प्रकाशन दिनांक :- 26/09/2004
सध्या संपूर्ण राज्यात निवडणूक आणि गणेशोत्स्वाची धूम सुरु आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण एकप्रकारच्या धुंदीने भारावून गेले आहे. एक उत्सव सामाजिक आणि भक्तिभावाने प्रेरित असलेला तर दुसरा म्हणजे पंचवार्षिक तमाशाचा फड असलेला. दोन्ही उत्सवाच्या मूलभूत धारणेत प्रचंड फरक असला तरी या उत्सवांच्या सादरीकरणात मात्र कमालीचे साम्य आहे. दोन्ही उत्सवांनी नैतिकता आणि मांगल्याला केव्हाच तिलांजली दिली आहे. मूळ उद्दिष्टांपासून भरकटणे आणि उत्सवापेक्षा सोहळ्याला अत्याधिक महत्त्व प्राप्त होणे, हे त्यामागचे एक प्रमुख कारण म्हणता येईल.
गणेशोत्सव असो अथवा इतर कुठलाही धार्मिक उत्सव, या उत्सवातील पावित्र्य आज नष्ट झालेले दिसते. परंपरेने चालत आलेल्या रुढी, प्रथांमागील विज्ञान समजून न घेता त्या परंपरांचे अंधानुकरण करण्याचा हा दृष्य परिणाम म्हणावा लागेल. त्यामुळे परंपरांचे पालन तर होत आहे; परंतु साधन आणि साध्य पार बदलून गेले आहे. कोणत्याही उत्सवात होम-हवन हा एक अविभाज्य भाग असतो. यज्ञकुंडात समिधांचे हवन करून इष्ट देवतेला प्रसन्न करण्यासाठी आवाहन करणे, हा त्यामागचा एक उद्देश असला तरी त्यामागचे विज्ञानसुद्धा समजून घेणे आवश्यक ठरते. विशिष्ट प्रकारचा धूर किंवा वायूचा आसमंतातील घटकांवर इष्ट परिणाम घडून येऊ शकतो; हे आज विज्ञानानेदेखील मान्य केले आहे. विमानाने आकाशातील ढगावर विशिष्ट रसायनांची फवारणी करून पाऊस पाडता येत असेल तर यज्ञात विशिष्ट प्रकारच्या समिधांचे हवन करून निर्माण होणाऱ्या धुरातदेखील काहीतरी सामर्थ्य निश्चित असले पाहिजे. यज्ञकुंडात समिधांचे हवन करणे, धूप किंवा राळ जाळणे यामागील विज्ञान समजून घ्यायला आज कुणी तयार नाही. त्यामुळे धूप आणि राळेची जागा तीप गंध असलेल्या उदबत्त्यांच्या घमघमाटाने घेतली आहे
. ब्रह्यांडात अशा काही सुप्त शक्ती जरुर आहेत की, त्यांचे अस्तित्व तर सिद्ध करता येत नाही, पण त्या मानवाच्या
चित्तवृत्तीवर अवश्यंभावी परिणाम करतात. हा
परिणाम दोन प्रकारे होतो. कधी त्या सुप्त शक्तीमुळे मानवाच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात तर कधी मनुष्य अस्वस्थ होतो. एखाद्या खोलीत कापूर किंवा धूप जाळा. त्यापासून निर्माण होणाऱ्या धुराने चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. आता त्याच खोलीत मिरच्या जाळा. तुम्ही त्या खोलीत क्षणभरही थांबू शकत नाही. वास्तविक कापूर किंवा धूप जाळला काय अन् मिरच्या जाळल्या काय, दोन्ही वेळी निर्माण होतो तो एकसारखा दिसणारा धूरच! मग त्यामध्ये असा काय फरक आहे की, कापूर किवा धूप जाळल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आणि मिरच्या जाळल्याने ठसका लागतो? फरक निश्चितपणे दोन वेगवेगळे पदार्थ जाळल्यामुळे तयार होणाऱ्या दोन निरनिराळ्या अदृश्य तत्त्वांचा असला पाहिजे. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आणि विशिष्ट झाडाची लाकडे जाळून होळी पेटवायची असते. त्यापासून निघणाऱ्या धुराने निर्माण होणाऱ्या उष्णतेने वातावरण शुद्ध होते. पर्यावरणाचे संतुलन बिघडवू पाहणारे हवेतील घटक नष्ट होतात, ही त्यामागची संकल्पना; परंतु आज होळी आणि शिमग्याची अवस्था आम्ही काय केली आहे? ज्याच्या मागची प्रेरणा, संकल्पना, श्रद्धा समजून घेऊन साजरा केला जातो, असा एकतरी सण आहे का? सगळ्या सणांना आम्ही उत्सवाचे स्वरूप दिले आहे आणि उत्सवाची आमची व्याख्या आहे निव्वळ मौजमस्ती, धांगडधिंगा, त्यात मांगल्य कुठेही नसते. श्रद्धा तर केव्हाच लोप पावली.
