नवीन लेखन...

वृथा अट्ठहास!




प्रकाशन दिनांक :- 21/11/2004

असे म्हणतात की, विश्वातील जेवढ्या काही गोष्टी शक्यतेच्या कोटीतील आहेत त्या सर्व साध्य करणे मानवी मेंदूला शक्य आहे. सर्वसाधारण जीवन जगणारा माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यात मेंदूच्या केवळ 20 टक्के क्षमतेचा वत्र्र.उपयोग करतो, हे वैज्ञानिक पाहणीतून सिद्ध झाले आहे. ज्यांची प्रतिभा, बुद्धिमत्ता अलौकिक गणल्या गेली आहे अशी माणसे 30 किंवा 40 टक्के मेंदूचा वापर करत असतील. याचाच अर्थ आपल्या एकूण क्षमतेच्या 60 ते 70 टक्के क्षमता आपण वापरतच नाही. केवळ 30 ते 40 टक्के बुद्धीच्या भांडवलावर जर आज माणूस चंद्र-मंगळापर्यंत पोहचला असेल तर या माणसाने आपला मेंदू संपूर्ण क्षमतेने वापरला तर त्याच्यासाठी अशक्य असे काहीच उरणार नाही. मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केल्या जाऊ शकतो. तसा प्रयत्न कोणी करत नाही हा भाग वेगळा; परंतु व्यावहारिक जीवनात आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात इतरांच्या तुलनेत बरीच प्रगत किंवा पुढारलेली असते. त्याचवेळी इतर क्षेत्रात मात्र ती व्यक्ती अगदीच सर्वसाधारण असते. याचाच अर्थ त्या व्यक्तीच्या मेंदूतील एखाद्या केंद्राचा अधिक विकास झालेला असतो.मग ती व्यक्ती थोर गणितज्ज्ञ, वैज्ञानिक, साहित्यिक, तत्त्वज्ञानी म्हणून ओळखली जाते. अशा वेळी त्या व्यक्तीच्या इतर क्षमताही तेवढ्याच प्रगत असतील असे नाही. बरेचदा तर असे आढळून आले आहे की, वैज्ञानिक किंवा गणिती म्हणून मोठे नाव कमाविणाऱ्या व्यक्ती व्यावहारिक जीवनात अतिशय सामान्य असतात. या संदर्भात थोर वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटनचे उदाहरण नेहमीच सांगितले जाते. न्यूटनकडे त्याची एक लाडकी मांजर होती. ही मांजर त्याच्या अभ्यासिकेतच असायची आणि सारखी आत-बाहेर करायची. तिच्या या सारख्या आत-बाहेर करण्याने बरेचदा अभ्यासात मग्न असलेल्या न्
ूटनची एकाठाता भंग व्हायची. त्यावर काय उपाय करावा याचा न्यूटनने खूप विचार

