नवीन लेखन...

वाट, वाटसरू आणि वाटाडे!





डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक भाग झाले आहेत त्यापैकी दोन भागांचे शक्तिप्रदर्शन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात पार पडले. शक्तिप्रदर्शनापूर्वी उभय गटातील वाद एवढा विकोपास गेला होता की संघर्षाची ठिणगी पडते की काय, असे वाटायला लागले होते. सुदैवाने ती परिस्थिती टळली. मात्र या शक्तिप्रदर्शनाच्या निमित्ताने रिपब्लिकन नेत्यांच्या बुद्ध धर्माच्या निष्ठेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रिपब्लिकन नेते उठसूठ भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत असतात. मात्र या नेत्यांनी त्या महान आत्म्यांची शिकवणूक कितपत आचरणात आणली याचा त्यांच्या अनुयायांनी देखील अंतर्मुख होऊन विचार केला तर त्यांची मान आपसुकच नकारात्मक अर्थाने हलू लागेल याची मला खात्री आहे.

हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांमुळे त्याच धर्मातील विशिष्ट घटकांवर युगानुयुगे जो अन्याय झाला तो अन्याय हिंदू धर्मात राहून दूर होऊ शकत नाही याची खात्री पटल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह भगवान गौतम बुध्दाने दिलेला बुध्द धम्म स्वीकारला.

परंतु आपणच कसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी आहोत हे उच्चरवाने ओरडून सांगत घसा कोरडा पाडून घेणाऱ्या त्यांच्या तथाकथित अनुयायांनीच डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या धम्माचे तुकडे केले आहेत. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी धम्म वापरण्याचा प्रयोग काही रिपब्लिकन नेत्यांनी सुरू केला. केवळ भगवान गौतम बुध्द व डॉ. आंबेडकरांवरील प्रेमापोटी, निष्ठेपोटी जे लाखो आंबेडकरी या नेत्यांनी हाक देताबरोबर ओ देऊन उपाशीपोटी, वाट्टेल त्या हालअपेष्टा सहन करीत धावून येतात त्यांच्या प्रेमाचा, निष्ठेचा या नेत्यांनी व्यापार सुरू केला. समान महत्त्वाकांक्षा असलेले चार लोक एकत्
आले तर त्यांचे फार दिवस पटणे शक्य नसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आंबेडकरी जनतेच्या प्रेमाची शिडी वापरून झटपट वर जाण्याची अनेक रिपब्लिकन नेत्यांना घाई झाली आहे.

त्यातूनच मग सुरू झाली एकमेकांचे

पाय ओढण्याची स्पर्धा आणि त्याचा अंतिम परिपाक जो होणार होता तोच झाला. रिपब्लिकन पक्षाची शकले उडाली. एकदा नव्हे अनेकदा उडाली. या नादान नेत्यांना एकत्र येण्यासाठी शेवटी आंबेडकरी जनतेनेच रेटा लावला. शेवटी त्यांना एका व्यासपीठावर येऊन रिपब्लिकन पक्षाच्या एकत्रीकरणाची घोषणा करणे भाग पडले. मात्र एकत्र नांदल्यास आपली प्रत्येकाचीच ‘दुकानदारी’ चालू शकणार नाही, हे सत्य उमगलेल्या काही नेत्यांनी लवकरच आपापले वेगळे ‘दुकान’ थाटले. आतापर्यंत या दुकानदारांनी आपापले कार्यक्षेत्र आखून घेतले होते आणि सहसा दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात तोंड खुपसायचे नाही, असा अलिखित दंडक घालून घेतला होता. मात्र खासदार रामदास आठवले यांच्या गटाने प्रथमच खासदार प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न केला आणि युध्दाला तोंड फुटले.

अकोल्यात विजयादशमीच्या दुसर्‍या दिवशी उभय गटांचे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या नावाखाली जे काही कार्यक्रम झाले त्यांचा भगवान गौतम बुध्दांशी, त्यांच्या धम्माशी, पंचशीलाशी, धम्माच्या शिकवणुकीशी काडीचाही संबंध नव्हता हे कुठलाही सच्चा धम्मसेवक कबूल करेल. तिथे जे काही झाले ते केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन होते. राजकीय दुकानदारी होती. दोन्ही कार्यक्रमांमध्ये ज्या प्रकारची भाषणे झाली ती भाषणेच त्या कार्यक्रमांचे खरे स्वरूप उघड करण्यासाठी पुरेशी आहेत. अर्थात नेतेमंडळी आणि त्यांचा कंपू हे कधीच मान्य करणार नाही. कारण आंबेडकरी जनतेची धम्म, पंचशीलाच्या नावाखाली दिशाभूल करणे आणि आपली राजकीय पोळी शेकून घेणे हेच या मं
डळीच्या आयुष्याचे इतिकर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांप्रतिच्या तळमळीपोटी आपल्या जीवनाचा यज्ञ केला त्या लोकांशी या मंडळींना काही घेणे देणे नाही. यांना खासदारकी मिळाली की समस्त दलित बांधवांवर युगानुयुगे जो अन्याय झाला त्याचे परिमार्जन झाले, असे समजणारी ही मंडळी आहे. गप्पा आपल्या समाजाच्या उत्थानाच्या मारायच्या आणि प्रत्यक्षात समाज अज्ञानी, अशिक्षित मागासलेलाच कसा राहील याची काळजी घ्यायची ही या मंडळीची कार्यप्रणाली आहे, कारण समाज सुशिक्षित झाला, पुढारला तर आपले पितळ उघडे पडेल आणि त्याचबरोबर आपली दुकानदारी संपुष्टात येईल, याची भीती त्यांना वाटते. तसे नसते तर इतर सर्व बाबतीत डॉ. आंबेडकरांचा शब्द प्रमाण मानणार्‍या किंवा तसे दर्शविणाऱ्यांनी दलितांसाठी केवळ 10 वर्षे आरक्षण ठेवण्याच्या डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेची कदर करीत यापुढे आम्हाला आरक्षणाची कुबडी नको, असे ठणकावून सांगितले असते. साधी गोष्ट आहे. अपघातात पाय मोडलेल्या व्यक्तीला डॉक्टर शस्त्रक्रियेनंतरचे काही दिवस कुबड्या वापरण्यास सांगतात. मात्र काही दिवसांनी ते रूग्णाला कुबड्या फेकून देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सांगतात. प्रारंभी रुग्ण धडपडतो. मात्र लवकरच त्याचा आत्मविश्वास जागृत होतो आणि तो चालायलाच नव्हे तर चक्क धावायला लागतो. याउलट डॉक्टरांनी जर त्याला कुबड्या फेकून देण्यास सांगितले नाही तर तो जन्मभरासाठी कुबड्यांचा आश्रीत होऊन जाईल. त्याचा आत्मविश्वास कधीच जागृत होणार नाही आणि आत्मविश्वास हरवलेली व्यक्ती किंवा समाज कधीच जगाशी स्पर्धा करू शकत नाही. ती व्यक्ती किंवा तो समाज सतत कुणाचा तरी आश्रय शोधत असतो. रिपब्लिकन नेत्यांना नेमके तेच हवे आहे. आंबेडकरी जनतेचा आत्मविश्वास जागृत झाला आणि ती जगाशी स्पर्धा करू लागली तर तिला आपल्या आधाराची गरज
ासणार नाही आणि मग आपल्या खासदारकीचे काय, हा प्रश्न त्यांना सतत भेडसावित असतो. त्यामुळेच आरक्षण हटविण्याचा मुद्दा उपस्थित झाला की ते आभाळ कोसळल्यागत ओरडत असतात. कारण दलितांनी सदैव आरक्षणाच्या कुबड्या घेऊन जगावे आणि आधारासाठी आपल्याकडे बघावे, ही त्यांची इच्छा असते. दुर्दैवाने आंबेडकरी जनताही या नेत्यांच्या भुल-भुलय्यातून बाहेर पडण्यास तयार नाही हे कटू सत्य आहे.

