पुराणात प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या त्रिशंकू राजाची कथा आहे. साक्षात सृष्टी नियंत्या ब्रह्याला आव्हान देणाऱ्या या त्रिशंकूची अवस्था अखेर काय झाली हे सगळ््यांनाच माहीत आहे. त्या त्रिशंकूचेच आधुनिक अवतार आता विज्ञानाच्या शिडीचा वापर करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. साक्षात निसर्गालाच आव्हान देण्याची भाषा बोलली जात आहे. केवळ बोललीच जात नसून तसे प्रयत्नही जोरात सुरू आहेत. या प्रयत्नांची अखेर कशात होईल हे सांगता येत नसले तरी एवढे निश्चित म्हणता येईल की, निसर्गाला आव्हान देण्याच्या या प्रयत्नांची मोठी किंमत एक दिवस संपूर्ण सजीवसृष्टीला मोजावी लागणार आहे. निसर्गाच्या अद्भुत नियमांची माहिती गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे, सृष्टीतील विविध क्रियाकल्पांची संगती समजून घेणे आणि त्या माहितीच्या आधारे निसर्गनियमांच्या अधीन राहून मानवी जीवन अधिकाधिक सुगम करणे या मर्यादेपर्यंत विज्ञानाचा विकास राहील तोपर्यंत हे विज्ञान मानवासाठी उपकारकच ठरणार आहे. परंतु विज्ञानाने त्याच्या हाती लागलेल्या सृष्टी रहस्याचा वापर सृष्टी चक्रालाच आव्हान देण्यासाठी करण्यास सुरुवात केली तर मात्र संपूर्ण जीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होणे निश्चित आहे. या सृष्टीची एकूण रचनाच इतक्या गुंतागुंतीची आहे की, जीवचक्रातील कोणत्याही एका साखळीशी छेडछाड केल्यास त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव इतर सर्वच घटकांवर पडणे अनिवार्य आहे. जीव-रसायनशास्त्राने जीवसृष्टीच्या मूलभूत घटकांचा वेध घेताना कोणत्याही सजीवाच्या रचनेची ‘ब्ल्यू प्रिंट’ त्याच्या जनुकात असल्याचे शोधून काढले. या जनुकांच्या अतिशय गुंतागुंतीच्या जाळ््याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. कोणत्या जनुक
/>
चे कार्य कोणते असते हे एक वेळ कळल्यावर त्या विशिष्ट जनुकात आपल्याला हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. विशेषत: वनस्पती आणि त्यातही पिकांच्या संदर्भात या प्रयत्नांना अधिक गती देण्यात आली. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने
शास्त्रज्ञांना त्यातही यश प्राप्त झाले.
या संशोधनाचा वापर निसर्गनियमांच्या अधीन राहून पिकांच्या गुणवत्तेत, त्यांच्या सकसतेत वाढ करण्यासाठी झाला असता तर हे यश सुदैवी म्हणता आले असते; परंतु तसे झाले नाही. हाती आलेल्या अर्धवट ज्ञानाचा वापर करीत संशोधकांनी प्रत्यक्ष सृष्टी नियमांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली. जनुकीय तंत्रज्ञानाची वाटचाल सध्या ज्या दिशेने सुरू आहे ते पाहता हे आधुनिक परमेश्वर एका नव्या सृष्टीची रचना तर करू पाहत नाही ना, अशी शंका येते. वास्तविक निसर्गाची रचनाच इतकी कुशल आणि निर्दोष आहे की, त्या रचनेत क्षुल्लकसाही दोष नाही आणि त्यामुळेच त्या रचनेत बदलालाही वाव नाही. एखादे फळ एखाद्या विशिष्ट ऋतूत येत असेल तर त्या ऋतूतच ते फळ आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. इतर मोसमात त्या फळाचे सेवन अहितकारकच असते. विशिष्ट वातावरणात, विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीत तेथील सजीवसृष्टीला जगण्यासाठी आणि आपला विकास घडवून आणण्यासाठी ज्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात त्यांची तजवीज निसर्गाने त्याच परिसरात केलेली असते. त्यामुळे आहार, राहणीमान, सवयी आदींचा विचार केल्यास या गोष्टी निसर्गाला पूरकच असायला पाहिजे. यासंदर्भात आपल्या पूर्वजांनी निश्चितच सखोल अभ्यास केलेला होता. त्यांनी घालून दिलेले प्रत्येक नियम, संकेत मानवाला कुठेतरी नैसर्गिक संतुलनाशी जोडणारे होते. आपल्या आहारातल्या परंपरेने चालत येणाऱ्या विविध पदार्थांचे महत्त्व समजून घेतल्यास ही बाब चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. आपला आहार षड्रसाने युक्त असावा अ