केला. त्यातच मांजरीला एक पिलू

झाले. आता तर त्रास दुप्पट वाढला. शेवटी काही तरी उपाय केलाच पाहिजे, असे न्यूटनने ठरविले. या माय-लेकांच्या आत-बाहेर करण्याने न्यूटनला सतत दार उघडावे आणि बंद करावे लागायचे. शेवटी न्युटनने शक्कल लढविली आणि मुख्य दारालाच दोन, एक लहान आणि एक मोठे असे छिद्र पाडले. न्यूटनचे परिचित गृहस्थ एकदा भेटायला आले असता त्यांना हा विचित्र प्रकार दिसला. मुख्य दाराला अशी छिद्रे का पाडली, असे त्यांनी न्यूटनला विचारले असता न्यूटनने आपण मांजरीच्या त्रासापासून किती अक्कलहुशारीने आपली सुटका करून घेतली याचे साठासंगीत वर्णन त्यांना ऐकविले. मोठ्या छिद्राचे कारण तर कळले, परंतु लहान छिद्राची काय आवश्यकता होती, असे त्या गृहस्थाने विचारल्यावर गुरुत्वाकर्षणाचा जगप्रसिद्ध सिद्धान्त मांडणाऱ्या, गतीविषयक नियमांनी आपले नाव अजरामर करणाऱ्या त्या महान वैज्ञानिकाने दिलेले उत्तर अतिशय मासलेवाईक होते. त्या गृहस्थाच्या बुद्धीची कीव करीत न्यूटन म्हणाले की, अहो इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळू नये याचे मला आश्चर्यच वाटते. ते मोठे छिद्र आहे मांजरीसाठी आणि बाजूला लहान छिद्र आहे ते पिलासाठी. ज्या छिद्रातून मांजर आत-बाहेर करू शकते त्याच छिद्रातून तिचे पिलू जाऊ शकणार नाही का, असा विचार करीत त्या गृहस्थाने आपले डोके खाजविले आणि न्यूटनच्या नादाला लागण्यात अर्थ नाही, असे म्हणत घरचा रस्ता धरला. अतिशय साधे उदाहरण आहे; परंतु न्यूटनसारख्या प्रकांड बुद्धीच्या वैज्ञानिकाचे सामान्य ज्ञानही किती सामान्य असू शकते हे या उदाहरणाने स्पष्ट होते. सांगायचे तात्पर्य, मानवी मेंदूतील एखाद्या क्षमतेचा तुलनेत अधिक विकास झाला तरी उर्वरित मेंदूचा विकास मात्र अगदीच सर्वसामान्य असतो. ही बाब सग
्यांनीच लक्षात घेण्यासारखी आहे.
प्रत्येकाला आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते हे माहीत असते. अर्थात जे क्षेत्र आवडीचे असते त्याच क्षेत्रात आपल्या मेंदूच्या विकासाला, पर्यायाने आपल्या क्षमतेच्या विकासाला अधिक वाव असतो. अशा वेळी त्याच क्षेत्रावर आपले लक्ष अधिक केंद्रित करून आपण आपला अधिक विकास करून घ्यायला पाहिजे; परंतु सहसा असे आढळून येत नाही. एकाच वेळी अनेक क्षेत्रात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात सर्वसाधारण व्यक्ती कोणत्याच मुक्कामावर पोहचत नाही. अगदी व्यावहारिक उदाहरण घ्यायचे झाल्यास साध्या बांधकामाचे घेता येईल. एखाद्याला घर बांधायचे असते आणि आपल्याला त्यातलं सगळं कळतं अशा आविर्भावात तो घर बांधायला निघतो. बरेचदा ज्या गोष्टी आपल्याला कळतात त्यासाठी वास्तुविशारदाला पैसे का द्यायचे असा व्यावहारिक दृष्टिकोनसुद्धा त्यात असतो; परंतु होते काय तर शेवटी काही तरी वेडेवाकडे बांधकाम होते आणि अखेर बरेचदा पूर्ण बांधलेल्या घरात पुन्हा तोडफोड करण्याची पाळी येते. चार पैसे वाचविण्यासाठी 40 रुपये खर्च करण्याचा हा वृथा अट्टहास केवळ आपल्याविषयीच्या चुकीच्या मूल्यमापनामुळे केला जातो. वास्तुविशारद म्हणजे घरबांधणी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतो. पायऱ्यांची उंची किती असावी इथपासून तर जिन्याचा उतार किती असावा इथपर्यंत बारीकसारीक गोष्टींचे त्याला ज्ञान असते. त्याला द्यावे लागणारे 2 ते 4 टक्के पैसे वाचविण्याच्या नादात आपल्यापेक्षा कितीतरी सरस असलेल्या त्याच्या ज्ञानापासून आपण वंचित राहतो आणि पुढे वाचविलेल्या पैशाच्या कितीतरी अधिक पैसा आपल्याला खर्च करावा लागतो. अशीच इतरही अनेक उदाहरणे आपल्याला समाजात ठायी-ठायी पहायला मिळतात. एखादा चांगला साहित्यिक साहित्याच्या क्षेत्रात अधिक पुढची मजल मारण्याचे सोडून व्यावहारिक गणिता
त आपले घोडे दामटविण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी तोंडघशी पडतो. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टराला राजकारणात शिरायची दुर्बुद्धी होते.सिमेंट काँक्रिटच्या दुनियेत मास्टरकी असलेला वास्तुविशारद कथा-कवितेच्या प्रेमात पडतो, तर जन्मजात राजकारणी बुद्धी असलेली एखादी व्यक्ती किराणा मालाचे दुकान उघडून बसते. या सगळ्या गोंधळामुळेच योग्य क्षेत्रात योग्य व्यक्तींची आपल्याला सतत उणीव भासत असते. ज्यांनी राजकारण करावे अशी माणसे