वास्तविक खरा धम्म म्हणजे काय, हे यापैकी बहुतेक नेत्यांना उमगलेले नाही. खोटे बोलू नका, चोरी करू नका, निर्व्यसनी

रहा, व्यभिचार करू नका, हिंसा करू नका या पंचशीलाचे

पालन यापैकी किती नेते करतात? खरा धम्म समजून घ्यायचा असेल तर इगतपुरीला जावे लागते. विपश्यना करावी लागते. दहा-दहा दिवस, महिना – महिना साधना करावी लागते. रिपब्लिकन नेत्यांपैकी कुणी इगतपुरीला जाऊन विपश्यना केली असेल तरी तिच्यामध्ये चित्त ओतून ती केली असेल, असे मला वाटत नाही. अन्यथा आज ते ज्या मार्गाने अनुयायांना नेत आहेत, त्या मार्गावर ते गेलेच नसते. या नेत्यांपैकी रा. सु. गवई हे नुकतेच 6 ते 17 सप्टेंबरच्या शिबिरात शिबिरार्थी होते. सौ. कमलाताई रा. गवई यांनी तर आचार्यपद प्राप्त केले आहे. मी स्वत:ला सच्चा बौध्द समजतो. कारण मी विपश्यना करतो. पंचशीलची तत्त्वे मी माझ्या आयुष्यात अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. मी स्वत:ला बौध्द धर्माचा प्रचारक समजतो. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री विलासराव देशमुख अकोल्यात येऊन गेले तेव्हा काही प्रशासकीय अधिकार्‍यांचा विरोध मोडून काढीत मी त्यांना आठाहपूर्वक अकोला जिल्हा कारागृहातील विपश्यना शिबिरात घेऊन गेलो होतो. आज अकोला शहरात बौध्द धर्माचे खरे प्रचारक अनेक आहेत. त्यात श्रीधरजी बजाज आहेत, अकोला कारागृह अधीक्षिका श्रीमती स्वाती साठे आहेत, आमचे मित्र निरंजन रुंगटा, जनार्दन वानखेडे, प्रा. मुकुंद
भारसाकळे, अशोक इंगळे, तायडे, ओईंबे, तेलगोटे अशी कितीतरी मंडळी आहेत.

याउलट बहुतेक रिपब्लिकन नेते काय करीत आहेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांना, विचारांना हरताळ फासण्याचे एकमेव कार्य करीत आहेत. समाजमने जोडण्याऐवजी तोडण्याचे काम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देवाधर्माच्या अवडंबरास आयुष्यभर कडाडून विरोध केला. भगवान गौतम बुध्दांनी मूर्तिपूजेचा विरोध केला. मात्र आजच्या रिपब्लिकन नेत्यांनी डॉ. आंबेडकर व भगवान गौतमबुध्दाचेच अवडंबर माजविले आहे. पुतळ्यांचे राजकारण हा त्यांचा सर्वाधिक आवडता विषय आहे. ब्राह्यणांना शिव्या घालणे हा त्यांचा मुख्य कार्यक्रम असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हे कधीच अभिप्रेत नव्हते. त्यांनी हल्ला चढविला होता तो ब्राह्यणांवर नव्हे तर ब्राह्यणी प्रवृत्तीवर! दुर्दैवाने आज आंबेडकरी चळवळीत ब्राह्यणी प्रवृत्तीची माणसं गोळा झाली आहेत. नुसती गोळाच नव्हे तर वरचढ झाली आहेत. आंबेडकरी जनतेच्या हे ज्या दिवशी ध्यानात येईल तो आंबेडकरी चळवळीचा सुदिन म्हणावा लागेल. माझे हे विश्लेषण अनेकांना रूचणार नाही. माझ्यावर प्रतिगामी असल्याचा आरोप होईल, इतर कोठे मला अडचणीत आणता येत नाही म्हणून या लेखाचे भांडवल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, याची मला पूर्ण जाणीव आहे, तरीही हे धाडस मी करीत आहे. कारण मी आधीच स्पष्ट केले आहे की, मी बौध्द धर्माचा अनुयायी आहे आणि त्यामुळे माझ्या बांधवांना जागृत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो.

— प्रकाश पोहरे

Damit konnte er auch die kettenform von Blog kohlenstoff-kohlenstoff-bindungen vorhersagen

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..