नवीन लेखन...

वेळ हीच खरी संपत्त्ती !





विसाव्या शतकात बदलाचा वेग झपाट्याने वाढला. आता 21 व्या शतकात तर हा वेग आपल्या अत्युच्च पातळीवर पोहोचला आहे. इथे ‘बदल’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरलेला आहे. हा बदल केवळ राहणीमानातला नसून एकूणच वैचारिक, बौद्धिक, पर्यावरणीय तसेच जीवसृष्टीला संपूर्णपणे कवेत घेणारा आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक मूल्य, प्रत्येक संदर्भ अतिशय झपाट्याने बदलत आहे. काल ज्या गोष्टी उपयुक्त होत्या त्या आज राहतीलच असे नाही. आजची कौतुकाची बाब उद्या अगदीच सामान्य होऊन जाईल. माणूस प्रथम चंद्रावर गेला, त्याला 50 वर्षेही झाली नाहीत. त्यावेळी माणसाच्या चंद्रावरील पहिल्या पावलाचे कोण कौतुक झाले होते. शतकातीलच नव्हे तर सहस्त्रकातील उपलब्धी म्हणून त्या घटनेचे वर्णन केल्या गेले. त्यानंतर अवघ्या 30-40 वर्षातच माणसाचे अंतराळातील विचरण एक सामान्य बाब बनली. आता तर अंतराळात माणसाने कायमस्वरूपी स्थानक उभारले आहे. अंतराळयान अगदी बसफेऱ्या कराव्या त्या थाटात या स्थानकाला भेट देऊन परतत असतात. पृथ्वी ते चंद्र या प्रवासासाठी नियमित स्वरूपाची स्पेस शटल योजना सुरू करण्याचे घाटत आहे. लवकरच ही चंद्रवारी सुरू होईल यात शंका नाही. सांगायचे तात्पर्य भौतिकी विज्ञानाच्या प्रचंड वेगाने प्रगतीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत. केवळ प्रगतीच्याच नव्हे तर इतरही अनेक बाबींच्या व्याख्या बदलल्या आहेत. या पृष्ठभूमीवर मनुष्यासाठी सर्वाधिक मोलाची संपत्ती ठरणार आहे, तो मनुष्याला उपलब्ध असलेला वेळ. या जगाला विनाशाचा शाप जन्मापासूनच लागलेला आहे. आपल्या विश्वाची निर्मिती शून्यातून झाली आणि या प्रवासाचा शेवटही शून्यातच होणार आहे. जे जे अस्तित्वात आहे ते ते नामशेष होणार आहे. अगदी कोट्यावधी वर्षापासून आकाशात तळपणारा सूर्यही एक दिवस निस्तेज बनून संपणार आहे. पृथ्वीतलावरील पेट्रोलियम पदार्थांचे सा

ठे संपण्याची भीती तर अगदी उंबरठ्याशी येऊन ठेपली आहे. कदाचित एक दिवस पृथ्वीच्या पाठीवर

