नवीन लेखन...

वृद्धाश्रमाऐवजी ज्ञानमंदिरे उभारा!

विज्ञानात एक नियम आहे, बहुतेक न्यूटनने प्रतिपादित केलेला असावा. एखादे कार्य करताना जेवढे बल आपण लावतो तेवढेच त्या कार्याला विरोध करणारे बल, कार्य ज्या वस्तूवर होत आहे त्या वस्तूत निर्माण होते. विपरीत दिशेने कार्य करणारा हा बलाचा नियम केवळ भौतिक विज्ञानापुरताच मर्यादित नसावा. समाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही. वैज्ञानिक प्रगतीची, भौतिक सुख-सुविधांची किंमत चुकविताना आपण बळी दिला आहे तो आपल्या जीवनमूल्यांचा. आपल्या देशात तर हे प्रकर्षाने जाणवते कारण हा देश परंपरांचा आणि मूल्यांचा देश म्हणून ओळखला जायचा. आपल्या देशाची ती वैशिष्ट्यपूर्ण ओळख आज साफ पुसली गेली आहे. तुटपुंज्या वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारावर समृध्द परंपरेला आव्हान देण्याचा, सर्वश्रेष्ठ मूल्यांची चिरफाड करण्याचा प्रयत्न एका सुनियोजित कटाच्या आधारे केल्या जात आहे आणि दुर्दैवाने आज तो प्रयत्न यशस्वी होत असल्याचेही दिसत आहे. विश्वातील प्रत्येक घडामोड, प्रत्येक घटना विज्ञानाच्या नियमांशी बांधील असते, हे मान्य करण्यास हरकत नाही. किंबहुना तेच एक सत्य आहे. या सत्याला नाकारुन कोणताच नियम सिध्द होऊ शकत नाही आणि त्याचमुळे या सत्याशी फारकत घेणारी कोणतीही प्रथा, कोणतीही परंपरा अल्पजीवी ठरत असते. या पार्श्वभूमीवर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आपल्या परंपरांमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. परंतु त्या दिशेने फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. केवळ वरवरच्या उथळ निरीक्षणावरून परंपरांना झोडपण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे आणि याला कारणीभूत आहे ती मेकॉलेच्या कृपेने आंग्लाळलेली आपली बुध्दी. आपल्या पूर्वजांनी वैज्ञानिक नियमांशी सांगड घालून आपले भौतिक तसेच आध्यात्मिक जीवन समृध्द करणलार्‍या परंपरा निर्माण केल्या. या परंपरांच्या संगतीने जीवनमूल्ये विकसित केली. वरकरणी अतिशय साध्या वाटणार्‍या कृतीतूनही या श्रेष्ठ जीवनमूल्यांचा परिचय आपल्याला होऊ शकतो. लहानांनी मोठ्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करण्याची पध्दत आपल्याकडे आहे (?). अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या आजकालच्या तरुणांना ही पध्दत अपमानास्पद वाटते. परंतु त्यामागचे विज्ञान असे आहे की मोठ्या, वडिलधार्‍या माणसांनी अनुभवातून, उपासनेतून प्राप्त केलेली ऊर्जा त्यांच्या शरीरात साठवलेली असते. या ऊर्जेचा एक प्रकारचा प्रभार त्यांच्यावर निर्माण झालेला असतो. ज्याप्रमाणे विद्युत प्रभारित वस्तूजवळ एखादी दुसरी विद्युतवाहक वस्तू नेल्यास विद्युत प्रभारित वस्तूतील विद्युत त्या दुसर्‍या वस्तूत स्थानांतरित होते, नेमकी हीच क्रिया चरणस्पर्श करुन केलेल्या नमस्कारातसुध्दा घडते. विद्युत प्रभारित वस्तूच्या टोकांवर ही विद्युत अधिक प्रमाणात एकत्रित होत असते. हा नियम केवळ पायांच्या बोटांना हातांच्या बोटांनी स्पर्श करण्याच्या प्रथेशी सांगड घालणारा नाही का? परंतु हे समजून घेण्याची तयारी असायला हवी. राजसभा असो वा ठाामसभा, पूर्व प्रत्येक सभेत वृध्दांची उपस्थिती अनिवार्य मानली जायची. वृध्दांशिवाय सभेला शोभा नाही, अशा अर्थाचे एक वचनच प्रचलित आहे. यामागचे कारण एवढेच की वृध्दांना त्याकाळी तपस्व्याचे स्थान असायचे, त्यांना सर्वत्र मान असायचा. हा मान केवळ वयाला नसायचा, वयाच्या अनुषंगाने येणार्‍या ज्ञानाला, अनुभवातून अर्जित केलेल्या परिपक्वतेला असायचा. 