कुठल्यातरी दुसऱ्याच क्षेत्रात आपली बुद्धी झिजवत असतात आणि ज्यांचा राजकीय

वकुब अगदीच शून्य आहे अशी माणसे सत्तेचा गाडा हाकताना दिसतात. हा प्रकार टाळायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला सर्वच क्षेत्रात सारखे ज्ञान आहे हा वृथा अहंकार माणसाने दूर सारायला हवा. ज्या क्षेत्रातले आपल्याला काही कळत नाही अशा क्षेत्रात उगाच तोंड मारण्याचा कोणी प्रयत्न करू नये.
साहित्यिकांनी साहित्याचीच सेवा करावी, वैज्ञानिक-संशोधकांनी त्याच क्षेत्रात आपली बुद्धी चालवावी, मास्तर- प्राध्यापक या शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी राजकारणात पडून स्वत:चा आणि समाजाचाही सत्यानाश करू नये. सगळ्यांनी आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार आपल्या कार्याचे क्षेत्र निश्चित केले तर समाजासमोरील अर्ध्या अधिक समस्या तशाच दूर होतील. आज तरी परिस्थिती अशीच आहे की, जवळपास प्रत्येक क्षेत्रात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या व्यक्तींचेच वर्चस्व दिसून येते. आपल्या बुद्धीचा सर्वांगीण विकास झाला आहे आणि त्यामुळे आपण लाथ मारू तिथे पाणी काढू शकतो, असे वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा लोकांच्या भाऊगर्दीत त्या-त्या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने तज्ज्ञ असलेल्या लोकांची मात्र प्रचंड घुसमट होत आहे. सुताराच्या हातात वस्तरा दिल्यावर जे काही होईल तेच सध्या समाजाचे आणि देशाचे ह
ोत आहे. हे हाल थांबवायचे असतील तर प्रत्येकाची आवड आणि क्षमता तपासून त्याला त्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळण्याची व्यवस्था उभी करायला हवी. चित्रकलेत गती असलेल्या विद्यार्थ्यावर गणिताची बोजड समीकरणे लादण्याचा प्रकार आता थांबवायला पाहिजे. गणितातील आकड्यांच्या दुनियेत रममाण होऊ पाहणाऱ्याला इतिहासातील युद्धाच्या भूमीवर पाठविणे योग्य ठरणार नाही. प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची एक क्षमता असते. ही क्षमता ओळखून त्याच क्षेत्रात त्याला विकासाची पुरेशी संधी उपलब्ध करून देणे हेच त्या व्यक्तीचे खरे शिक्षण ठरते. मात्र आपल्याकडील व्यवस्थेने ‘व्र्ीम्प् दि र्ीत्त् ूीर्ी्ो ंल्ू स्र्ीेूी दि हदहा’ अशा शिक्षितांच्या फौजा उभ्या केल्या आहेत. प्रत्यक्ष लढाईच्या मैदानावर या फौजा कुचकामी ठरतात. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की, ज्याचे काम त्याने करावे, हा साधा संकेतही आपण पाळला तर समाज आणि देशासाठी आपण खूप काही करू शकतो.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..