असाच अनुभव वाद्यांच्या बाबतीतही येतो. सनई, चौघडा, मृदंग, तबला, टाळ, बासरी ही वाद्ये मंगलवाद्य म्हणून ओळखली जातात. कारण ही वाद्ये वाजविली जातात तेव्हा आपोआपच मंगलमय वातावरण निर्माण होते. वातावरण पावित्र्याने भारुन जाते. उपस
थितांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आणि त्यांच्या मनात वाईट विचारांना अजिबात थारा मिळत नाही. याउलट ताशे, डफडे, ढोल ही वाद्ये बघा. या वाद्यांच्या आवाजाने उपस्थितांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा जोश निर्माण होतो. त्यांचे बाहू स्फूरण पावू लागतात. आपोआपच आक्रमक प्रवृत्ती त्यांच्यात भिनते. कुणाला तरी मारण्यासाठी हात शिवशिवतात. थोडक्यात मनुष्य हिंसक होतो. त्याच्यात राक्षस संचारतो. एवढेच नव्हे तर एक प्रकारचा सामूहिक उन्माद निर्माण होतो. अशा सामूहिक उन्मादाने घेरलेल्या समूहाला चांगल्या वाईटाचे भान राहत नाही. ते बेभान आणि हिंसक झालेले असतात. त्या विशिष्ट कालखंडापुरती भीती भावनाही त्यांना स्पर्श करत नाही. मागेपुढे न बघता तुटून पडणे, हीच प्रवृत्ती बनते. त्यामुळेच अशा वाद्यांचा उपयोग पूर्वी युद्धप्रसंगी, देवीदेवतांना बळी चढविताना किंवा शिकारीच्या वेळी केल्या जात असे. वास्तविक दोन्ही प्रकार वाद्यांचेच. तालबद्ध नाद निर्माण करणारे. असे असतानाही एका गटात मोडणारी वाद्ये मनुष्याच्या सात्त्विक प्रवृत्तीला चालना देतात. तर दुसऱ्या गटातील वाद्ये त्याच्यातील हिंस्त्र पशू जागवतात. खरे म्हटले तर वाद्यांमुळे मनुष्याच्या शरीरावर थेट काही परिणाम होत नाही किंवा त्यांच्या शरीरातही काही फेरबदल घडून येत नाही. तरीदेखील वाद्यांच्या नादाचा मनुष्यावर परिणाम होतो, हे मात्र निश्चित. आमच्या पूर्वजांनी हे जाणले होते. त्यामुळेच त्यांनी विशिष्ट प्रसंगासाठी विशिष्ट प्रकारच्या वाद्यांची रचना करून ठेवली आहे. विवाहाला आपण मंगल सोहळा किंवा मंगल परिणय म्हणूनही संबोधतो. कारण तो दोन जीवांच्या आयुष्यभराच्या मीलनाचा, त्यांचे भावविश्व बदलवून टाकणारा सोहळा असतो. त्या सोहळ्यातून पुढील पिढीच्या आगमनाचे बीज रोवल्या जात असते. मनुष्याच्या जीवनाला एक वेगळेच व
ण देणारा, अतिशय महत्त्वपूर्ण असा तो प्रसंग असतो. त्यामुळेच आमच्या पूर्वजांनी विवाहाला सोळा संस्कारामधील एक संस्कार मानले आणि त्या मंगलमय प्रसंगासाठी मंगलवाद्यांची योजना केली. दुर्दैवाने, आजकाल प्रसंग कोणताही असो, वाद्ये मात्र आम्हाला ढोल आणि ताशे हीच हवी असतात. मग तो विवाह सोहळा असो अथवा गणरायाचे किंवा दुर्गादेवीचे आगमन असो. वास्तविक हे मंगल प्रसंग. मात्र अशा मगल प्रसंगीही आम्ही मनुष्यातील हिंस्त्र प्रवृत्तीला चालना देणारी ढोल, ताशे ही वाद्ये वाजवतो.