80 वर्षाचा वृध्द एखाद्या तरुणाला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगत असेल तर त्या तरुणाने त्या गोष्टी ग्रहण करून आपल्या आयुष्यातील बर्‍याच वर्षांची बचत करायची असते. शंभर मैल गेल्यावर काय आहे, हे शून्य मैलावर कोणी सांगत असेल तर शंभर मैल चालून जाण्याची दगदग वाचली असे समजून ती शक्ती इतर योग्य कारणासाठी वापरणे अधिक श्रेयस्कर नव्हे काय? परंतु आयुष्याच्या भट्टीत तावून-सुलाखून निघालेल्या, परिस्थितीच्या चटक्याने केस पांढरे झालेल्या वृध्दांना तपस्वी म्हणून गौरविण्याऐवजी आपण म्हातारे म्हणून हिणवू लागलो आणि आपल्या अध:पतनास सुरूवात झाली. आज या वृध्द-तपस्व्यांची आम्हाला अडचण होत आहे. समाजात सन्मानाचे काय कुठलेच स्थान त्यांना नाही. समाजात तर फार दूर राहिले घरातील लोकांनासुध्दा त्यांची अडचण होऊ लागली. ठिकठिकाणी दिमाखाने उभे होत असलेले वृध्दाश्रम आपल्या सामाजिक संवेदनाचे प्रतीक नसून आपल्यातल्या माणुसकीच्या, सारासार विवेकाच्या मुडद्यावर बांधलेले थडगे आहेत. केवळ वृध्दांप्रति आपली संवेदना बोथट होत आहे असे नाही तर एकूणच आपण संवेदनाहीन झालो आहोत. आपली जीवनमूल्ये बदलली आहेत. पिढी दर पिढी आत्मकेंद्रितपणा वाढतच चालला आहे. वृध्द आई-वडील मुलांसाठी ज्या समाजात ओझे ठरत असतील त्या समाजाने स्वत:ला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार गमावला आहे, असेच म्हणावे लागेल आणि हे असे का घडत आहे, तर त्याला कारण आहे, शिक्षणाच्या नावाखाली उमलत्या पिढीची सुरू असलेली दिशाभूल. मेकॉलेप्रणीत या शिक्षणपध्दतीत मुलांचा विकास केवळ हे असे का? हे विचारण्यापुरताच मर्यादित होतो. त्या ‘का?’ मागची उत्तरे शोधण्याची बौध्दिक कुवत आणि मानसिकता पध्दतशीरपणे छाटल्या जात आहे. आईवडिलांनी केवळ जन्म दिला म्हणून आम्ही त्यांचा आदर का करावा? असले मूर्ख आणि आई-वडिलांच्या प्रेमाची क्रूर चेष्टा करणारे प्रश्न आजकालच्या पिढीकडून विचारल्या जात आहेत. श्रावणबाळाची मातृ-पितृभक्ती चेष्टेचा विषय ठरत आहे आणि तो ठरणारच. कारण शिकण्यासाठी मनाची कोरी पाटी घेऊन शाळेत दाखल झालेल्या मुलाच्या पाटीवर शिक्षण संपल्यानंतर संस्कृती, पंरपरा या सर्व भंकस गोष्टी आहेत. खा – प्या आणि मजा करा हेच खरे जीवन आहे, असले धडे अंकित झाले असतील तर चूक त्या मुलाची आहे, असे कसे म्हणता येईल? या सगळ्या गोष्टींचे प्रतिबिंब प्रचलित समाज व्यवस्थेत दिसून येते. सध्याचे युग विज्ञानाच्या भाषेत ‘हाय-टेक’चे आहे. यंत्राची तंत्रे खूप विकसित झाली परंतु वागणुकीचे तंत्र मात्र पार बदलले. विकास एकांगी होऊ लागला. वृध्दाश्रमे हे त्याचे प्रतीक आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. वैज्ञानिक विकासाची कास धरताना तितक्याच उपयुक्त असलेल्या संस्कृती आणि परंपरांशी जुळलेली नाळ तुटू नये. यासाठी शिक्षणपध्दतीत आमूलाठा बदल करावा लागेल. संगणकाशी खेळणारे चिमुकले हात संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर शुभंकरोतीसाठी जोडल्या गेले पाहिजे. वृध्दाश्रम नव्हे तर या वृध्दांच्या ज्ञानाचा वारसा पुढच्या पिढीला देणारी ज्ञानमंदिरे उभी राहिली पाहिजे. परंपरेमागची शास्त्रीयता नीट समजून घेऊन विस्कटलेल्या, भरकटलेल्या समाजाची पुनर्स्थापना झाली पाहिजे. हे सगळं अगदी सहज होऊ शकते, त्यासाठी फार मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता नाही, फक्त प्रत्येकाने स्वत: या दिशेने प्रयत्न करायला हवा.

— प्रकाश पोहरे

Ergo, apple spy ware with phone in hand has redefined the denotation of what high-definition means to us

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..