गवताचे पातेही उरणार नाही, काहीही होऊ

शकते, काहीही संपू शकते. सगळ्याच वस्तूमात्रांना ऱ्हासाची भीती आहे. वापरले की संपणार, हा नियमच आहे. या नियमाला अपवाद आहे तो केवळ मानवी बुद्धीचा किंवा मेंदूच्या विकासाचा. डायनासोरसारखे महाकाय प्राणी पृथ्वीतलावरून नष्ट झाले ते केवळ बदलत्या पर्यावरणाशी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरले म्हणूनच. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी बुद्धीची जी प्रगल्भता लागते ती त्या डायनासोरकडे नव्हती. हे वरदान केवळ मनुष्यप्राण्याला लाभले आहे. माणसाच्या कवटीतला मेंदू हीच माणसाची सर्वात मोठी संपदा आहे. त्यामुळे निसर्गात, पर्यावरणात कितीही बदल झाला तरी मनुष्यजात जगाच्या पाठीवरून नामशेष होण्याची शक्यता फार कमी आहे. जीवसृष्टीतील नष्ट होणारा सगळ्यात शेवटचा प्राणी मनुष्यच असेल. आपल्या बुद्धीच्या जोरावर परिस्थितीशी अनुकूलता साधण्याची मनुष्याची क्षमता प्रत्यक्ष निसर्गाला आव्हान देण्याइतकी विलक्षण आहे. अशा परिस्थितीत भविष्यात मनुष्याची बौद्धिक संपदा हीच त्याची खरी संपत्ती ठरणार आहे. एखाद्याकडे किती पैसा आहे किंवा सुखसोईची किती भौतिक साधने त्याच्याकडे उपलब्ध आहेत यापेक्षा त्याची बौद्धिक कुवत किती आहे यावरच त्याची श्रीमंती ठरण्याचे दिवस दूर नाहीत. तसेही पाहिले तर शरीरसंपदा आणि बुद्धी हीच मनुष्याची निसर्गदत्त किंवा ज्याला आपण पायाभूत म्हणू शकू अशी श्रीमंती आहे. शरीर तंदुरुस्त नसेल, रोगट असेल, अपंग असेल किंवा मेंदूचा विकास नीट झालेला नसेल तर अशा माणसाकडे प्रचंड पैसा किंवा श्रीमंती असूनही त्याचा उपयोग शून्यच ठरतो. उलट शरीराने तंदुरुस्त आणि बुद्धीने तरतरीत असलेला माणूस अगदी शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो. या दोन मू
लभूत संपदांसोबतच आता बदलत्या काळानुसार संपत्तीचा एक तिसराही आयाम जोडल्या गेला आहे आणि तो म्हणजे आपल्याजवळ उपलब्ध असलेला वेळ. आज वेळ ही देखील अमूल्य संपदा समजली जात आहे आणि दिवसेंदिवस या संपदेचे मूल्य वाढतच जाणार आहे. एकेकाळी शंभर-सव्वाशे वर्षाचे असलेले सरासरी आयुष्यमान आज 60-70 वर घसरले आहे. परंतु हा बदल लक्षात न घेता शंभर वर्षाचे आयुष्य गृहीत धरून निर्धारित केलेला परिपाठ आजही अवलंबिल्या जातो. आजही सुरुवातीची 25 ते 30 वर्षे केवळ शिकण्याचे वय समजले जाते. त्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा किंवा आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न केल्या जातो. तोपर्यंत अर्धे आयुष्य संपलेले असते. आयुष्याच्या शेवटची 10-15 वर्षे तशीही निरुपयोगीच असतात. वार्धक्याच्या त्या काळात माणसाजवळ समाजाला, देशाला देण्यासारखे काही नसते. खरे तर या काळात तो परावलंबी आयुष्यच जगत असतो. नाही म्हणायला त्याच्याजवळ विचारांची, अनुभवांची शिदोरी असते. परंतु हे विचार किवा अनुभव त्याने ज्या काळात ठाहण केलेले असतात तो काळ संदर्भ बदलल्यामुळे अगदीच टाकाऊ झालेला असतो. 25-30 वर्षापूर्वीचे ज्ञान अगदीच जुने झालेले असते. सांगायचे तात्पर्य सरासरी 60-70 वर्षांच्या आयुष्यातील शेवटची आणि सुरुवातीची मिळून जवळपास 20 वर्षे तशी काही कामाची नसतात. राहिलेल्या 40-50 वर्षात माणसाला आपले संपूर्ण आयुष्य सार्थकी लावण्याचे प्रयत्न करायचे असतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा माणसाला प्रत्येक मिनिटाचे, प्रत्येक सेकंदाचे मूल्य कळायला लागेल. दुर्दैवाने आपल्या भारतात तरी ही जाणीव असलेल्यांची संख्या अतिशय कमी आहे. बौद्धिक संपदा हीच राष्ट्राची खरी संपदा असते, भारत गरीब असण्याला ही बाबदेखील कारणीभूत आहे. भारताची लोकसंख्या प्रचंड असली तरी वेळेची, शिस्तीची आणि बुद्धीच्या उपयुक्ततेची जाणीव असणाऱ्यांची संख्या अगदी
कमी असल्यामुळे क्षमता असूनही भारत विकसित राष्ट्रांच्या पंगतीत बसू शकलेला नाही. असे म्हटले जाते की, माणसाला माणसाची दु:खे असावीत, भूक हे जनावरांचे दु:ख आहे, परंतु दुर्दैवाने भारतातील बहुसंख्य लोकांचे दु:ख त्यांच्या भूकेशी संलग्न आहे. यासाठी कारणे काहीही असोत, परंतु प्रचंड प्रमाणातील लोकसंख्येची बौद्धिक क्षमता आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यातच संपत असते, ही भारतातील

खेदजनक वस्तुस्थिती आहे. ज्यांच्या प्राथमिक गरजा सहज पूर्ण होतात, ज्यांना पोटापाण्याची

फारशी काळजी नाही असे लोक आपली बुद्धी आणि उपलब्ध असलेला वेळ अक्षरश: वाया घालवत असतात. ज्यांना रोजीरोटीच्या प्रश्नातून बाहेर पडायला वेळ नाही, त्यांची बौद्धिक संपदा आणि ज्यांना वेळ आहे परंतु वेळेचा सदुपयोग कसा करावा याची जाणीव नाही त्यांची बौद्धिक संपदा, या एकूण वाया जाणाऱ्या किंवा उपयोगात न येणाऱ्या बौद्धिक संपदेचा विचार केल्यास आपणच आपल्या देशाचे किती प्रचंड नुकसान करीत आहोत, याची कल्पना करू शकतो. वेळेचे महत्त्व ज्यांना कळले त्यांनीच प्रगतीचे शिखर गाठले. जपानमध्ये रस्त्यावर दोन माणसे बोलत आहेत असे चित्र आपल्याला कधीही दिसणार नाही. विनाकारण बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तेवढाच वेळ मी कारखान्यात काम केल्यास उत्पादन वाढेल, त्याचा राष्ट्राला फायदा होईल, असा विचार जपानी माणूस करीत असतो. वेळेचे हे भान त्या लोकांमध्ये आहे, म्हणूनच दुसऱ्या महायुद्धात बेचिराख होऊनही आज जपान एक प्रगत राष्ट्र म्हणून उभा राहू शकला. आमच्याकडे परिस्थिती अगदीच विपरीत आहे. रिकाम्या वेळेत काम करण्याचे, काही शिकण्याचे, ज्ञान मिळविण्याचे दूर राहिले, उलट कामाच्या वेळेतच रिकाम्या चकाट्या कशा पिटता येतील, याचाच आम्ही विचार करीत असतो. पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी सुटी आहे, यावर आमचे बारीक लक्ष असते. एखादी सु
ी ऐनवेळी रद्द झाली तर आम्ही प्रचंड शिव्याशाप देतो. सुट्या लागून आल्यास आम्हाला कोण आनंद होतो. ही जी मानसिकता आहे ती जगाच्या बदलत्या आणि वेगवान गतीशी मेळ खाणारी नाही. जगाच्या आणि जगण्याच्या स्पर्धेत आम्हाला टिकून राहायचे असेल तर, बुद्धी आणि वेळ याला संपत्तीचा दर्जा देऊन ही संपत्ती वाढविण्याची किंवा बचत करण्याची विचारसरणी आम्ही अंगीकारली नाही तर आमची गरिबी दिवसेंदिवस वाढतच जाणार यात शंका नाही. आजकाल सगळ्याच गोष्टींचे संदर्भ आणि अर्थ बदलत आहेत. या बदलांमध्ये सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे ते वेळेला आणि त्या वेळेचा योग्य उपयोग करणाऱ्या बुद्धीला. ही महत्त्वाची बाब आम्हाला वेळीच लक्षात घ्यावी लागेल. आयुष्याचे सार्थक किती जगलात यावरून ठरत नाही, तर कसे जगलात, आपल्या समाजाला, देशाला काय दिले यावरून ठरत असते. अशा परिस्थितीत आपल्याजवळील बुद्धी आणि वेळ, ही खर्च करूनही न संपणारी अक्षय संपत्ती राष्ट्रासाठी खर्च करणे हाच उत्तम नागरिक होण्याचा मापदंड ठरला आहे. वेळ रिकामा घालवून आम्ही केवळ आमचेच नव्हे तर राष्ट्राचेही प्रचंड नुकसान करीत आहोत, ही जाणीव ज्या दिवशी भारतातील लोकांना होईल त्या दिवशी इतर कोणतेही प्रयत्न न करता भारत आपोआपच एक महाशक्ती बनलेला असेल.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..