आमच्या ऋषी-मुनींनी (खरे तर त्यांना शास्त्रज्ञच म्हणायला हवे) साध्या वाद्यांपासून
प्रत्येक बाबतीत सखोल चिंतन आणि मनन करून निर्माण केलेल्या परंपरेकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे आवश्यक ठरते. आजकाल या चिकित्सक दृष्टीपेक्षा हेटाळणीलाच अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वाद्यांच्या संदर्भातील सूक्ष्म विज्ञान आपण समजून घ्यायला हवे. मृदंग, तबल्यासारखी ताल वाद्ये हरिणाच्या चामड्यापासून बनविली जातात. सूर आणि स्वरांचे जाणकारच ही वाद्ये कुशलतेने हाताळून त्यातून नाद ब्रह्याची निर्मिती करू शकतात. त्याउलट ढोल,ताशांसारखी आधुनिक वाद्ये मात्र प्लास्टीकच्या विविध प्रकारातून बनलेली असतात. त्यातून नाद (खरे तर गोंगाट) निर्माण करायला कुठलीही कुशलता लागत नाही. ही वाद्ये वाजविणाऱ्यांनी कुठलीही संगीत साधना केलेली नसते. बरेचदा तर ढोल पिटणारे चक्क नशा पाणी केलेले असतात. अशा अमंगल वाद्यातून आसुरी भावनांना चालना मिळाली नाही तरच नवल! गणेश विसर्जन मिरवणुकीच्यादरम्यान तणाव निर्माण करण्यास ही वाद्येदेखील काही प्रमाणात कारणीभूत म्हणावी लागतील आणि अशीच वाद्ये विवाहासारख्या मंगलप्रसंगी वाजविल्याने आसमंतातील मंगल नव्हे तर अमंगल अशा आसुरी शक्ती वधू-वरांना आशीर्वाद देण्याकरिता येतात, हे आपण का लक्षात
घेत नाही?
मंगलतेच्या दृष्टीने जी तफावत वाद्यांमध्ये आढळून येते तीच तफावत वेगवेगळ्या आहारातसुद्धा दिसून येते. आपल्या पूर्वजांनी गाईला कामधेनू आणि तिच्या दुधाला अमृताची उपमा दिली आहे, त्यामागेही आहारविषयक सूक्ष्म विज्ञानच आहे. गाईच्या आणि म्हशीच्या दुधात सर्वच दृष्टीने प्रचंड तफावत आहे. दुधाला संपूर्ण आहाराचा दर्जा दिला जातो; परंतु गाईच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये असलेला फरक एका उदाहरणातून अगदी सहज स्पष्ट होतो. गाईची वासरे आणि म्हशीची वगारे रात्रभर एखाद्या गोठ्यात बांधून ठेवली आणि सकाळी त्यांना मोकळे सोडले तर आपल्याला असे दिसून येईल की, गाईची वासरे बरोबर आपल्या-आपल्या आईजवळ स्तनपानास जातात आणि गायदेखील नेमक्या आपल्याच वासराला दुग्धपान करविते. याउलट म्हशीची वगारे मात्र आपल्या आईला ओळखू शकत नाही आणि म्हशीसुद्धा कोणत्याही पिलाला आपलेच समजून दूध पाजतात. मुलं मोठी झाल्यावर आपल्या आई-बापांना ओळखत नाही, असे आजकाल वारंवार बोलल्या जाते. मुलांच्या आहारात म्हशीच्या दुधाचा सर्रास वापर, हेसुद्धा त्यामागे कारण असू शकते. एकूण काय तर आपल्याकडील सगळ्याच मंगल उत्सवातील मांगल्य अमंगल झाले आहे. संस्कृती आणि परंपरेकडे बुद्धिवादी चिकित्सक दृष्टीने न पाहता केवळ या परंपरांची हेटाळणी करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. त्यामुळेच कधीकाळचे आमचे मंगल उत्सव आधी सोहळे आणि मग तमाशे या क्रमाने आपले पावित्र्य आणि मांगल्य घालवून बसले आहेत.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply