जलद व्हावे, परंतु आजकाल धावत-पळत, कधीकधी तर उभ्यानेच जेवण उरकले जाते आणि जेवल्यानंतर धावत-पळतच इतर कामांना आपण सुरुवात करतो. त्यामुळे अन्नपचनाला लागणारी ऊर्जा शरीर पुरेशा प्रमाणात देऊ शकत नाही. त्याचा परिणाम पचनावर होतो. पचन नीट झाले नाही की, वायूविकार व बध्दकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. सांगायचे तात्पर्य, आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार करताना आपण आपल्या संस्कृतीने आणि परंपरेने आखून दिलेल्या मर्यादांचा कधीच विचार करत नाही. पुराणातील वांगी म्हणून आपण सगळ्याच गोष्टींना नाकारत असतो. विज्ञानाचा मक्ता केवळ पाश्चात्त्य देशांनीच घेतलेला नाही. आमच्या प्राचीन ऋषी-मुनींनीही ( ज्यांना विदेशात संशोधक किंवा शास्त्रज्ञ म्हणून संबोधिल्या जाते) सखोल अभ्यास करूनच वैज्ञानिक तथ्ये आमच्यासमोर मांडली आहेत. केवळ ती वेगळ्या भाषेत आणि वेगळ्या प्रकारे सांगितली म्हणून त्याज्य ठरू शकत नाहीत. उलट आधुनिक युगातील वैज्ञानिक संशोधने एकांगी आणि मानवी चेहरा नसलेली, मात्र धंदेवाईक दृष्टिकोन समोर ठेवून केलेली आहेत. त्या तुलनेत निसर्ग आणि पर्यावरणाशी मानवाचा असलेला संबंध लक्षात घेऊन आणि परोपकारी उद्देश समोर ठेवून भारतीय अभ्यासकांनी विज्ञानाची केलेली मांडणी मानवी विकासाच्या सर्वांगाला धरून आहे, असेच म्हणावे लागेल. केवळ आहाराचा विचार केला तरी त्यातून आमची परंपरागत पद्धतीच आमच्यासाठी

्रेष्ठ आहे, हेच सिद्ध होते. मात्र गल्लाभरू पाश्चात्त्य ज्ञान-विज्ञान आणि जीवनशैलीच्या आहारी जाऊन आम्ही आमचा बुद्धिभेद करून घेतला आहे.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..