ा संकेत आहे. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असलेले सर्वच अन्नघटक त्यामुळे पुरेशा प्रमाणात शरीराला मिळतात. साधी भाजीला फोडणी देण्याची बाब असली तरी त्यासाठी वापरला जाणाऱ्या पदार्थांचे विविध गुण तरी किती उपयुक्त आहेत हे दिसून येईल. हळदीचे औषधी गुण सर्वांनाच माहीत आहेत. माफक प्रमाणातील तिखटाचे किंवा मिरचीचे सेवन हृदयरोगापासून बचाव करू शकते. जिरे, मोहरी हे पदार्थदेखील भाजीची लज्जत वाढविण्यासोबतच शरीरासाठी औषध म्हणूनही काम करतात. कारले मधुमेहावर रामबाण उपाय ठरू शकते. अशा विविध पदार्थांच्या विशिष्ट प्रमाणातील सेवनाने शरीर आरोग्य चांगले राहू शकते; परंतु आता आपण निसर्गाशी साधलेले संतुलन मोडत निसर्गालाच आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहोत. पर्यावरणाशी, ऋतुमानानुसार होणाऱ्या नैसर्गिक बदलाशी सुसंगत जीवनशैली आम्हांला जुनाट वाटू लागली आहे. आमच्या या आधुनिक विचारसरणीला विज्ञान-तंत्रज्ञानानेही भरपूर खतपाणी घातले आहे. आता फळांचा कोणताही असा मोसम राहिलेला नाही. सगळी फळे, सगळ््या भाज्या आता बारमाही झालेल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच या फळ आणि भाज्यातील सकसता संपुष्टात येत आहे. आता तर जनुकीय तंत्रज्ञानाने पारंपरिक पिकांनाही आव्हान दिले आहे. कृषी उत्पादनवाढीची गरज दाखवून विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाने प्रत्यक्षात प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा वेडा प्रयत्न चालविलेला आहे. बियांमधील जनुकात बदल करून अधिक उत्पादन देणारे बियाणे विकसित करण्यात आली आहेत. निसर्गाने निश्चित केलेली त्या बियाण्यांमधील जनुकांची रचना आधुनिक मानवाला मान्य नाही. त्यांच्यामते, यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे या जनुकांची रचना करता आली असती आणि ती त्यांनी करून देखील दाखविली. याचा अर्थ नैसर्गिक संरचनेत काही दोष होता किंवा विकासाला वाव होता असाच करावा लागेल; प r />
ंतु तसे नाही. नैसर्गिक संरचनेत काडीमात्रही दोष नाही आणि असा दोष नसल्यामुळे विकासालाही कुठलाच वाव नाही. कालांतराने हे सिद्ध होईलच. खरेतर ते आताच सिद्ध होऊ पाहत आहे. जनुकीय बियाण्यांचे विपरीत परिणाम आताच समोर येत आहे. या बियाण्यांमुळे केवळ उत्पादनाची सकसता आणि गुणवत्ताच प्रभावित झाली नसून पिकांशी संबंध नसलेल्या अनेक गोष्टीसाठी ही बियाणे घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे. जनुकीय संशोधन योग्य दिशेने आणि योग्य मर्यादेत झाले असते तर त्याचा कुठलाही विपरीत परिणाम दिसून आला नसता. झाडाची ओळख फळावरून होते. फळ म्हणजे त्या झाडाची अंतिम निष्पत्ती
असते. जनुकीय तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बियाण्यांची अंतिम निष्पत्ती जीवसृष्टीला हानिकारक
ठरत असेल तर त्या तंत्रज्ञानाने आपल्या मर्यादा ओलांडल्या असेच म्हणावे लागेल. निसर्गाला आव्हान देण्याचा अजून एक प्रयत्न फसवा ठरला, असाच निष्कर्ष काढावा लागेल. परंतु आजही जनुकीय तंत्रज्ञानाचा जोमाने प्रसार सुरू आहे. एक फसलेल्या आणि जीवसृष्टीच्याच मुळावर उठलेल्या तंत्रज्ञानाचा वापर सुरूच राहत असेल तर या तंत्रज्ञानाच्या उद्देशांची चिकित्सा करणे भाग आहे. जनुकीय तंत्रज्ञानाचे सगळे प्रयोग भारतासारख्या विकसनशील देशांत राबविण्यात येत आहेत. या तंत्रज्ञानाने पिकातील, फळातील, भाज्यातील सकसता संपविण्यासोबतच पारंपरिक बियाण्यांना संपविण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत. अन्नधान्याच्या मूळ गुणधर्मात बदल घडवून आणले जात आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. आजाराचे प्रमाण वाढत आहे. कधीकधी अशी शंका येते की, या जनुकीय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी औषधी कंपन्या तर पैसा पुरवत नसाव्यात? कारण या तंत्रज्ञानाने बाकी काही पदरात पडले नसले तरी अनेक आजारांची देणगी मानवाला जरूर मिळाली आहे. मानवाचे सरासरी वय कमी
करण्याचे श्रेय याच आधुनिक शेती पद्धतीला जाते. जनुकीय तंत्रज्ञानाने विकसित बियाण्यांमुळे निसर्गाचे अतिशय सूक्ष्म आणि कधीही भरून न निघणारे नुकसान होत असल्याची माहिती ‘जीएम कंटॅमिनेशन रिपोर्ट 2005’ या अहवालात देण्यात आली आहे. थोडक्यात, नैसर्गिक संरचनेला आव्हान देऊन मानवाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. या घातक तंत्रज्ञानातील धोके वेळीच ओळखले नाही तर भविष्यात आपल्या सगळ््यांचीच अवस्था त्रिशंकूसारखी होईल. विषयुक्त अन्न आपल्याला जगू देणार नाही आणि विविध औषधांचा मारा आपल्याला सुखाने मरूही देणार नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply